“गाभ” या मराठी चित्रपटातून वेगळ्या विषयावर भाष्य..!
– गावाकडच्या रांगड्या मातीतील “गाभ” मराठी चित्रपट 21 जूनला होणार सर्वत्र प्रदर्शित
– संकल्पक, लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांची माहिती
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या “गाभ” या चित्रपटात ही वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक महोत्सवांमध्ये विशेष कौतुक झालेल्या या चित्रपटाला सिनेअभ्यासक, समीक्षकांसह रसिकांचीही पसंतीची दाद मिळाली आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल.., त्या बदलाची कथा अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला “गाभ” हा मराठी चित्रपट 21 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती संकल्पना, लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना जत्राटकर म्हणाले, चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटू रे आणि मंगेश नारायण गोटूरे आहेत तर सहनिर्माता मी स्वतः आहे. तसेच छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रवींद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साऊंड डिझाईनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत रवींद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे.
परिपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट
सर्वसामान्य माणसांचं रोजचं जगणं तसेच दैनंदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. “गाभ” या चित्रपटातून वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. आशघन कथानकाला सुमधुर संगीताची जोड देत परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट “गाभ”च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील दादू कैलास वाघमारे आणि फुलवा सायली बांधकर या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्वपूर्ण भूमिका बजावतो. याची रंजक कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी गाव चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोडके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिकाही झळकणार आहेत. असेही जत्राटकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला चित्रपटातील कलाकारांसह टीम उपस्थित होती.