*जलसंपदा विभागाने जलस्त्रोत निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा*

- जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांचे आवाहन - शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

*जलसंपदा विभागाने जलस्त्रोत निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा*

– जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांचे आवाहन

– शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : दि. 26 ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचा कार्यक्षम वापर करुन कृषी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शाश्वत जलस्त्रोत निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी केले.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या वतीने *जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025″ अंतर्गत “शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा” पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेली ही कार्यशाळा जलसंपदा, कृषी विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात घेण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे उप अधीक्षक अभियंता संजय पाटील कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, अशोक पवार, देवाप्पा शिंदे, कारभारवाडीचे नेताजी पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना पाणी परवाने व प्रगतशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यशाळेच्या सुरुवातीला जल प्रतिज्ञा घेण्यात आली

.

– अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच पाण्याचा योग्य वापर करणेही आवश्यक

म्हेत्रे म्हणाले, कोल्हापूर हा पाण्याने समृद्ध असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात लघु, मध्यम, मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही बांधण्यात आले असून यात सुमारे 94 टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्रापैकी बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली आले असले तरी शंभर टक्के क्षेत्र अद्याप ओलिताखाली आलेले नाही. त्यामुळे धरणांमध्ये दहा ते पंधरा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. परंतु भविष्यात पूर्ण क्षमतेने सिंचन क्षमता निर्मिती झाल्यानंतर सध्या उपलब्ध असणारे पाणी कमी पडण्याची शक्यता निर्माण होवू शकते. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच परंपरागत शेती पद्धतीमध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच पाण्याचा योग्य वापर करणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यापैकी धरणातून सोडण्यात येणारे पाणी केवळ पंधरा टक्के असून धरणाच्या खालील बाजूच्या क्षेत्रामधून येणारे म्हणजेच फ्री कॅचमेंट मधून येणारे पाणी 85 टक्के आहे. त्यामुळे नदीमध्ये येणाऱ्या या एकत्रित पाण्याचे योग्य नियोजन होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

– ठिबक सिंचनावर आधारित शेती ही काळाची गरज

नेताजी पाटील म्हणाले, ठिबक सिंचनावर आधारित शेती ही काळाची गरज आहे. कारभारवाडीमध्ये ठिबक सिंचनावरील शेतीबरोबरच सेंद्रिय शेती, कारभारी गुळाचा गोडवा ब्रँड, पापड, लोणची, मसाले, शेवया बनवणे, आदी उद्योगातून कारभारवाडी प्रगती साधत आहे. गावात सध्या सुमारे 150 रोजगार निर्माण झाले आहेत. महिला गृह उद्योग, कृषी पर्यटन आदी अनेक उद्योगातून गावातील प्रत्येक कुटुंबातील एक महिला अथवा एक व्यक्ती सक्षम होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर इथला शेतकरी शेतमाल पिकवण्याबरोबरच उद्योग समूहा मार्फत तो शेतमाल विकण्यासाठीही सज्ज झाला आहे. यामुळे कारभारवाडीची वाटचाल पाणी व्यवस्थापनाकडून स्वयंपूर्ण खेड्याकडे होत आहे.

– शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घ्या

नामदेव परीट म्हणाले, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे. पाण्याचा अवास्तव वापर थांबवणे, पाण्याचा कार्यक्षमपणे योग्य वापर करुन शेतीची उत्पादकता वाढवणे व जमिनीचे रक्षण करणे आवश्यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करुन शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करा. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घ्या. फार्मर आयडी काढून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

– जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत माहिती

प्रसाद संकपाळ यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशात एकमेव असे समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापन राबवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात 500 महिलांची आपदा सखी टीम कार्यरत आहे. 350 गावात सुमारे 600 ठिकाणी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम उभी करण्यात आली आहे. हॅम रेडिओच्या माध्यमातून वायरलेस कम्युनिकेशन साधण्यात येत आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून चांगल्यात चांगले आपत्ती व्यवस्थापन होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी स्वयंसेवकांची टीम, प्रशिक्षित मनुष्यबळ, साधनसामग्रीचा वापर करुन आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक विभागाने मिळून समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यासाठी या यंत्रणेतील प्रत्येक व्यक्तीने सांघिक भावना ठेवून परस्पर समन्वयाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले.

कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश विशद केला. कार्यकारी अभियंता स्मिता माने व रोहित बांदिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी मानले.

You may also like

error: Content is protected !!