“भरतनाट्यम”च्या सलग ९० मिनिटे नृत्याविष्काराने “रसिक मंत्रमुग्ध”
– सात कलाकारांनी नृत्याच्या विविध छटांचे केले सादरीकरण
– रामलीला सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण, शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी,भजन आणि श्रीराम आदी कलाविष्कार सादर
– केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित “संजीवनी” कार्यक्रमाला नृत्यप्रेमी, रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
“संजीवनी” या सलग ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमातून सात कलाकारांनी नृत्याच्या विविध छटांचे सादरीकरण केले. या अंतर्गत सात कलाकारांनी रामलीला सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण, शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी, भजन आणि श्रीराम गीत आदी नृत्याविष्कार भरत नाट्यमच्या माध्यमातून सादर केले. केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या या नेत्रदीपक नृत्याविष्काराने उपस्थित नृत्यप्रेमी, रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला नृत्यप्रेमी, रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती.
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्य डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” हा सलग ९० मिनिटे नृत्याविष्कार रंगला. रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने हा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेनन ग्रुपचे सचिन मेनन,गायत्री मेनन,रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या प्रेसिडेंट रो.कल्पना घाटगे,सेक्रेटरी शोभा तावडे, ट्रेजरर ममता झंवर,कविता नायर उपस्थित होते.
सर्व छटा या नृत्याद्वारे सादर.., अवधी भाषेतील गीताचे सादरीकरण…
पुण्य डान्स कंपनी ही एक बंगलोर स्थित डायनॅमिक डान्स कंपनी आहे ज्याचे अध्यक्ष पार्श्वनाथ उपाध्ये, बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेते आहेत. (केंद्रीय संगीता नाटक अकादमी) आदित्य पीव्ही आणि श्रुती गोपाल हे कंपनीचे सह-प्रमुख आहेत. गेल्या चार वर्षांत हा नृत्याविष्कार भारतासह जगभरात १०० हून अधिक वेळा सादर झाला आहे. पुण्य नृत्य कंपनी सक्षम विद्यार्थ्यांना भरतनाट्यम या सर्वात जुन्या कला प्रकारात उपाध्ये यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देते. पुण्य डान्स कंपनीचे नवीन काम संजीवनी आदित्य पीव्ही आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या तीन कोरिओग्राफिक कामांमधून पुढे आले आहे. अयोध्येतील लोक जे आपल्या लाडक्या राजपुत्र रामाच्या परतण्याची वाट पाहत होते, लक्ष्मण आणि मृगनयनी सीता यांना १४ वर्षांनंतर पुष्पक विमानममध्ये अयोध्येत आल्याचे पाहून त्यांचे अश्रू आवरता येत नाहीत. या उत्सवांनी दीपावलीची सुरुवात केली. दिव्यांचा उत्सव केला गेला. या सर्व छटा या नृत्याद्वारे सादर करण्यात आल्या. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून ते त्यांच्या लीला पुन्हा जिवंत करतात. ते त्यांचे मन आणि आत्मा केवळ परम भगवानालाच समर्पित करत नाहीत तर नृत्यात त्यांना त्यांचा जीवात्मा परमात्म्यात विलीन करण्याचा मार्ग सापडतो.भगवान राम जेव्हा अयोध्येत येतात तेव्हा स्वतः भगवान शिव यांनी गायलेले अवधी भाषेतील गीताचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित नृत्यप्रेमी, रसिकांना सलग ९० मिनिटे रंगलेल्या नेत्रदीपक नृत्याविष्कारने अखेरच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवले होते.