भ्रष्ट संस्था चालकांकडून एक महिन्यात “अर्थसहाय्य एकरक्कमी” वसूल करा
– शासनाचे 350 कोटीपेक्षा अधिक रुपयांचे येणे प्रकरणी लोकसेवा महासंघ व सत्यशोधक समता परिषद यांची संयुक्त मागणी
– मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषदेतून बेमुदत उपोषणासह टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर जिल्ह्यातील 257 वस्त्रोद्योग सहकारी संस्थांना विविध वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी 1995 साली शासनाकडून सुमारे 300 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. सद्यस्थितीत सर्व संस्थांचे उद्योग बंद आहेत. या बंद पडलेल्या संस्थांकडून शासनाचे सुमारे 350 कोटीपेक्षा अधिक येणे आहे. या थकीत अर्थसाहयाची महिन्याच्या आत शासनाने एकरक्कमी वसूल करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग सोलापूर यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती लोकसेवा महासंघ व सत्यशोधक समता परिषद यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत दिली.
टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष उत्तम कागले म्हणाले, अशा भ्रष्ट संचालकांचे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या, गैरकारभार व थकीत रक्कम वसुलीचा फार्स करणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने दाद व न्याय मागण्यासाठी मंगळवार दि. 19 मार्च 2024 पासून संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. तसेच याची गंभीर दखल घेऊन वन टाइम सेटलमेंट न करता आजअखेर थकीत अर्थसाहयाची रक्कम व्याज दंडासहित दिनांक 31 मार्च 2024 च्या आत वसूल करण्यात यावी., अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही, यावेळी त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला महासंघ महिला आघाडी अध्यक्ष नम्रता सुतार, प्रदेशाध्यक्षा नेहा नलवडे, दीपा मोटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन तिवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र पत्रावळी, सत्यशोधक समता परिषदेचे विजय सनदी, माधुरी कोतेकर आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.