जिल्ह्यात कलम 144 अन्वये मतदान संपेपर्यंत सार्वजनिक सभा, बैठका घेण्यास प्रतिबंध
-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश
कोल्हापूर, दि. 3 ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी ) .
भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47- कोल्हापूर व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दि. 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही. अगर सभा घेता येणार नाही. त्यासाठी जिल्ह्यातील 47- कोल्हापूर लोकसभा मतदार संघ व 48- हातकणंगले लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्रात दि. 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्या पासून ते मतदान दि. 7 मे 2024 रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी प्रतिबंध करण्याचे आदेश जारी केले आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 47- लोकसभा मतदार संघ व 48 -हातकणंगले मतदार संघाचे कार्यक्षेत्रात मतदानाचे दोन दिवस अगोदर म्हणजे दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मतदान दिवशी म्हणजे दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालील कृती करण्यास मनाई करीत आहे.
बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून).
वरील आदेश मतदानाकरीता घरोघरी जावून भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
मसुद माले येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, मसुद माले, ता. पन्हाळा येथे शैक्षणिक सत्र 2024-25 साठी नवीन प्रवेश सुरु झाल्याचे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी कळविले आहे.
इयत्ता 6 वी ते 10 साठी एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी 9922411885 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.
मौजे आगर येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, मौजे आगर, ता. शिरोळ येथे इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गामध्ये मोफत प्रवेश सुरु झाल्याचे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक पी.एन. जवाहिरे यांनी कळविले आहे.
ही शाळा सर्व सोयीनियुक्त सुसज्ज डिजिटल शाळा असून प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅब देण्यात येणार आहेत. शाळेमध्ये निवासी व भोजनाची सोय असून शैक्षणिक साहित्यासह अन्य सुविधाही मोफत देण्यात येणार आहेत. शाळेची इमारत स्वच्छ व सुसज्ज वातावरणात असून स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय सुविधा तसेच क्रीडांगण उपलब्ध आहे. या शाळेत विविध खेळ व स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केले जाते. शाळेत 80 टक्के प्रवेश अनुसूचित जातीसाठी व 20 टक्के प्रवेश इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. प्रवेशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जवाहिरे यांना 7517753555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडी बाजार रद्द करुन अन्य दिवशी भरवावेत
– उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे
जिल्ह्यात 47 – कोल्हापूर व 48 – हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. 7 मे 2024 मतदान होणार आहे. मंगळवार दि. 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी ज्या गावामध्ये मतदान व मतमोजणी दिवशी आठवडा बाजार भरतो, त्या गावामध्ये या दिवशी भरणारे आठवडा बाजार रद्द करुन ते अन्य दिवशी भरविण्यात यावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले आहे.
7 मे रोजी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुट्टी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ४८- हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी उपविभाग तसेच सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकी दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच ही सुट्टी साप्ताहिक सुट्टी रद्द करुन देण्यात येऊ नये,असे आवाहन इचलकरंजीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार अपवादात्मक परिस्थितीत कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांना आयुक्त, महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकाने घेणे आवश्यक राहील. वर नमूद केल्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने यांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने सूचनांचे योग्य ते पालन करण्याचे आवाहन श्रीमती मौसमी चौगुले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, इचलकरंजी यांनी केले.
उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.२. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक ०२३०-२४२१३९१ आणि ईमेल आयडी [email protected] वर तक्रार दाखल करावी, असेही श्रीमती भोईटे यांनी कळविले आहे.
” लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज ” या विषयावर
– ‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत
मुंबई, दि. ३ : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी ).
‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवारी ६ मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही, मतदान केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली आहे.