बसवेश्वरांचा समतेचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवणार
– प्रमुख वक्ते पैगंबर शेख यांचे प्रतिपादन
– कोल्हापूर लिंगायत समाज संस्था, बसव केंद्र आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 19 मे या कालावधीत आयोजित “बसव व्याख्यानमाला 2024” : तिसरे पुष्प – “संत – महात्म्यांचा कल्याणकारी मानवतावाद”
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
बसवेश्वरांनी आपल्या विचाराने 12 व्या शतकात सामाजिक क्रांती व तत्त्वज्ञानाची क्रांती घडवून आणली. त्यांचे समतेचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य आम्ही प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन प्रमुख वक्ते पैगंबर शेख यांनी केले.
कोल्हापूर लिंगायत समाज संस्था, बसव केंद्र आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 19 मे या कालावधीत बसव व्याख्यानमाला 2024 चे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या तिसर्या म्हणजेच अखेरच्या दिवशी “संत – महात्म्यांचा कल्याणकारी मानवतावाद” या विषयावर प्रमुख वक्ते पैगंबर शेख यांनी पुष्प गुंफले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माया पंडित होत्या.
यावेळी बोलताना पैगंबर शेख म्हणाले, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणेच बसवेश्वरांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे बसवेश्वरांनी “अनुभव मंटप” च्या माध्यमातून तत्त्वज्ञानाची चिकित्सा करून धर्माचे तत्त्वज्ञान मांडायचे कार्य केले. तसेच बसवेश्वरांनी तत्त्वज्ञान शरण मांडण्यासाठी महिलांना अधिक व मोठे स्थान दिले. त्यांचे समतावादी विचार आत्मसात केल्यानंतर सकारात्मक बदल घडवणे शक्य होणार आहे. यासाठी त्यांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष महाजन यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केलेल्या क्रांतिकारक सामाजिक कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष मनोगताचे भाषण डॉ. माया पंडित यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय दत्ता घुटूगडे यांनी करून दिला.
यावेळी मावळा ग्रुपचे उमेश पवार, प्रायोजक शरण विलास आंबोळे, शरण सुभाष महाजन कोल्हापूर लिंगायत समाज संस्था, बसव केंद्र आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूरच्या सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन राजशेखर तंबाके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. चारुशिला तासगावे यांनी केले.
व्याख्यानमाला काळात उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माया पंडित यांच्या हस्ते प्रा. चारुशिला तासगावे यांचा सत्कार करण्यात आला.