*शेंडा पार्क मधील जागा शासकीय कार्यालये व आयटी पार्कला लवकरात लवकर मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार*
*- पालकमंत्री हसन मुश्रीफ*
कोल्हापूर, दि.14 (जिमाका): / ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाकडील जागा जिल्हा क्रीडा संकुल, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आय टी पार्क व अन्य शासकीय कार्यालयांसाठी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी महेश रणभिसे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरातील विविध प्रश्नांचाही आढावा घेऊन सूचना केल्या.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांची वाढ होण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यासाठी शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी शेंडा पार्क येथील कृषी विभागाची जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, तसेच तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी ही जागा लवकर मिळण्याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याविषयीच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
*****
*सेनापती कापशीतील ५६६ घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या*
– *पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना*
*जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुलधारक व प्रशासनाची बैठक*
*दीड महिन्यात ड्रोनद्वारे सिटीसर्वे होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड*
*कोल्हापूर, दि. १४: ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
सेनापती कापशी ता. कागल येथील ५६६ ग्रामस्थांची घरे शेतीच्या सातबारामध्ये बांधलेली आहेत. गेल्या ५० वर्षात सिटी सर्वे झालेला नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण, तारण, वारसा नोंदी, खरेदी -विक्री, डागडुजी करताना अडचणी येतात. या सर्व घरकुलधारकांचा तातडीने सिटीसर्वे करून प्रॉपर्टी कार्ड द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.*
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत घरकुलधारक व प्रशासनाची बैठक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, विस्तारणाऱ्या सेनापती कापशी या मोठ्या गावामध्ये मुख्य गावठाणासह आजूबाजूला वाड्या- वस्त्यांवर जोडणारे रस्ते आहेत. त्यामुळे, ग्रामस्थांनी सोयीनुसार शेतीमध्ये सातबारा उताऱ्यात घरे बांधलेली आहेत. गेल्या ५० वर्षात सिटी सर्वे झाला नाही. दोनवेळा गावठाण हद्दवाढ होऊनही ही घरकुले गावठाणाबाहेरच राहिली. परिणामी प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे या घर मालकांना अनेक अडचणी येत आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, रविवारी दि. १६ जून रोजी लगतच्या नंबरचा सर्वे करा. सोमवारी दि. १७ जून रोजी ग्रामपंचायतीचे अनुषंगिक ठराव गोळा करा. मंगळवारी दि. १८ जून रोजी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा . एक आठवड्याच्या आत प्रस्ताव मंजूर करून महिना ते दीड महिन्याच्या आत ड्रोनद्वारे सिटीसर्वे करुन प्रॉपर्टी कार्ड दिली जातील, असे नियोजन करा.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, सरपंच उज्वला कांबळे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, सुनील चौगुले, उपसरपंच सौरभ नाईक, सुनील चौगुले, प्रवीण नायकवडी, इसाक मकानदार, सूर्यकांत भोसले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*****
*जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना*
*कोल्हापूर, दि. १४ :
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रश्नांबाबत आढावा बैठका झाल्या.*
*कागल नगरपालिकेची जागा हस्तांतरित करण्याच्या व कागल शहरातील पाझर तलावाची मोजणी संपादन कागदपत्रे/ मोजणी शीट मिळण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.*
कागल तालुक्यातील करनूर गावातील पुरग्रस्त पुनर्वसनाबाबत त्यांनी आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात ज्या पूरग्रस्त कुटुंबांची संमती आहे त्यांचे तातडीने पूनर्वसन सुरु करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
महापूरग्रस्तांना द्यावयाच्या खडकेवाडा, हमिदवाडा, चिखली या गावठाण हद्दीमधील प्लॉटबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पातील उर्वरित पुनर्वसन करण्यासंदर्भात व करपेवाडी वर्ग-२ प्रस्तावासंदर्भात यावेळी त्यांनी आढावा घेतला.
कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावठाण विस्तार करण्यासंदर्भात व लिंगायत समाज स्मशानभुमीला जमिन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
=====================
अंबाबाई मंदिर परिसर विकास, रस्त्यांसह शहरातील सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करा
– पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
• *संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी चोख नियोजन करा*
• *पावसाळा संपताच शहरातील रस्त्यांची कामे हाती घेऊन जलद पूर्ण करा*
• *अमृत योजनेतील प्रलंबित कामे सप्टेंबर अखेर पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा*
• *थेट पाईपलाईनद्वारे पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी उर्वरित कामे जलद पूर्ण करा*
• *जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा*
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): / ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी)
श्री अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविणे, पार्किंग व्यवस्था, शहरातील रस्ते, रंकाळा तलाव व पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचा विकास, भुयारी गटारीव्दारे सांडपाणी व्यवस्थापन, शहरात विद्युत खांब बसविणे यांसह शहर परिसरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहर परिसरातील विविध विषयांचा आढावा घेऊन सूचना केल्या.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांची निविदा आठवड्याभरात काढा. शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून शहर परिसरात 16 रस्ते करण्यात येणार आहेत. यातील 5 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत 11 रस्त्यांची कामे पावसाळा संपल्यानंतर तात्काळ हाती घेवून ती जलद गतीने पूर्ण करा. ही कामे करताना रस्त्यांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या. केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान जतन व संवर्धन, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर थीम पार्कचा विकास, बोटॅनिकल गार्डन, गांधी मैदानात साचलेले पाण्याचे निर्गतीकरण, शहरातील विविध भागांत भुयारी गटारव्दारे सांडपाणी व्यवस्थापन अशी विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी चोख नियोजन करा. शिरोळ परिसरात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून पूर परिस्थितीमुळे जीवित हानी होणार नाही, याची खबरदारी घ्या. अमृत योजनेतील प्रलंबित कामे सप्टेंबर अखेर पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा, असे निर्देश त्यांनी दिले. थेट पाईपलाईनद्वारे शहरातील ए व बी वॉर्डामध्ये पाणीपुरवठा होत असून सी व डी वॉर्डामध्ये देखील पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा. जिल्हा वार्षिक योजनेचा या आथिक वर्षातील निधी वेळेत खर्च होण्यासाठी या कामांना प्रशासकीय पातळीवर वेळेत मंजुरी द्या, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्हा व शहरातील विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
*****=====================