मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

- कोल्हापूर येथे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सहभागी यंत्रणांचा आढावा

मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा

– मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

– कोल्हापूर येथे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सहभागी यंत्रणांचा आढावा

– राज्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मतदान केंद्रावर मतदान

– लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा

– येत्या काही दिवसात होणार निवडणूका जाहीर

– मतदार जनजागृती व युवकांचा सहभाग

*भटक्या विमुक्त जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक*

कोल्हापूर : – (जिमाका – दि.27 फेब्रुवारी 2024)/ (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, अशा सूचना अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी हातकणंगले व कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदार संघातील पुर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, किरण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे, याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून घेतला. पुढे बोलताना त्यांनी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे, यासाठी तरुण, वयोवृद्ध व दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या देण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमधे दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा-सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या. लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे.  तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, अशा सूचना अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत, साहित्यिक, नाटककार आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रात्सोहित करावे. महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पालक सभेत मतदानाविषयी जनजागृती करावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान होईल, मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल, याची दक्षता घ्यावी.

आदर्श मतदान केंद्रे स्थापन करावीत

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी.

येत्या काही दिवसात होणार निवडणूका जाहीर

 निवडणूका येत्या काही दिवसात जाहीर होत आहेत. यापुर्वी मतदार यादीबाबत आलेले सर्व अर्ज व निवडणूक बाबत आलेल्या तक्रारी अगोदरच निकाली काढा. त्यामुळे निवडणूक काळातील अडचणी, तक्रारींची संख्या कमी होईल, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, आपल्या संस्कृतीचे दर्शन होईल, एका चांगल्या वातावरणात मतदान पार पडेल तसेच मैत्रीपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडेल अशी मॉडेल मतदान केंद्र उभारा. जिल्ह्यातील प्रत्येक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तीन तीन मॉडेल मतदान केंद्र उभारणार आहेत. यात फक्त महिलांसाठी, दिव्यांगांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश असणार आहे. एखाद्या सण उत्सावासारखे मतदारांना वातावरण वाटावे अशी स्थिती त्या मतदान केंद्रावर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  तसेच  ‘नारा 100 टक्के मतदानाचा’ हे अभियान हाती घेवून ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, सोसायटी सचिव, आशा या ग्रामपंचायत पातळीवरील कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदार जनजागृती व युवकांचा सहभाग

येत्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेमधे मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग घेतला जाणार आहे. युवकांना जवळून सर्व निवडणूक प्रक्रिया अनुभवता यावी व त्यांच्यात लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कॉलेजस्तरावर मोठ्या प्रमाणात मेळावे, बैठका घेवून मतदार नोंदणी बाबत व त्यांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सहभाग घेण्याच्या सूचना त्यांनी स्वीप समितीला दिल्या. मतदान प्रक्रियेत सहभागी कॉलेजमध्ये जास्त मतदान करणाऱ्या कॉलेजचा सन्मान करा, त्यांच्या स्पर्धा आयोजित करा, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या. युवा शक्तीने लोकांना मतदान करण्यासाठी गृहभेटीतून प्रोत्साहन द्यावे. तसेच चांगले काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना सन्मानितही करावे, असे ते यावेळी म्हणाले.

*भटक्या विमुक्त जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक*

जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील विविध प्रतिनिधी, संघटना व सहाय्यकारी संस्थांबरोबर श्रीकांत देशपांडे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, विविध ओळखपत्र व मतदान कार्ड याबाबत आढावा घेतला. त्या समाजाविषयी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान प्रक्रियेत समावेश होण्यासाठी त्यांना मतदार ओळखपत्राची गरज आहे. त्यांना ते वेळेत द्या. रेशन कार्ड, जातीचा दाखला याबाबतही प्रांतनिहाय आढावा श्री. देशपांडे यांनी घेतला. ते म्हणाले, शिक्षणासाठी त्यांना याप्रकारच्या कागदपत्रांची गरज आहे. त्यांची शिक्षणाची दारे उघडली तर निश्चितच हळूहळू त्यांच्या समस्याही सुटतील.

राज्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मतदान केंद्रावर मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयातील इव्हीएम प्रात्यक्षिक मतदान केंद्रावर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मतदान केले. यावेळी ते म्हणाले, राज्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुख्य निवडणूक अधिकारी प्रात्यक्षिक मतदान केंद्रावर मतदान करीत आहेत. यावेळी त्यांनी त्याठिकाणी असलेल्या नोंद वहीत मतदान केल्याची नोंदही केली.

You may also like

error: Content is protected !!