*भटक्या कुत्र्यांची आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात “दहशत”*
– खाद्यपदार्थांच्या वेस्टेज खाण्यासाठी एकत्रित कळपाने
वावर
– हॉकी स्टेडियम चौक परिसरात वाहनधारक , “मॉर्निंग वॉक” साठी येणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण
*कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).*
शहरातून उपनगरात जाण्या – येण्यासाठी असणाऱ्या प्रमुख मार्गावर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक आहे. हा प्रमुख चौक असल्याने या मार्गावरून वाहनधारकांसह “मॉर्निंग वॉक” साठी जाणाऱ्या – येणाऱ्या लोकांची दिवस-रात्र वर्दळ मोठ्याप्रमाणात आहे. आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात टाकण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या वेस्टेज खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा एकत्रित येतात. या कळपाचा परिसरात वावर आहे. हा कळप नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार तसेच वाहनधारकांच्या अंगावर जाऊन पाठलाग करणे आदी घटना घडत आहेत. दररोजच्या अशा घटनांमुळे भटक्या कुत्र्यांची परिसरात “दहशत” निर्माण झाली आहे. अनेकांनी या मार्गावरून जाणे टाळाले आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने यावर योग्य उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरली आहे.
*- छोटे-मोठे अपघात, नागरिकांत भीतीचे वातावरण*
या चौकातून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या-येणारे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांच्या अचानक व अनपेक्षित अंगावर धावून जाण्याने छोटे-मोठे अपघात घडतात. तसेच डॉग बाईटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा कुत्र्यांचा कळप अंगावर धावून येत असल्याने चावा घेतील. या भीतीने जीव मुठीत घेऊन जावे लागत. काही दिवसांपूर्वीच शहराच्या मध्यवस्तीत भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका महाविद्यालयीन युवतीला आपला जीव गमावा लागला होता. या घटनेमुळे जिल्हा आरोग्य विभाग गडबडून जागा झाला. तत्काळ उपायोजना राबवण्यासंदर्भात यंत्रांना सतर्क झाली. केंद्रीय आरोग्य पथकानेही सीपीआरला भेट देऊन संबंधित प्रकरणाची तपासणी करुन योग्य उपाययोजना संदर्भात सूचना केल्या आहेत .
*- बंदोबस्त व निर्बीजीकरण प्रभावी उपाययोजना राबवावी*
हॉकी स्टेडियम चौकासह परिसरातील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, ओम गणेश कॉलनी, रेसकोर्स नाका, ताराराणी चौक, निर्माण चौक आदी परिसरातही या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त व निर्बीजीकरण संदर्भात अजूनही प्रभावी उपाययोजना राबविण्यात आली नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिकांतून केल्या जात आहेत. याची गंभीर दखल घेत नुकताच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी निर्बीजीकरण विशेष मोहीम राबविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
*- शिल्लक राहिलेले वेस्टेज खाण्यासाठी भटक्या कुत्र्याचा वावर*
शहरासह उपनगर व ग्रामीण भागातील नागरिकांना हॉकी स्टेडियम चौक परिसरातून प्रमुख मार्गावरून प्रवास करावा लागतो. नागरिकांच्या वर्दळीमुळे या चौक परिसरात “खाऊ गल्ली” निर्माण झाली आहे. तसेच या मार्गावर व मार्गालगत असणाऱ्या प्रमुख चौकामध्ये अशा खाद्यपत्रांच्या गाड्या, हॉटेल्स व बार रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी शिल्लक राहिलेले वेस्टेज ओढ्यावरील पुल परिसरात टाकण्यात येते. यामध्ये चिकनच्या वेस्टेजचे प्रमाण अधिक असल्याने हे खाण्यासाठी या परिसरात भटक्या कुत्र्याचा वावर जास्त आहे. यामुळे या परिसरातील मार्गावरून जाणाऱ्या वर भटक्या कुत्र्यांच्या कळपाची “दहशत” निर्माण झाली आहे.
*- भटक्या कुत्र्यांचा कळप येतो अंगावर धावून*
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक व गोखले कॉलेज सायबर चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवर परिसरातील नागरिकांची दररोज सकाळी मॉर्निंगसाठी येणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच हॉकी खेळाचा सराव करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन खेळाडूंसह पादचार्यांची दिवसभर ये-जा सुरू असते. हा भटक्या कुत्र्यांचा कळप या मार्गावरून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या आबालवृद्धांसह वाहनधारकांच्या अंगावर धावून येतो. यामुळे या परिसरात जीव मुठीत घेऊन जावे लागत असून भीतीचे वातावरण आहे. तरी कोल्हापूर महापालिका प्रशासनाने यावर निर्बीजीकरणासह नियंत्रणासाठी तत्काळ प्रभावी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक वाहनदारांकडून जोर धरली आहे.
————————————–
फोटो ओळ : –
१) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमलगत असणाऱ्या ओढ्याच्या पुल परिसरात अशा प्रकारे खाद्यपदार्थांचे वेस्टेज टाकण्यात आले आहेत.
२) हॉकी स्टेडियम चौकासह परिसरातील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, ओम गणेश कॉलनी, रेसकोर्स नाका, ताराराणी चौक, निर्माण चौक आदी परिसरातही या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून दहशत निर्माण झाली आहे.