काही अपरिहार्य राजकीय – सामाजिक कारणांमुळे लोकसभा निवडणुकीतून माघार
– थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांची माहिती
– निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची घोषणा
– माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात..! : लोकसभा निवडणुकीतून उसंद ; स्वंयरोजगार निर्मितीसाठी “चेतन युवा सेतू” संस्थेची स्थापना करणार
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” : विशेष प्रतिनिधी)
काही अपरिहार्य राजकीय व सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. अशी माहिती थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची मी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार
युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. तसेच थायलंडसह अशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहणार आहे. असे डॉ. चेतन नरके यांनी स्पष्ट केले.
समस्यातून कोल्हापूरची सुटका करणे हे प्रश्न सोडवणे शक्य…
डॉ. नरके म्हणाले, शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने मी १९ वर्षे अमेरिका, आशिया आणि युरोपीय देशात रहिलो. येथील प्रगत शहरांची कोल्हापूरसोबत तूलना करता, येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे ठळकपणे जाणवले. मात्र, राजकीय उदासिनता, प्रबोधन आणि अभ्यासाची कमतरता, योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा नसल्यानेच कोल्हापुरात औद्योगिक, पर्यावरणीय, रोजगार आणि सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यातून कोल्हापूरची सुटका करणे हे प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे मी अभ्यासपूर्वक जाणून घेतले. यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली.
११५० गावं आणि वाड्यावस्त्यांचा दौरा
गेली अडीच वर्षात ११५० गावं आणि वाड्यावस्त्यांचा दौरा केला. या दरम्यान, ग्रामीण व शहरातील समस्या आणि जनभावना जाणून घेतल्या. माझ्या अर्थशास्त्रीय अभ्यासाची जोड देवून “जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्युप्रिंट” तयार केली. यामाध्यमातून कोल्हापूरचा चेहरा-मोहरा बदलण्याची मनिषा घेवून मी लोकसभेच्या रिंगणात उतरलो.
कोल्हापूरकरांसमोर मांडली “माझं कोल्हापूर.. माझं व्हिजन…” ही संकल्पना
सोशल मिडियाच्या माध्यमातून “माझं कोल्हापूर.. माझं व्हिजन…” ही संकल्पना कोल्हापूरकरांसमोर मांडली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील लोकांनी कोल्हापूरला पहिल्यांदा मोठे व्हिजन असणारा उमेदवार मिळाल्याची भावना व्यक्त केली. कोल्हापूरची जनता हाच तुमचा पक्ष म्हणून रिंगणात उतरा, असा आग्रह कोल्हापूरकरांचा होता. पण, अपक्ष रिंगणात राहून या सगळ्या गोष्टी साध्य करणे शक्य नव्हते. भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊले मागे घेण्याची तयारीही आपली हवी. म्हणून या रिंगणातून माघार घेत असलो तरी कोल्हापूरच्या विकासाच्या ध्येयापासून बाजूला होणार नाही. माझ्या परीने कोल्हापूर व येथील जनतेच्या उन्नतीसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे.
कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाची ब्ल्युप्रिंट तयार
कोल्हापूरच्या शेती, उद्योग-व्यवसाय-व्यापार, रोजगार, शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यटन, पायाभूत सुविधा, युवा, कला-क्रिडा, कायदा सुव्यस्था, तंत्रज्ञान केंद्र आदी घटकांचा सखोल अभ्यास केला आहे. या क्षेत्रातील समस्या, सद्स्थिती, कारणे आणि उपायोजनांची ब्ल्युप्रिंट तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सर्वांगिण विकासाची भरारी घेवू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे.
यापुढे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहणार : डॉ. चेतन नरके.
यासाठीच मी यापुढेही राजकारण आणि समाजकारणात वेगवेगळ्या व्यासपीठावर सक्रिय राहणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरातील पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून चेतन युवा सेतू या संस्थेची स्थापणा करत आहे. सेतूच्या माध्यमातून युवकाची शैक्षणिक, आर्थिक क्षमता पाहून रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, अल्प व्याजदरात अर्थसहाय्य, कच्चा माल आणि पक्क्या मालाची बाजारपेठ आदींचे मार्गदर्शन केले जाईल. येथील एमआयडीसीतील फौंड्री उद्योगासह सर्वप्रकारच्या उद्योग व्यवसायांसाठी अशिया आणि युरोपीय देशांसोबत साम्यजस्य करारातून नवी कवाडे उघडण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरच्या जनतेने गेल्या अडीच वर्षात दिलेले पाठबळ मी कधीही विसरु शकत नाही.माझ्या या राजकीय भूमिकेने माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या कदाचित भावना दुखावल्या असतील, त्यांची माफी मागून असेच ऋणानुबंध कायम ठेवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहणार असून यापुढे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहणार आहे. असे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले.
………………………………….
कवीवर्य सुरेश भट्ट यांच्या काव्यपंक्तीतून सुचक इशारा
विझलो जरी मी आज, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही..येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही…रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर…डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. कवीवर्य सुरेश भट्ट यांच्या काव्यपक्तींने डॉ. नरके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या काव्यपंक्तीतून डॉ. चेतन नरके यांनी मागील दोन वर्षात त्यांच्याबाबतीत घडलेल्या राजकीय घटनांचा परामर्ष घेत भविष्यातील राजकीय वाटचालीकडेही अंगुलीनिर्देष केले.