कोल्हापूर क्षयमुक्त करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे : धर्मा राव
– निक्षय मित्र अंतर्गत केंद्रीय पथकाची मॅक असोसिएशनला भेट
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) / ( “लोकमानस न्यूज 4” विशेष प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे सुमारे 2 हजार 200 रुग्ण उपचार घेत आहेत. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षयरुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण आहार किट देऊ शकते. जिल्ह्यातील क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन जिल्हा क्षयमुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारचे राष्ट्रीय सल्लागार धर्मा राव व राज्य क्षयरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.दिगंबर कानगुले यांनी केले.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकलंगले (मॅक) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदना वसावे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव ठाकूर, डॉ. परवेज पटेल, शिवाजी बर्गे उपस्थित होते.
डॉ. राव म्हणाले, 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करावयाचा आहे. याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्णांना पोषण आहार किट देणे गरजेचे आहे. जेणेकरुन रुग्ण लवकर बरा होईल. असोसिएशन अंतर्गत सर्व उद्योग संस्था, कंपनी यांना निक्षयमित्रसाठी अवाहन करावे, असे त्यांनी सुचित केले. या आवाहनास प्रतिसाद देत मॅक असोसिएशनचे चेअरमन हरिश्चंद्र धोत्रे, सुरेश क्षीरसागर, सेक्रेटरी शंतनु गायकवाड यांनी मॅकचे सर्व सदस्य ऊद्योग, संस्था, कंपनी यांना या बाबत माहिती देऊन शंभर टक्के रुग्णांना फूड बास्केट देण्याबाबतचे आवाहन करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे एमआयडीसी मधील औद्योगिक संस्था, कंपनीमधील कर्मचारी यांची मोफत क्षयरोग व इतर आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
दरम्यान केंद्रीय पथकाद्वारे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानचे सीईओ बारामतीकर, रेमंड लक्झरी कॉटन कंपनीचे एच.आर.सचिन भोसले, किर्लोस्कर ऑईल कंपनीचे शरद अजगेकर यांची भेट घेऊन निक्षय मित्रबाबत आवाहन केले. यावेळी केंद्रस्तरीय पथकाद्वारे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाज पडताळणी केली तसेच जिल्हा क्षयमुक्त करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या पथकाबरोबर जिल्हा क्षयरोग केंद्राचे विशाल मिरजकर, धनंजय परीट, दिया कोरे, गौरी खैरमोडे, सुनिता नरदगे, पूनम कुंभार, विनोद नायडू, एकनाथ पाटील, एस.टी.एस. व एस.टी.एल.एस. कर्मचारी उपस्थित होते.
************************
महिला लोकशाही दिन मंगळवारी
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
माहे जूनचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आहे.
महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
************************
बकरी ईद दिवशी सीपीआर रुग्णालयातील आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी बकरी ईद निमित्त सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु, आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरु राहील, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली आहे
************************