शरण साहित्य अध्यसानास पाच कोटींचे अनुदान मंजूरीसाठी प्रयत्न करणार
– उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळालाआश्वासन
– मागणीसाठी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाची भेट व बैठक
कोल्हापूर: (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शरण साहित्य अध्यसानास पाच कोटींचे अनुदान मंजूरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळाची भेट व बैठक
शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू होत असणाऱ्या “शरण साहित्य” अध्यासनास शासकीय अनुदान मिळावे, या मागणीसाठी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. शनिवार दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे ही बैठक पार पडली.
शासनाकडे पाठवला निधीचा प्रस्ताव
शरण साहित्य अध्यसनासाठी महाराष्ट्र शासनाकडे रुपये पाच कोटी इतक्या रमकेचे अनुदान प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला आहे. त्यास मान्यता द्यावी ही विनंती लिंगायत समाजातर्फे करण्यात आली.
सुसज्ज अद्ययावत ग्रंथालय निर्मिती
महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या सहकारी शरण शरणींनी निर्माण केलेल्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनासाठी सदरचा निधी वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून शरण साहित्याची समकालिन प्रस्तुतता अभ्यासून समाज प्रबोधनासाठी व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयाचे सुसज्ज अद्ययावत ग्रंथालय निर्मिती तसेच ग्रंथ, स्मरणिका, नियतकालिके प्रकाशन करण्यात येणार आहेत.
संशोधकांसाठी शिष्यवृत्ती
वचन साहित्याचे संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. यासोबतच वचन साहित्यावर आधारित डिप्लोमा, सर्टिफिकेट, डिग्री कोर्सेस इत्यादी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
अनुदानाची तरतूद करण्याचे आश्वासन
हा निधी लवकरात लवकर मंजूर करून येत्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सदरच्या अनुदानाची तरतूद करण्याचे आश्वासन उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
शिष्टमंडळात यांची प्रमुख उपस्थिती..
यावेळी सरलाताई पाटील, सिनेट सदस्य ऍड. अभिषेक मिठारी, राजशेखर तंबाके, शंकर बिराजदार, विलास आंबोळे, अमरदीप पाटील, दत्ता घोटूकडे, यश आंबोळे आणि सुधीर शहापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.