– राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सौंदती यात्रेकरूना दिवाळी भेट
– एस.टी.दराच्या कपातीचाही निर्णय लवकरच
– सौंदत्ती यात्रा “एस.टी.खोळंबा आकार व दर” यासंदर्भात शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कोल्हापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के यांचे समवेत बैठक संपन्न
*कोल्हापूर : (मानस न्युज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)*
यंदाचा एस.टी.बसेसचा “खोळंबा आकार” राज्य शासनाने पूर्णतः माफ केला असून, एस.टी.दराच्या कपातीचा ही निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
सौंदत्ती यात्रा “एस.टी.खोळंबा आकार व दर” यासंदर्भात शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ, कोल्हापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के यांचे समवेत आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, २००९ साली आमदार झाल्यापासून मी सौंदत्ती यात्रेच्या एस.टी. खोळंबा आकार आणि दराबाबत पाठपुरावा करत आहे. तत्पूर्वी काहींच्या कडून २००४ ते २००९ च्या दरम्यान खोळंबा आकार वाढल्याचे भाविकात भ्रम पसरवून आहे तितकाच खोळंबा आकार ठेवून वाढलेला खोळंबा आकार कमी केल्याचे चित्र निर्माण केले जात होते. २००९ पासून २०१४ पर्यंत याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून पहिल्या वर्षी ५० % खोळंबा आकार कमी करून घेतला. यामध्ये सातत्य ठेवत पुढच्या वर्षी ८० % व त्यानंतर तब्बल ९० % खोळंबा आकार कमी केला तर एस.टी.दरातही रु.५० वरून रु.३४ इतकी कपात केली. या चार-पाच वर्षात भाविकांचे अंदाजे दोन ते तीन कोटी रुपये या माध्यमातून वाचविण्यास आपण यशस्वी ठरलो आहे. यंदाचे सर्व निर्बध उठल्याने सौंदत्ती यात्रा होणार आहे. याकरिता श्री रेणुका भक्त संघटनांसह गाडी प्रमुख आणि भाविकांची लगबग सुरु झाली आहे. यंदाचा खोळंबा आकार पूर्णतः माफ करण्याची आणि दरात कपात करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली होती.
*मुख्यमंत्री यांच्याकडून सौंदती यात्रेकरूना दिवाळी भेट : क्षीरसागर*
कर्नाटक येथील सौंदती डोंगरावरील श्री रेणुका देवीची यात्रा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणी असते. जिल्हातील लाखो नागरिक या यात्रेतून भक्तिभावासह सहल म्हणून आनंद लुटतात. यंदाची यात्रा दि.४ ते ७ डिसेंबर २०२२ या काळात पार पडणार आहे. सदरच्या यात्रेकरिता गेली ३० वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत सन २००९ पासून केलेल्या पाठपुराव्यामुळे खोळंबा आकारामध्ये सुमारे ९० टक्के कपात करण्यात आली होती. तर दर ५० रुपयावरून ३४ रुपये इतका कमी करण्यात यश मिळाले होते. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला होता. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे यात्रा झाल्या नाहीत. यंदाच्या यात्रेकरिता खोळंबा आकार पूर्ण माफ करावा आणि एस.टी.दरात कपात करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मी केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून, मुख्यमंत्री यांनी लाखो सौंदती यात्रेकरूना दिवाळी भेट दिली आहे. अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.
*मागणीस यश : यंदाचा एस.टी.बसेसचा “खोळंबा आकार” राज्य शासनाने पूर्णतः केला माफ*
या मागणीस यश आले असून यंदाचा एस.टी.बसेसचा खोळंबा आकार राज्य शासनाने पूर्णतः माफ केला असून, एस.टी.दराच्या कपातीबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून दर कपातीचाही निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासह खोळंबा आकार पूर्णतः माफ केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समस्त कोल्हापूरवासीय भाविकांच्यावतीने जाहीर आभारही व्यक्त केले. तसेच क्षीरसागर यांनी, सौंदत्ती यात्रेकरिता महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एस.टी.बसेस सुस्थितीत असाव्यात. यात्रा मार्गावर ब्रेकडाऊन वाहने व आपत्कालीन स्थितीत पर्यायी गाड्यांची व्यवस्था असावी. यासह आवश्यक सुविधा भाविकांना पुरवाव्यात अशा सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के यांना सूचना दिल्या.