पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे जिल्ह्यात 595 ठिकाणी मतदार जनजागृती
• कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम
कोल्हापूर दि.4 ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी) :
कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अमोल येडगे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे, अशा आवाहनाचा संदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) द्वारे दिनांक 4 ते 6 मे दरम्यान दर 2 तासाला देण्यात येणार आहे.
सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पब्लिक ऍड्रेस सिस्टीम) 595 ठिकाणी कार्यान्वित
कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पब्लिक ऍड्रेस सिस्टीम) 595 ठिकाणी कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनामार्फत ग्रामीण व शहरी लोकांपर्यंत विश्वासार्ह सूचना, संदेश, माहिती ऑडिओ स्वरुपात तातडीने पोहोचवले जातात. सध्या मतदार जनजागृतीसाठी या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे असणाऱ्या नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर ऑडिओ स्वरुपातील मतदार जनजागृतीचे संदेशही ऑडिओ स्वरुपात प्रसारित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे.
मतदार जनजागृतीसाठी धावपटू डॉ.झुंजार माने यांची शाहूवाडी ते कोल्हापूर 50 कि.मी. दौड
– जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची वाघबीळ ते कोल्हापूर 17 कि.मी.ची दौड
• *जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन*
• *मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यातील मतदारांचा पुढाकार*
कोल्हापूर, दि. 4 ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी )
नामांकित धावपटू शाहुवाडी तालुक्यातील मतदार डॉ.झुंजार माने यांनी मतदार जनजागृतीसाठी 50 किलोमीटर अंतराची दौड पूर्ण केली आहे. श्री. माने यांच्या प्रमाणेच अनेक मतदारांच्या व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी 7 मे रोजी मतदान करावे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला राज्यासह देशात अग्रेसर बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये 70.88 टक्के मतदान झाले होते..
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 7 मे रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये 70.88 टक्के मतदान झाले होते. मागील वेळच्या तुलनेने यावेळच्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनामार्फत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदासंघात रन फॉर वोट, मानवी साखळी आदी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील मतदार देखील अनोखे उपक्रम राबवून मतदार जनजागृतीचा प्रयत्न करत आहेत.
आज दिनांक 4 मे रोजी शाहुवाडी येथील डॉक्टर झुंजार माने यांनी रात्री अडीच वाजता शाहूवाडी येथून त्यांची दौड सुरु केली व सकाळी आठ वाजता पोलीस ग्राउंड कोल्हापूर येथे त्यांची 50 कि. मी. अंतराची दौड पूर्ण झाली. त्यांच्या या दौड दरम्यान अमोल यादव यांनी 38 कि.मी. तर वाघबीळ ते कोल्हापूर यादरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे, चेतन चव्हाण व दिलीप जाधव यांनी 17 कि.मी. अंतराची दौड पूर्ण करुन मतदार जनजागृती केली.
या दौडच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे यांनी सहभाग घेतला. या दौडची सांगता पोलीस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथून झाली.
दौडच्या सांगता कार्यक्रमात जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदारांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आतच सर्व मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे थंड पाणी असेल. तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय करण्यात आली आहे. वयस्कर व आजारी मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या व बेंचची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाहुवाडी ते पोलीस ग्राऊंड कोल्हापूर 50 किलोमिटर रन पूर्ण करून डॉ. झुंझार माने, शाहूवाडी यानी चला धावूया
– सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी” असे आवाहन केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होवून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी डॉ. झुंझार माने, शाहूवाडी यांनी शाहुवाडी ते कोल्हापूर पोलीस ग्राऊंड पर्यंत 50 किलोमीटर रन पूर्ण केली. अमोल यादव यांनी 38 किलोमीटर तर जिल्हाधिकारी अमोल येडगे, चेतन चव्हाण, दिलीप जाधव यांनी 17 किलोमीटर ची दौड पूर्ण केली.
. जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढीची पंरपरा कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदान करावे, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि.7 मे दिवशी मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा असे आवाहन अल्ट्रा रनर अमोल यादव यानी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी दि. 7 मे दिवशी मतदान करा, असे आवाहन डॉ. पल्लवी मूग यांनी केले.
पब्लिक ऍड्रेस सिस्टीम द्वारे मतदार जनजागृती
– – मतदानासाठी कर्मचारी कामगारांना सुट्टी
सर्व आस्थापनांनी शासन निर्णयाचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. 4 ( ” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी).
जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघांतील कारखाने, इतर दुकाने व आस्थापनांनी मतदानादिवशी पूर्ण दिवस सुट्टीऐवजी २, ३ तासाची सुट मिळावी, याबाबत निवेदन दिले होते. यावर सुनावणी घेवून २, ३ तास सुट देण्याबाबतची विनंती अमान्य केली आहे. जिल्ह्यातील सर्वच आस्थापनांनी याबाबतच्या निर्णयाचे पालन करुन मतदारांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हात 7 मे रोजी मतदान होत आहे. मतदाना दिवशी सर्व मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मतदानाकरिता मतदार कामगारांना कारखाना, दुकाने व इतर आस्थापना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देत नसतील तर अशा कामगारांनी कोल्हापूरसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने स्थापन केलेल्या दक्षता कक्षातील दुरध्वनी क्रमांक 9975045118 व 7743816733 तसेच [email protected] ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांनी केले आहे.
