चेस असोसिएशन जिल्हा संघटनेवरील सर्व आरोप खोटे व तथ्यहीन

- चेस असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष भरत चौगुले यांची माहिती - बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम - कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य संघटनेला पूर्वीपासून संलग्न - उत्तर म्हणून याहीपेक्षा जादा चांगले काम करून दाखवू - स्पर्धा नियमावली महाराष्ट्रात आदर्श

चेस असोसिएशन जिल्हा संघटनेवरील सर्व आरोप खोटे व तथ्यहीन

– चेस असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष भरत चौगुले यांची माहिती

– बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम

– कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य संघटनेला पूर्वीपासून संलग्न

– उत्तर म्हणून याहीपेक्षा जादा चांगले काम करून दाखवू

– स्पर्धा नियमावली महाराष्ट्रात आदर्श

कोल्हापूर – (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी)

चेस असोसिएशन कोल्हापूर हीच अधिकृत जिल्हा संघटना असून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेस संलग्न आहे. संघटनेवरील सर्व आरोप खोटे व तथ्यहीन आहेत. अशी माहिती चेस असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष भरत चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम

चेस असोसिएशन कोल्हापूर ही संस्था २२ मार्च २०२२ रोजी स्थापन झाली (संस्था नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडले आहे) असून तेव्हापासून संस्थेच्या बुद्धिबळाच्या रीतसर कामकाजास सुरुवात केली. चेस असोसिएशन कोल्हापूर ही संघटना सतत बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत असते.

स्पर्धा नियमावली महाराष्ट्रात आदर्श

सात बुद्धिबळपटू सभासद आणि पदाधिकाऱ्यांची ही संघटना आहे.यामध्ये भरत चौगुले अध्यक्ष तर मनीष मारुलकर – सचिव,धीरज वैद्य – उपाध्यक्ष, प्रितम घोडके – खजिनदार,उत्कर्ष लोमटे, अनिश गांधी व सम्मेद शेटे हे सदस्य आहेत. बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या 2023 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेस असोशिएशन कोल्हापूरला जिल्हा संघटना म्हणून सर्वानुमते संलग्नता देण्यात आली. तेव्हापासून सर्व जिल्हा निवड स्पर्धा, राज्य स्पर्धा व स्थानिक स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व सहकार्याने होतात‌. चेस असोसिएशन कोल्हापूरचे *स्पर्धा नियमावली महाराष्ट्रात आदर्श मानली जाते.

पंचाना अन्य जिल्ह्यापेक्षा चांगले मानधन

कोणतीही मान्यता शुल्क न घेता जिल्ह्यामध्ये अन्य संघटना, अकॅडमीला व संस्थेला स्पर्धा घेण्यासाठी व विविध बुद्धिबळ उपक्रम राबवण्यासाठी नियमावली देऊन परवानगी देण्यात येते.  स्पर्धेत काम करणाऱ्या पंचाना अन्य जिल्ह्यापेक्षा चांगले मानधन दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्याचे विविध संघ निवड स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आदर्शवत अशा होतात. स्पर्धा विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसाची रक्कम, चषक व मेडल्स दिले जाते‌.  दुपारी अल्पोपहार व चहा दिला जातो. शिवाय राज्य स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झालेल्या स्पर्धकांना टी-शर्ट व स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाते. त्याचबरोबर स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धा ही दर्जेदार होतात. अशा पद्धतीने संघटनेचे अल्पावधीत जोरदार घोडदौड सुरू आहे.

नैराश्या पोटी खोटे आरोप

पण ही घोडदौड न बघवल्याने नैराश्या पोटी ऑल मराठी चेस असोसिएशन कोल्हापूर ने पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करुन चेस असोसिएशन कोल्हापूरची व अध्यक्ष भरत चौगुलेंची नाहक बदनामी केली आहे‌. त्याकडे कोल्हापूरचे सुज्ञ बुद्धिबळप्रेमी दुर्लक्षच करतील. माहिती अधिकाराखाली ऑल मराठी चेस असोसिएशन कोल्हापूरची माहिती घेऊन लवकरच आम्ही त्यांच्या अध्यक्षांशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर संघटनेची व भरत चौगुलेंची बदनामी केल्याप्रकरणी रीतसर कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय आमच्याकडे खुला आहेच.

कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य संघटनेला पूर्वीपासून संलग्न

कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य संघटनेला पूर्वीपासून संलग्न होती. तथापि वरील विघ्नसंतोषी लोकांनी कोणताही संबंध नसताना व विनाकारण त्या संस्थेला कोर्टकचेरीत ओढल्यामुळे त्यानी बुद्धीबळाच्या हितासाठी संलग्नता सोडून देणेचा पर्याय स्वीकारला. अशा परिस्थितीत चेस असोशिएशनचे प्रशंसनीय कार्य पाहून या संघटनेला राज्य संघटनेने संलग्नता दिली ती पूर्ण कायदेशीर तर आहेच शिवाय किती योग्य आहे तेही संघटना आपल्या कार्याने दाखवून देत आहे.

गेल्या सात बुद्धिबळ प्रसाराचे कोणतेही ठळक काम नाही

गेल्या सात वर्षात ऑल मराठीचे चेस असोसिएशन कोल्हापूरने बुद्धिबळ प्रसाराचे कोणतेही ठळक काम, स्पर्धा व विविध उपक्रम राबवल्याचे आपल्या दृष्टीसही पडले‌ नाही.  हे आपण सर्व कोल्हापूरवासी जाणतच आहात. फक्त ते कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे विरुद्ध गेले तीन वर्षे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडे तक्रारी देऊन संलग्नता मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत व कोर्टामध्ये हरकती घेऊन अडथळे आणण्याचे काम करत आहे. आणि आता खोटे आणि बिनबुडाचे आरोप करुन चेस असोशिएशन कोल्हापूरच्या कामात अशा प्रकारे अडथळे आणण्याच्या प्रयत्न करत आहे.

उपद्रवी लोकांना उगाच कशाला भांडत आणि कोर्टबाजी करत बसलाय?

संजय घोडावत विद्यापीठात गतवर्षी झालेल्या महिला राष्ट्रीय महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी या उपद्रवी लोकांना उगाच कशाला भांडत आणि कोर्टबाजी करत बसलाय? जिल्हा संघटनेवरील कोर्ट केसेस काढून घ्या व त्यांच्या मान्यतेने स्पर्धा घेत रहा व एकत्र काम करा असे सांगूनही त्याचा काही एक उपयोग झाला नाही.

अर्थहीन बिनबुडाचे आरोप

कागदोपत्री कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा कोणत्याही प्रकारे सदस्य नसताना कोर्टात हरकती घेणे सोशल मीडियावर प्रामुख्याने व्हाट्सअप ग्रुपवर कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूर च्या नावाने अर्थहीन बिनबुडाचे आरोप करणे…जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा संघटनेचा हॉल बाबत तक्रारी करून जिल्हा संघटनेकडून हॉल काढून घेणेचा प्रयत्न करणे अशी खेळाच्या हिताविरूद्ध व खेळाडूंना त्रास देणारी कृत्ये त्यांची सुरु आहेत.

उत्तर म्हणून याहीपेक्षा जादा चांगले काम करून दाखवू

ऑल मराठीचे चेस असोशिएशन कोल्हापूरला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे संलग्नता हवी आहे‌ यासाठी ते गेली सात वर्ष अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने झगडत आहेत. बुद्धिबळ विकासाचे ‌कोणतेही काम न करणाऱ्या व असंख्य उचापती करुन संलग्न जिल्हा संघटनेस नाहक त्रास देणाऱ्या संघटनेस कोण संलग्नता देईल काय ? यावर उत्तर म्हणून याहीपेक्षा जादा चांगले काम करून दाखवून जिल्हा बुद्धिबळाची कमान आणि वर उंचविण्यासाठी कार्यरत राहणेचा निर्धार भरत चौगुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

संघटनेच्या सुरू असलेल्या चांगल्या कार्याला पाठिंबा

या पत्रकार परिषदेसाठी चेस असोसिएशन कोल्हापूरचे सर्व सातच्या सात सदस्य उपस्थित होते.भरत चौगुले व मनिष मारुलकर यांनी वरील माहिती व पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तरे दिली..त्याचबरोबर, खेळाडू प्रतिनिधी रवींद्र निकम इचलकरंजी व प्रशांत पिसे,पालक प्रतिनिधी सरला नेर्लीकर, पंच प्रतिनिधी आरती मोदी व सूर्याजी भोसले रेंदाळ, प्रशिक्षक प्रतिनिधी माधव देवस्थळी व अभिजीत चव्हाण वारणानगर, संयोजक प्रतिनिधी उमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेच्या सुरू असलेल्या चांगल्या कार्याला पाठिंबा दिला. यावेळी,संघटनेचे सोहम खासबारदार, रोहित पोळ इचलकरंजी, शैलेश व्हनकट्टी इचलकरंजी, कपिल ठोमके तारदाळ,शंकर आडम इचलकरंजी, अनिता पंडितराव ,अर्पिता दिवाण,सागर पिलारे व झोरबा अनिता सागर आदी उपस्थित होते..

You may also like

error: Content is protected !!