गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या… च्या गजरात…
भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणुकीने गणरायाला साश्रुनयनांनी निरोप…
कोल्हापूर: (” लोकमानस न्यूज – 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात थिरकली तरुणाई
साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात थिरकली तरुणाई, हलगीच्या ठेक्यावर लेझिम, युवक युवतींचा नृत्याविष्कार, झांज पथक, नाशिक ढोल पथक, धनगरी ढोल आदींसह लेसर किरणांच्या झगमगाटाच्या प्रकाश झोतात, लक्षवेधी एलईडी, पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीने … भक्तीपूर्ण वातावरणात गणेश भक्तांच्या गर्दीने लाडक्या बाप्पांचे मंगळवारी (दि.17 सप्टेंबर 2024 रोजी) साश्रुनयनांनी विसर्जन . इराणी खनिज 1,035 सार्वजनिक गणेश मूर्तींचे तर १,१०१ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले.
रात्री बारा वाजता सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टिम बंद
शहर उपनगरासह शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग होता. जिल्हा पोलीस प्रशासनाने शिस्तबद्ध नियोजन केले होते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जाण्यासाठी व येण्यासाठीचे दोन वेगवेगळे मार्ग केले होते. विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग महाद्वार रोड असल्याने या मार्गावर प्रमुख मंडळांचे गणपती मिरवणुका पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. कोल्हापूरची लोकसंख्या वाढली मंडळांची संख्या वाढली मात्र, रस्ते अरुंदच राहिले. यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी पोलिसांनी शिस्तबद्ध नियोजन करून सुद्धा चेंगराचेंगरी, ढगलाडकली, धक्काबुक्की चे प्रकार घडून आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आणि संपूर्ण विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार आवाहनानंतर रात्री बारा वाजता सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टिम बंद करण्यात आल्या. तसेच लेसर ला फाटा देण्यात आला. याबद्दल ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांतून अखंड 24 तास बंदोबस्त करणाऱ्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तसेच वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, होमगार्ड व स्वयंसेवी संघटना, विविध पक्षांचे स्वागत कक्ष आदींचे विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. केबल चॅनलच्या थेट प्रक्षेपणामुळे गणेश भक्तांना घरी बसूनही विसर्जन मिरवणूक पाहता आली. यावेळी ड्रोनद्वारेही संपूर्ण मिरवणूक दाखविण्यात आली. या थेट प्रक्षेपणामुळे कोल्हापूरसह राज्यातील व परराज्यातील तसेच देशाबाहेरील गणेश भक्तांना कोल्हापूरचा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक पाहता येणे शक्य झाले. याबद्दल त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
प्रमुख मंडळांकडून नियम धाब्यावर
मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीवर मोठा खर्च करून तसेच काही प्रमुख मंडळांकडून नियम धाब्यावर बसवून साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात व लाईट इफेक्टच्या प्रकाश झोतात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे 50 पेक्षा अधिक मंडळांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
तर प्रमुख मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी नागरिकांची ढकलाढकली व धक्काबुक्कीचे प्रकार घडले. यासाठी महिला वर्गाने या मिरवणुकीच्या जाणे टाळत इतर उपरस्त्यांचा अवलंब करून मिरवणूक पाहण्यात धन्यता मानली. सायंकाळी 7 ते 10 या वेळेच्या सुमारास मुख्य मिरवणूक मार्गावर अलोट गर्दीमुळे प्रचंड चेंगराचेंगरी झाली. महिला, मुलांना, धक्काबुक्की करणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांचा प्रसाद मिळाला.
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही मिरवणुका
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या 21 फुटी गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीसह इतर प्रमुख मंडळांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या. या मिरवणुका पाहण्यासाठी ही नागरिकांनी प्रमुख मिरवणूक मार्गांवर मोठी गर्दी केली होती.