तसेच इचलकरंजीसाठीची तक्रार कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.२. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक ०२३०-२४२१३९१ आणि ईमेल आयडी [email protected] वर दाखल करावी, असे इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी कळविले आहे.
7 मे रोजी सर्व भाविकांनी मतदान करुन देवदर्शनाला येण्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन*
कोल्हापूर, दि. 4 ( ” कोल्हापूर लोकमत विशेष प्रतिनिधी)-
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई व वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्री केदारलिंग (जोतिबा) या देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दि. ७ मे २०२४ रोजी आपल्या कुंटुबातील प्रत्येक मतदारासह उत्साहाने मतदान करुन देवदर्शनासाठी यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले आहे.
*प्रशासनाकडून जिल्हयातील मतदान प्रक्रियेबाबतची तयारी अंतिम टप्प्यात*
*उष्ण हवामानात मतदारांना किमान सुविधा देण्यात येणार*
*मतदार जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची अंमलबजावणी*
*आता मतदारांनी आपला मतदानाचा मूलभूत अधिकार वापरावा*
लोकसभा निवडणूक २०२४ टप्पा ३ मधील निवडणूक प्रक्रियेवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव चिंताजनक नसल्याचे अंदाज आयएमडी तज्ञ व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ यांच्याशी चर्चा करून निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहेत. कोल्हापूर जिल्हयात 47-कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात येत्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा.पर्यंत मतदान होणार आहे. प्रशासनाकडून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक किमान सुविधांसह, मनुष्यबळ पुरवठा याबातची कामे अंतिम टप्प्यात असून निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठीची तयारी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ओआरएसची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांनी दिली.
दिनांक 7 मे रोजी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येवून मतदान करावे यासाठी जिल्हयातील सर्व शासकीय तसेच काही खाजगी आस्थापना मतदार जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवित आहेत. मानवी रांगोळी, रन फॉर वोट, पालकांना पत्र, सामाजिक माध्यमांवरील रील्स, पथनाट्य, जनजागृतीपर व्हिडीओ, प्रभात फेरी, एफएम-रेडिओ कार्यक्रम, मतदान शपथ अशा अनेक उपक्रमातून मतदारांपर्यंत पोहचून मतदान करण्याचा संदेश दिला आहे. मतदारांनी अशा विविध कार्यक्रमातून उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आहे. त्यामूळे येत्या 7 मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडून मतदान केंद्रावर आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावतील अशी अशा जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्हयाची मतदान टक्केवारीतील ओळख प्रत्येक निवडणूकीमधे अग्रस्थानी असते. कोल्हापूर जिल्हा व जिल्हयातील प्रत्येक मतदार यासाठी आपले योगदान देत आहेत. यावेळी मागील निवडणूकीत मतदान केलेल्या सर्व 71 टक्के मतदारांनी मतदान करावेच, त्याचबरोबर मतदान न केलेल्या 29 टक्के मतदारांनीही मतदान करावे. यावेळी नवमतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांनीही प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार वापरून आपल्या पहिल्या मतदानाची नोंद करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. मतदार कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे, नवमतदारांना आता उन्हाळ्याच्या सुट्टया आहेत तसेच जेष्ठ व दिव्यांगानाही चांगल्या सोयी सुविधा आयोगाकडून दिल्या जात आहेत. त्यामूळे मतदान करण्यासाठी, लोकशाहीच्या उत्सवामधे सहभागी होण्यासाठी सर्व मतदारांनी बाहेर पडावे, निवडणूक प्रशासन प्रत्येक मतदाना केंद्रावर आपल्या स्वागतासाठी तयार आहे असा संदेशही निवडणूक विभागाने दिला आहे.
*कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 73 मतदान केंद्रांची स्थापना*
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित (थिमॅटिक) 73 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यांपैकी कोल्हापूर शहरात 12 व इचलकरंजी शहरात 6 अशी शहरी भागात 18 तर जिल्ह्यात 55 अशी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय गुलाबी (पिंक), युवा व दिव्यांग मतदान केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
*जिल्ह्यातील थिमॅटीक मतदान केंद्रांची माहिती पुढील प्रमाणे – तालुका, ग्रामपंचायतीचे नाव व थीम याप्रमाणे-*
*पन्हाळा तालुक्यातील* ग्रामपंचायत कोडोली- लोकशाहीचा उत्सव, ग्रामपंचायत वाघुर्डे – बाल स्नेही गाव, ग्रामपंचायत दिगवडे- पर्यावरण पूरक गाव
*शाहुवाडी तालुक्यातील* आंबा ग्रामपंचायत -वन उत्पादने/ग्रीन हाऊस, ग्रामपंचायत बांबवडे- बांबू हाऊस, ग्रामपंचायत सरुड- क्लीन अँड ग्रीन व्हिलेज, ग्रामपंचायत भेडसगाव -जैव विविधता
*गगनबावडा तालुक्यातील* ग्रामपंचायत गगनबावडा- स्थानिक उत्पादन- करवंदे, फणस, जांभूळ, अळू प्रॉडक्ट्स इत्यादी, ग्रामपंचायत असळज- ग्रामीण पर्यटन, अणदुर ग्रामपंचायत- जलसंवर्धन/ सेव्ह वॉटर
*शिरोळ तालुक्यातील* ग्रामपंचायत नांदणी- भाजीपाला उत्पादक गाव, अब्दुललाट – खिद्रापूर मंदिर वास्तूकला, ग्रामपंचायत आगर- इंडस्ट्रियल हब, ग्रामपंचायत धरणगुत्ती -ग्रीन हाऊस, ग्रामपंचायत औरवाड- नद्यांचा संगम आणि घाटाचे दृश्य, ग्रामपंचायत टाकळी – सैनिकांचे गाव
*करवीर तालुक्यातील-* ग्रामपंचायत उजळाईवाडी – विमानतळ, ग्रामपंचायत कळंबा- गुऱ्हाळ घर, ग्रामपंचायत महे- सेंद्रिय शेती, ग्रामपंचायत खेबवडे -सैनिक गाव
*हातकणंगले तालुक्यातील-* माणगाव ग्रामपंचायत- मूलभूत हक्क आणि कर्तव्य, शिरोली पुलाची ग्रामपंचायत- उद्योग:आर्थिक विकासाचा पाया, ग्रामपंचायत आळते- शांततापूर्ण जीवनाचे महत्त्व, ग्रामपंचायत पट्टणकोडोली – लघुउद्योगाचे महत्व, ग्रामपंचायत हुपरी- सिल्व्हर सिटी (चांदी व्यवसाय), ग्रामपंचायत कुंभोज- आधुनिक शिक्षण पद्धती, ग्रामपंचायत संभापूर- माझा गाव सुंदर गाव, ग्रामपंचायत अंबप- हरित गाव
*चंदगड तालुक्यातील* ग्रामपंचायत जांबरे- हरित व स्वच्छता ग्राम (जलसमृद्ध), ग्रामपंचायत बसर्गे- आत्मनिर्भर ग्राम (रेशीम उद्योग), ग्रामपंचायत कोदाळी- तिलारी नगर हरित व स्वच्छ ग्राम (जैव विविधता), ग्रामपंचायत हाजगोळी – बालस्नेही गाव, ग्रामपंचायत गुडवळे खा.- हरित व स्वच्छ ग्राम (बांबू लागवड), ग्रामपंचायत करेकुंडी -हरित व स्वच्छ ग्राम (जलसमृद्ध)
*आजरा तालुक्यातील-* ग्रामपंचायत कोरिवडे- आजरा तालुक्याची विविधता, ग्रामपंचायत वाटंगी- पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, ग्रामपंचायत उत्तुर – धार्मिक व सांस्कृतिक, ग्रामपंचायत मुमेवाडी- उत्सव लोकशाहीचा देखावा
*गडहिंग्लज तालुक्यातील* ग्रामपंचायत नेसरी- टीव्ही, मोबाईल, संगणक अतिवापराचे दुष्परिणाम, ग्रामपंचायत दुंडगे- पृथ्वी वाचवा, ग्रामपंचायत हेव्वाळ जलद्याळ- जलसंवर्धन, ग्रामपंचायत ऐनापुर – बालस्नेही गाव
*भुदरगड तालुक्यातील* ग्रामपंचायत पाटगाव – मधाचे गाव पाटगाव, ग्रामीण पर्यटन, ग्रामपंचायत पेठ शिवापूर- ग्रामीण पर्यटन व ऐतिहासिक स्थळे, ग्रामपंचायत मठगाव बश्याचा मोळा -ग्रामीण पर्यटन व जैव विविधता, ग्रामपंचायत अनफ खुर्द- अल्पसंख्यांकांसाठीच्या योजनांवर मतदान केंद्र.
*कागल तालुक्यातील-* लिंगनूर कापशी – कोल्हापूरी कापशी चप्पल, ग्रामपंचायत आलाबाद- महिला स्नेही ग्रामपंचायत, ग्रामपंचायत व्हन्नुर- बालस्नेही ग्रामपंचायत,
ग्रामपंचायत कौलगे- सैनिकांचे गाव, ग्रामपंचायत बानगे- कुस्तीचे गाव, ग्रामपंचायत सुळकूड- भात लागवडीसाठी प्रसिद्ध गाव, ग्रामपंचायत कापशी- सरसेनापती घोरपडे यांचे जन्मगाव
*राधानगरी तालुक्यातील* ग्रामपंचायत फेजीवडे- दाजीपूर अभयारण्य, ग्रामपंचायत सरवडे- राधानगरीचा शिष्यवृत्ती पॅटर्न.