पन्हाळगड – पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील शिवभक्तांच्या “मुक्कामाची” होणार सोय..!

- विकास आराखड्यासाठी सुमारे 15 कोटींचा निधी मंजूर : खासदार धैर्यशील माने यांची माहिती

पन्हाळगड – पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील शिवभक्तांच्या “मुक्कामाची” होणार सोय..!

– विकास आराखड्यासाठी सुमारे 15 कोटींचा निधी मंजूर

– खासदार धैर्यशील माने यांची माहिती

– शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडी, करपेवाडी, पांढरेपाणी या तिन्ही ठिकाणी उभारले जाणार “सुसज्ज हॉल” 

कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. याच परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीच्या एकछत्र योजनेअंतर्गत पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या तीन गावांमध्ये पन्हाळगड – पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील शिवभक्तांसाठी विश्रामगृह बांधण्यासाठी 14 कोटी 94 लाख 45 हजारांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या विश्रामगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे., अशी माहिती खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, युवराज काकडे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एकाचवेळी सुमारे  1200 लोकांची विश्राम व्यवस्था

पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्या शिवभक्तांकरिता शाहूवाडी तालुक्यात खोतवाडी, करपेवाडी, पांढरेपाणी या तिन्ही ठिकाणी मुक्कामासाठी सुसज्ज हॉल उभारले जाणार आहेत. करपेवाडी आणि पांढरेपाणी येथे सुमारे 550 महिला व पुरुष शिवभक्त मुक्काम करतील, अशी व्यवस्था असणार आहे. हॉलमध्ये पुरेसे स्वयंपाकगृह,  स्नानगृहे, भोजन हॉल व्यवस्था असणार आहे. खोतवाडी गावात सुमारे 225 शिवभक्त राहतील अशी व्यवस्था असणार आहे. वरील सर्व हॉलचा दर्शनी भाग ऐतिहासिक इमारतीत साजेसा असणार आहे. एकूण तिन्ही विश्राम ग्रहांमध्ये एकाचवेळी 1200  लोकांची विश्राम व्यवस्था होणार आहे.

सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रस्ताव मार्गी

पन्हाळगड – पावनखिंड मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्या शिवभक्तांच्या मार्गदर्शनाकरिता दिशादर्शक फलक, माहिती फलक, मार्गावरील गावाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधणे, मार्गदर्शनासाठी ठीक ठिकाणी सुमारे 40 फूट उंचीचे ध्वज स्तंभ उभारणे, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता पानपोई व आंबेवाडी येथे प्रगतीवर असणारे हॉल शेजारी स्वयंपाकघर बांधण्यात येणार आहे. शिवभक्तांची पावनखिंड मार्गावर भर पावसाळ्यात मुक्कामाची व्यवस्था व्हावी, यासाठी शिवराष्ट्र  हायकर्स परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी 15 जुलै 2023 रोजी आयोजित केलेल्या शिवमोहिमेत खासदार डाँ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मंगेश चिवटे, आणि युवराज काकडे यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्याकडे विकास आराखड्यासंदर्भात पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, डाँ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे समन्वयक युवराज काकडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  त्यानुसार हा प्रस्ताव मार्गी लागला.

पावनखिंड मार्गावर ऐतिहासिक फलक

सहा ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे. दहा ठिकाणी फ्लँग पोस्ट, 70 ठिकाणी साईन बोर्ड उभे केले जाणार आहेत. यामध्ये पावनखिंड रणसंग्राम इतिहासाविषयी फलकांचा समावेश असणार आहे. यापूर्वीच या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता निधीही उपलब्ध झाल्याने या विश्रामगृहाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

पन्हाळगड – पावनखिंड रणसंग्राम

पन्हाळगड पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभा करणारा शिवचरित्रातील महत्त्वाचा रणसंग्राम आहे. शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी भर पावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला होता.  त्यांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेत साधारणता 60 किलोमीटर अंतरावर असलेला खेळणा म्हणजे विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. धो – धो कोसळणारा पाऊस.. त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झालेली ढिलाई.. याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला.  पन्हाळ्याच्या पश्चिमेत असणाऱ्या एका वाटेने ते 600 मावळ्यांसह बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्धी जोहरला लागलीच.

सिद्धी जोहरने त्यांना थांबविण्यासाठी मोठे पायदळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशिद या महाराजांसारख्या दिसणाऱ्या मावळ्याला पकडले. मात्र, हे खरे महाराज नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला. शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये. यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारे आसमानी आणि पाठलाग करणारी सुलतानी संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं. अखेर सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावच लागलं. पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्धी जोहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांबले. आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले. या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू,  बांदल सेनेने आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं.

You may also like

error: Content is protected !!