कोल्हापूर जिल्ह्यात 71.98 टक्के मतदान
– कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे
• मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
*लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मे रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 71.98 टक्के मतदान झाले. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत कोल्हापूर जिल्हावासियांनी मतदानही उत्साहाने केले. यामुळे उन्हाळा असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या 70.88 या टक्केवारीत 2024 च्या लोकसभा निवडणूकीत 1.10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
स्ट्राँगरुमबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी जिल्ह्यात 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले या दोन मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. मतदानानंतर सायंकाळी कोल्हापूर मतदारसंघाच्या सर्व मतपेट्या सुरक्षितपणे रमणमळा स्ट्राँगरुममध्ये तर 48 हातकणंगले मतदारसंघाच्या सर्व मतपेट्या सुरक्षितपणे राजाराम तलाव येथील स्ट्राँगरुममध्ये पोहोचविण्यात आल्या असून स्ट्राँगरुमबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघातील आकडेवारी खालीलप्रमाणे-
271 चंदगड पुरुष 159772, महिला 158142 व इतर 8 असे एकूण 317922 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 110495, महिला 107001 व इतर 3 असे एकूण 217499 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 69.16 टक्के, महिला 67.66 टक्के व इतर 37.50 टक्के अशा एकूण 68.41 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
272 राधानगरी पुरुष 172998, महिला 160985 व इतर 14 असे एकूण 333997 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 123113, महिला 109898 व इतर 7 असे एकूण 233018 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 71.16 टक्के, महिला 68.27 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 69.77 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
273 कागल पुरुष 165670, महिला 163829 व इतर 5 असे एकूण 329504 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 127377, महिला 120758 व इतर 3 असे एकूण 248138 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 76.89 टक्के, महिला 73.71 टक्के व इतर 60 टक्के असे एकूण 75.31 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
274 कोल्हापूर दक्षिण पुरुष 177749, महिला 171410 व इतर 47 असे एकूण 349206 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 129522, महिला 117665 व इतर 17 असे एकूण 247204 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 72.87 टक्के, महिला 68.65 टक्के व इतर 36.17 टक्के असे एकूण 70.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
275 करवीर पुरुष 163158, महिला 149759 व इतर 0 असे एकूण 312917 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 134437, महिला 114672 व इतर 0 असे एकूण 249109 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 82.40 टक्के, महिला 76.57 टक्के व इतर 0 टक्के असे एकूण 79.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
276 कोल्हापूर उत्तर पुरुष 145387, महिला 147453 व इतर 17 असे एकूण 292857 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 99790, महिला 91463 व इतर 9 असे एकूण 191262 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 68.64 टक्के, महिला 62.03 टक्के व इतर 52.94 टक्के असे एकूण 65.31 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघातील आकडेवारी खालीलप्रमाणे-
277 शाहूवाडी पुरुष 152738, महिला 142597 व इतर 5 असे एकूण 295340 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 111736, महिला 103629 व इतर 3 असे एकूण 215368 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 73.2 टक्के, महिला 72.7 टक्के व इतर 60 टक्के असे एकूण 72.92 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
278 हातकणंगले पुरुष 169655, महिला 162008 व इतर 18 असे एकूण 331681 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 133523, महिला 116288 व इतर 9 असे एकूण 249820 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 78.7 टक्के, महिला 71.8 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 75.32 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
279 इचलकरंजी पुरुष 154227, महिला 146833 व इतर 60 असे एकूण 301120 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 108648, महिला 96533 व इतर 9 असे एकूण 205190 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.4 टक्के, महिला 65.7 टक्के व इतर 15 टक्के असे एकूण 68.14 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
280 शिरोळ दक्षिण पुरुष 158858, महिला 158628 व इतर 4 असे एकूण 317490 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 122122, महिला 111537 व इतर 3 असे एकूण 233662 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 76.9 टक्के, महिला 70.3 टक्के व इतर 75 टक्के असे एकूण 73.60 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
283 इस्लामपूर पुरुष 137945, महिला 133475 व इतर 5 असे एकूण 271425 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 98876, महिला 86847 व इतर 4 असे एकूण 185727 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 71.7 टक्के, महिला 65.1 टक्के व इतर 80 टक्के असे एकूण 68.43 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
284 शिराळा पुरुष 152428, महिला 144790 व इतर 3 असे एकूण 297221 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 103685, महिला 96619 व इतर 2 असे एकूण 200306 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 68 टक्के, महिला 66.7 टक्के व इतर 66.7 टक्के असे एकूण 67.39 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
————————————————-
2) ‘नया साल नया जोश’ मोहिमेत कोल्हापूर पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा*
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका)
ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच पोस्टाच्या ग्राहकांना आर्थिक लाभाच्या (financial Inclusion) विविध योजनांचा फायदा मिळावा या हेतूने ‘नया साल नया जोश’ मोहिमेचे आयोजन मंडल कार्यालय, मुंबई यांनी केले होते. त्यामध्ये कोल्हापूर विभागाने १ लाख ४२ हजार ६९१ खाती उघडून, 202.51 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले व महाराष्ट्र सर्कल मध्ये दुसरा क्रमांक पटकावला त्यासाठी कोल्हापूर विभागाने पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र मंडल कार्यालयाकडून यशस्वितांचा सत्कार करण्यात आला.
