उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या
-निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
• जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
• आचारसंहिता भंगाच्या घटनांवर तात्काळ कार्यवाही करा
• मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुविधा द्या
• स्थिर व भरारी पथके गतिमान करा; तपासण्यांची संख्या वाढवा
कोल्हापूर, ( दि. 2 ) (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी) .
तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आचारसंहिता भंगाची कोणतीही घटना आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत उपस्थित व सहभागी अधिकारी
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, अपर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
उष्ण हवामानात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरुन खबरदारी घ्यावी
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सध्या प्रखर उष्ण हवामान असून मतदानाच्या दिवसापर्यंत आणखी उष्ण हवामानात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरुन खबरदारी घ्यावी. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या. मतदान केंद्रांच्या ठिकाणी स्वच्छता करुन घ्या. या ठिकाणची विद्युत व्यवस्था, पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करा. सावलीसाठी केंद्राबाहेर मंडप उभारुन घ्या. तसेच पिण्याच्या पाण्याची व खुर्च्यांची व्यवस्था करा. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून प्रत्येक मतदान केंद्रांवर त्या त्या सुविधा द्या. आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होईल, यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये आयत्या वेळी लागणाऱ्या औषधांचा साठा तयार ठेवा. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवा. एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण द्या. वाड्या वस्त्यांवर लांब मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांची ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात चांगले मतदान झाले आहे. या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. गृहभेटीवर भर देण्याबरोबरच विविध माध्यमांतून जनजागृती करा. मतदार स्लिपचे वाटप पूर्ण करुन घ्या. शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध विभाग, महानगरपालिका व गृहनिर्माण संस्था व अन्य संस्थांचे सहकार्य घ्या. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानापेक्षा या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा टक्का घटणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी दिले.
आचारसंहिता अंमलबजावणी : तात्काळ कार्यवाही
आचारसंहिता अंमलबजावणी बाबत बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आचारसंहिता भंगाची अथवा गैरकृत्य घडत असल्याचे आढळून आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करा. विना परवाना लावलेले बॅनर तपासा. वाहनांची तपासणी करा. स्थिर व भरारी पथके गतिमान करुन तपासण्यांची संख्या वाढवा.
जिल्ह्यातील कोणत्याहीआदर्श मतदान केंद्रे तयार करा
मतदान केंद्रावर कसलीही अडचण येणार नाही, तसेच मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या. दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर उपलब्ध करून द्या. महिला मतदान केंद्रे, युवा मतदान केंद्रे, दिव्यांग मतदान केंद्रे अशी आदर्श मतदान केंद्रे तयार करुन त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
घरोघरी भेटी देऊन मतदारांमध्ये जनजागृती करावी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांमध्ये जनजागृती करावी. सर्व विभागांच्या समन्वयाने जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यामध्ये योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत तसेच सुरेश जाधव यांनी मतदानादिवशी मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देवून सूचना केल्या. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी, आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर करण्यात येत असलेल्या तयारीची दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली.
2 ) जिल्ह्यातील 6 लाख 73 हजार मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचा उपक्रम म्हणून जिल्ह्यातील मतदारांकडून “मी मतदान करणारच” अशी ऑनलाईन शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
1 मे रोजी जिल्हा परिषद स्तरावर 6 लाख 57 हजार 347 तर महानगरपालिका स्तरावरील 8 हजार व नगरपालिका स्तरावरील 8 हजार अशी एकूण 6 लाख 73 हजार 347 मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा “स्वीप”चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन
केवळ 12 तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी प्रतिज्ञा घेण्याची भारतातील ही विक्रमी नोंद ठरण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मतदान करण्याकरिता प्रबोधन करणे व त्यांनी शपथ घेण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यात आले. या बाबत सर्व यंत्रणांच्या बैठका घेण्यात आल्या. सर्व शासकीय व इतर विभागांना सोबत घेऊन 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते.
घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्याची शपथ घेण्याबाबत प्रबोधन
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमार्फत गाव स्तरावर यंत्रणा तयार करुन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा म्हणजेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्याची शपथ घेण्याबाबत प्रबोधन केले.
जिल्हा स्तरावरुन कार्यवाही
“मी मतदान करणारच” या शपथ उपक्रमाची नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सूक्ष्म नियोजनातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी जिल्हा स्तरावरुन कार्यवाही केली. जिल्हा परिषदेकडील सर्व खाते प्रमुखांनी तालुका संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. नागरी भागामध्ये सहकारी संस्थेचे उपनिबंधक नीलकंठ करे व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ लेखाधिकारी वर्षा परीट- साळुंखे यांनी कार्यवाही पूर्ण केली.
टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी 3 ते 5 मे दरम्यान सुविधा केंद्रे कार्यान्वित
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करुन घेण्यासाठी दिनांक 3 ते 5 मे 2024 रोजी फॅसिलिटेशन सेंटर (सुविधा केंद्र) स्थापन करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
47- कोल्हापूर लोकसभा मतदार संघ
विधानसभा मतदार संघ क्षेत्र *271 गडहिंग्लजसाठी- (गडहिंग्लज, चंदगड, आजरा साठी) बचत भवन, पंचायत समिती समोर, गडहिंग्लज ता. गडहिंग्लज. विधानसभा मतदार संघ क्षेत्र *272 – राधानगरीसाठी-* (राधानगरी, भुदरगड साठी) तालुका क्रीडा संकुल, मौनी विद्यापीठ, गारगोटी. विधानसभा मतदार संघ क्षेत्र *273- कागलसाठी -* महसूल नायब तहसीलदार यांचा कक्ष, दुसरा मजला, तहसील कार्यालय कागल, ता. कागल.
47-कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील फॅसिलिटेशन सेंटर (सुविधा केंद्र) दि. 2 ते 6 मे 2024 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी शाखेत सुरु आहे. या ठिकाणी विधानसभा मतदार संघ 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर, 276 कोल्हापूर उत्तर मधील मतदारांना मतदान करता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी कळविले आहे.