कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील पथके रवाना
– मतदानासाठी 3 हजार 986 मतदान केंद्र होणार सज्ज
– जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट
कोल्हापूर, (दि.06 ) जिमाका) /
( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल., अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
– कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19 लाख 36 हजार 403 मतदार तर हातकणंगले मतदारसंघात एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार
कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19 लाख 36 हजार 403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2 हजार 156 मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 830 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना वितरीत करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना होत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
– कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ : सहा विधानसभा : ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे विवेकानंद कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. करवीर मतदारसंघाकरिता ईव्हीएम व साधनसामग्रींचे महासैनिक प्रशिक्षण केंद्र, लाईन बाझार रोड येथून वितरण झाले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकरिता व्हि.टी. पाटील सभागृह, राजारामपूरी येथून वितरण झाले. कागल मतदारसंघाकरिता जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरी मतदारसंघाकरिता जवाहर बाल भवन, मौनी विद्यापीठ गारगोटी तर चंदगड-गडहिंग्लज मतदारसंघाकरिता महाराणी राधाबाई माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.
– हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : चार विधानसभा मतदारसंघ : ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश कोल्हापूर जिल्हयात आहे. यातील शाहूवाडी मतदारसंघाकरिता मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे श्री. शाहू हायस्कूल या ठिकाणाहून वितरण झाले. हातकणंगले मतदारसंघाकरिता ईव्हीएम व साधनसामग्रींचे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून वितरण झाले. इचलकरंजी मतदारसंघाकरिता राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून वितरण झाले. तर शिरोळ मतदारसंघाकरिता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.
– जिल्ह्यात 425 सर्वाधिक मतदान केंद्र 272-राधानगरी मध्ये असून सर्वात कमी 255 मतदान केंद्र 279-इचलकरंजी मतदारसंघात
जिल्ह्यात 425 सर्वाधिक मतदान केंद्र 272-राधानगरी मध्ये असून सर्वात कमी 255 मतदान केंद्र 279-इचलकरंजी मतदारसंघात आहेत. चंदगड मतदारसघांत 381 मतदानकेंद्र, कागल मतदारसंघात 354, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 328, करवीर मतदारसंघात 357, कोल्हापूर उत्तर 311, शाहूवाडी 333, हातकणंगले 331, शिरोळ 293, इस्लामपूर 284, शिराळा 334 याप्रमाणे एकूण 3 हजार 986 मतदान केंद्र आहेत.
जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ या 10 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील -एकुण 55 ग्रामीण व शहरी 18 मतदान केंद्र जिल्हयातील वैशिष्टयांवर वेगवेगळ्या थीमवर आधारीत असणार आहेत.
– जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हयात एकुण 15003 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 1756 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, पिण्याचे पाणी, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
– उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा
मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
– मतदान पथके मतदानस्थळी रवाना
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना वितरीत करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना होत आहेत.
– लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून अभिवादन
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या 102 व्या स्मृति दिनानिमित्त दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अभिवादन केले.
– निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता : नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी दिनांक 6 मे 2024 रोजी मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना सोडण्यासाठी व दिनांक 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरुन निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत मतदार संघनिहाय एकूण 435 बसेस पुरविण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन कोल्हापूर विभागाकडे 741 इतक्या बसेस उपलब्ध असून त्यापैकी 435 बसेस निवडणूक कामकाजाकरिता पुरविण्यात आल्यामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तरी प्रवासी जनतेने होणारी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचे नियोजन करुन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
– पुढील मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
– कोल्हापूर* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोतोली, इचलकरंजी, कणकवली , रत्नागिरी व बेळगाव.
– संभाजीनगर* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- बाजार भोगाव, भोगावती व हुपरी.
– इचलकरंजी* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- नृसिंहवाडी, खिद्रापूर, कोल्हापूर व मिरज.
– गारगोटी* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व गडहिंग्लज.
– मलकापूर* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व कोकरुड.
– चंदगड* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोवाड, राजगोळी, कोलीक, पारगड, तिलारी, कोल्हापूर व बेळगाव.
– कुरुंदवाड* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- पुणे, सांगली, कागवाड, नृसिंहवाडी, इचलकरंजी व हुपरी.
– कागल* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- पुणे, मुंबई, म्हसवड, जमखंडी, बिद्री, अर्जुनवाड, बोळावी, मिरज, इचलकरंजी, रंकाळा, निपाणी व सुळकूड.
– राधानगरी* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व निपाणी.
– गगनबावडा* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- सातारा व पुणे.
– आजरा* आगारातून सुटणाऱ्या गाड्या- गडहिंग्लज, आंबोली, चंदगड व बेळगाव याप्रमाणे.
– जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी मतदान करा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दि. 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न होणार आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेएन एस. हे 7 मे 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पाचगाव, कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांचे स्वागत करणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
– जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी मतदान करावे
मतदानावेळी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान सुलभ व सोईस्कर होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व वेळोवेळी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने दिव्यांग शाळेतील सर्व मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना भेट देवून व्हील चेअर उपलब्धतेबाबत तसेच रॅम्प व पिण्याच्या पाण्याची सोय याबाबत खात्री करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये दिव्यांग-अंध मतदार यांच्या साठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका व ब्रेल लिपीतील वोटर्स स्लिप (voters sleep) उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी मतदान करावे, असे आवाहनही श्री. पोवार यांनी केले आहे.