मोहिमेत सहा उपविभागांनी उत्साहात सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. कागल उपविभागाचे डाक निरीक्षक अभिजित जाधव यांनी सर्वाधिक नेट खाती उघडून गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला. सहा. अधिक्षक पश्चिम उपविभाग दत्ता मस्कर यांनी दुसरा तर डाक निरीक्षक गारगोटी उपविभाग योगेश्वर चीतमुगरे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. मोहिमेत इचलकरंजी, गडहिंग्लज, उत्तर उपविभाग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पोस्ट ऑफिस श्रेणीमध्ये प्रभाकर कांबळे, पोस्टमास्तर कोल्हापूर शहर प्रधान डाक घर (HO category) यांनी गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला, तसेच सतीश जोशी सब पोस्टमास्तर शनिवार पेठ, रुपाली पोवार सबपोस्टमास्तर भेंडे गल्ली, (SO category) भगवान गुरव ब्रांच पोस्टमास्तर, हसूर दुमाला शाखा डाकघर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
महिला प्रधान एजंट श्रेणीमध्ये अनिता विभूते (कागल पोस्ट ऑफिस) यांनी गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तसेच राष्ट्रीय पातळीवरील मिशन क्रांती या PLI RPLI च्या स्पर्धेअंतर्गत सहा अधिक्षक पश्चिम उपविभाग दत्ता मस्कर यांनी पहिला क्रमांक मिळवला तसेच धनश्री भगवान पाटील, ब्रॅच पोस्टमास्तर, महागोंड शाखा डाकघर यांनी यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर्फे प्रीमियम अकाउंट, जनरल इंशुरन्स, मर्चंट onbording स्पर्धे अंतर्गत प्रेम सिंग, सहा. अधिक्षक इचलकरंजी उपविभाग, निलोफर शेख यांनी अव्वल कामगिरी बजावली. यामध्ये विद्याधर सुतार पोस्टमन इचलकरंजी यांना प्रथम क्रमांक तर शिवाजी पांडुरंग कुंभार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली
किशन कुमार शर्मा (IPOS) चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कस, रामचंद्र जायभाये (IPOS), पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, अमिताभ सिंघ, पोस्टमास्तर जनरल, मुंबई रिजन, रमेश पाटील (IPOS), डाक सेवा निदेशक, गोवा रिजन, यांच्या हस्ते सर्व यशस्वितांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी जिल्हा प्रवर अधिक्षक अर्जुन इंगळे व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक संतोष कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
3) सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकार व वन्यप्राणी अवयवांच्या
– चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेल स्थापन
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका)
वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरमध्ये सायबर सेल स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी दिली.
वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिद्द होण्यासाठी सी.डी.आर. (call detail Record), एस.डी.आर (subscriber Detail Record), एल.टी.एल. (Live Tower Location), टी.डी.डी (Tower dump data), Caf, (Verification Document) या कार्यालयाकडे अधिकृतपणे मागविण्यात आलेली माहिती गोपनीय पध्दतीने संबंधित मागणी करण्या-या विभागाला पुरविण्यात येणार असून त्याचा फायदा अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वन विभागाकडील क्षेत्रिय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे.
सायबर सेल विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये सुरु होत असून सायबर सेलचे उद्घाटन कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते दि. 7 मे रोजी झाले आहे.
सायबर सेल स्थापनेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (बनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांचे आवश्यक मार्गदर्शन लाभले असून या सायबर सेलव्दारे क्षेत्रिय कर्मचारी यांना वने व वन्यजीव विषयक गुन्हे हाताळणे व आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करणे व राज्या बाहेरील आरोपींनाही पकडणे सोईचे होणार आहे. सायबर सेलच्या माध्यमातून वने व वन्यजीव गुन्ह्यामधील आरोपींना शिक्षा होण्यास मदत मिळणार असून क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊन त्यांचे मनोबल वाढणार आहे.
वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांनी सायबर सेल सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरसाठी काम करणा-या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व अधिक तत्परतेणे व परिणामकरित्या कार्य करुन वने व वन्यजीव विषयक अपराधांवर आळा घालण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस. पवार, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. गवते तसेच वनविभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.