रंकाळा चौपाटीच्या सौंदर्यात पडणार भर..!
– तलावासभोवती वॉकिंग ट्रॅक, पदपथ उद्यान आदी परिसरातील विकासकामे युद्धपातळीवर सुरू
– पर्यटन विकासाला मिळणार चालना
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूरच्या पर्यटन विकासांतर्गत रंकाळा तलावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे राज्यासह देशभरातून भाविक व पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविक व पर्यटक कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या रंकाळा तलावाला आवर्जून भेट देतात. त्यांना रंकाळा चौपाटीवर फेरफटका मारताना सेवा व सुविधा मुबलक प्रमाणात मिळावी, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन नेहमीच कार्यरत असते. या पर्यटन विकासांतर्गत या संपूर्ण चौपाटी परिसराचा युद्धपातळीवर विकास साधला जात आहे. या विकास चौपाटीच्या कामाच्या पूर्णत्वानंतर रंकाळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यामुळे पर्यटन वाढीस मदत मिळणार आहे.
रंकाळा चौपाटी विकास कामांतर्गत सध्या मॉर्निंग वॉकसाठी असणारा ट्रँक खोदण्यात आला आहे. खडी, लहान – मोठे दगड आदी वस्तू या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने विकास कामे सुरू असल्याने बॅरॅकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच पर्यटकांनाही चौपाटीवर फिरताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. याचा परिणाम काही प्रमाणात या परिसरात असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायावरही झाला आहे. या विकास कामांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी मागणी सर्वसामान्यतून जोर धरली आहे.
शहर परिसरातील नागरिकांची दररोज सकाळी मॉर्निंग वॉक साठी रंकाळा चौपाटीवर गर्दी होत असते. या ठिकाणी योगावर्ग, हास्य क्लब, विरंगुळा केंद्रसह विविध ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, साफसफाई मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ओपन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत असते. स्थानिक नागरिकांसह अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनाला येणारे भाविक व पर्यटक यांची दिवसभर रेशन या रंकाळा चौपाटीवर पाहायला मिळते. यामुळे या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. या पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने रंकाळा चौपाटी संपूर्ण परिसराचा विकास कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.