येत्या 20 नोव्हेंबर रोजी “सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा” : जिल्हाधिकारी अमोल येडगे

- • पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मतदान प्रक्रिया, कायदा सुव्यवस्थेबाबत 6 विधानसभा मतदारसंघांना भेटी, ग्रामस्थांशी केली चर्चा • ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांनाही दिल्या भेटी -  मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या "मुद्रित माध्यमातील जाहिरातींना" "एमसीएमसी" चे प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे - निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : निवडणूक आयोग - सक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांचे आवाहन

येत्या 20 नोव्हेंबर रोजी “सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा” : जिल्हाधिकारी अमोल येडगे

• पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मतदान प्रक्रिया, कायदा सुव्यवस्थेबाबत 6 विधानसभा मतदारसंघांना भेटी, ग्रामस्थांशी केली चर्चा

• ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांनाही दिल्या भेटी

–  मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या “मुद्रित माध्यमातील जाहिरातींना” “एमसीएमसी” चे प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : निवडणूक आयोग

– सक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांचे आवाहन

कोल्हापूर : ( जिमाका, दि. १२) : ( ” लोकमानस न्यूज 4″ –  विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

येत्या 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावून मतदान करावे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपल्या मतदानाचा हक्क बजावून कोल्हापूर जिल्ह्याची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले.  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासमवेत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ यात हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, कागल, चंदगड व राधानगरी येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात ठेवण्यात आले 80 टक्के मतदानाचे उद्द‍िष्ट

कोल्हापूर जिल्ह्यात 80 टक्के मतदानाचे उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मतदार जनजागृती कार्यक्रमांना गती देण्यात आली आहे. राज्याच्या मतदान टक्केवारीच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबवून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी भेटीवेळी अशा मतदान केंद्र भागातील ग्रामस्थांशी चर्चा करून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्या त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेसह, कायदा सुव्यवस्थेचा आढावाही घेतला.

कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मतदान केंद्र स्तरावर सुरू असलेल्या कामांची पाहणी

तपासणी नाक्यावर तसेच स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणी भेट देवून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी करण्याच्या सूचना केल्या. नाक्यावर सुरू असणारे कॅमेरे, वाहन तपासणी करताना सर्व प्रक्रियेचे चित्रण करण्याच्या सूचनांही त्यांनी दिल्या. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मतदान केंद्र स्तरावर सुरू असलेल्या कामांची पाहणीही केली. मतदान केंद्रावरील किमान आवश्यक सुविधांबाबत पाहणी करून त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. भेट दिलेल्या मतदारसंघात प्रातिनिधिक स्वरूपात मतदार माहिती चिठ्ठ्यांच्या वाटपासही सुरवात त्यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहचाव्यात याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. मतमोजणी केंद्रामधील तयारी व ईव्हीएम स्ट्राँग रूमला भेटी देवून आवश्यक तयारी झाल्यबाबत त्यांनी आढावा घेतला. आंतरराज्य सीमेवरील कोगनोळी तपासणी नाक्यांवर भेट देवून सुरू असलेल्या तपासणी कामांची पाहणी केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्यात येत आहेत. त्या प्रक्रिया केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी श्री.येडगे व पोलीस अधीक्षक श्री.पंडित यांनी केली. यावेळी चुका न करता सर्व मशीन तयार करावेत यासाठी चांगल्याप्रकारे खात्री करून प्रक्रिया राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रत्येक मतदारसंघात करण्यासाठी चांगले नियोजन करण्याचे निर्देश

हातकणंगले व शिरोळ येथे भेटी दरम्यान आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तत्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. चूक मुक्त निवडणुकीची संपूर्ण तयारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात करण्यासाठी चांगले नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी या भेटीत दिले.

यावेळी शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम, इचलकरंजी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले, कागलचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले, चंदगडचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे व राधानगरीचे निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सूळ तसेच संबंधित तहसिलदार यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या त्या ठिकाणी उपस्थित होते.

******************************************

–  मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या “मुद्रित माध्यमातील जाहिरातींना” “एमसीएमसी” चे प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे

कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. भारत निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खिळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना सदर कालावधीत प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी (दि. १६ नोव्हेंबर सायंकाळी ६.०० वा. पर्यंत) एमसीएमसी समितीकडे अर्ज करावा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

हे अर्ज जिल्हास्तरीय (MCMC समिती) मीडिया संपर्क व्यवस्थापन व सोशल मीडिया कक्ष, सांख्यिकी कार्यालयाजवळ, दुसरा मजला, महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक 0231-2992920) येथे करावेत, असे आवाहनही माध्यम कक्षाकडून करण्यात आले आहे.

******************************************
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : निवडणूक आयोग

– १३ नोव्हेंबर सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रतिबंध

भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.

त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
******************************************
सक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

– जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांचे आवाहन

भारतीय निवडणूक आयोग अपंग लोकांसाठी (पीडब्ल्यूडी) अनुकूल अशा सेवा देऊन मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून सक्षम ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपने मतदाना दिवशी व्हीलचेअरसाठी विनंती करण्याची PWDs सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दिव्यांग मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे एक मौल्यवान साधन आहे. हे ॲप वापरण्यास सोपे असून दिव्यांग व्यक्तींनी या ॲपचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा जिल्हा दिव्यांग अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी, त्यांचे मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करण्यासाठी सक्षम ॲपमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली असून ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-

आवाज सहाय्यः हे ॲप दृष्टिहीन असलेल्या दिव्यांगांसाठी आवाज सहाय्य प्रदान करते.

टेक्स्ट-टू-स्पीचः हे ॲप श्रवणदोष असलेल्या PWD साठी टेक्स्ट-टू-स्पीच प्रदान करते.

अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्येः ॲपमध्ये अनेक अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आहेत. जसे की मोठे फॉण्ट आणि हाय-कॉन्ट्रास्ट रंग जे दिव्यांग मतदारांना वापरण्यासाठी सोपे करतात.

मतदान केंद्रांविषयी माहितीः मतदान केंद्रांबद्दल हे ॲप माहिती प्रदान करते, ज्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता, वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशीलांचा समावेश आहे.

तक्रारी: दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठीहे ॲप सहाय्य करते.
******************************************

You may also like

error: Content is protected !!