सक्षम मातृत्वामुळे सक्षम परिवारराची निर्मिती
– विश्वमांगल्य सभेच्या क्षेत्र संघटन मंत्री पूजा पाठक यांचे प्रतिपादन
– “विश्वमांगल्य सभेचा 14 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा”
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
विश्वमांगल्य सभा देव, देश, धर्म ही विचारधारा घेऊन सक्षम मातृत्व घडवण्याचे कार्य करते. त्यातूनच एक सक्षम परिवार, राष्ट्रपुरुषांची, क्रांतिकारकांची निर्मिती होते. असे प्रतिपादन विश्वमांगल्य सभेच्या क्षेत्र संघटन मंत्री पूजा पाठक यांनी केले. “विश्वमांगल्य सभेचा 14 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा” करण्यात आला. या अंतर्गत आयोजित “आई -एक करिअर” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या.
“विश्वमांगल्य सभेचा 14 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा”
विश्वमांगल्य सभा व पितांबर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंगळवारी (दि. 13 फेब्रुवारी 2024) “गणेश जयंती” रोजी दुपारी 4 वाजता “विश्वमांगल्य सभेचा 14 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा” करण्यात आला. यावेळी कोल्हापूर, कागल, कसबा सांगाव येथील विश्वमांगल्य सभेच्या कार्यकारणीच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्यांसह महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
भारतात 27 प्रांतात एकूण 6 लाख सदस्य
१९ जानेवारी 2010 ला नागपूर येथे या ईश्वरी कार्याची स्थापना झाली. आई मध्ये परमशक्ती आहे आणि त्या शक्तीचे जागरण करण्याचे कार्य गेली 14 वर्षे विश्वमांगल्य सभा करते आहे. आजअखेर संपूर्ण भारतात 27 प्रांतात एकूण 6 लाख सदस्य या कार्यात जोडले गेलेले आहेत.
नोकरी प्रमाणेच आई – मातृत्व महत्त्वाचे करिअर : क्षेत्र संघटन मंत्री पूजा पाठक
यावेळी विश्वमांगल्य सभेच्या क्षेत्र संघटन मंत्री पूजा पाठक यांनी प्रमुख वक्त्या म्हणून “आई -एक करिअर” या विषयावरील मार्गदर्शन व जनजागृतीपर प्रभावी भाषण करून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एखादी महिला नोकरी करते म्हणजे ती करिअर करते, ती सक्षम बनते, असा समज समाजामध्ये दृढ झाला आहे. मात्र, नोकरीतील करिअर प्रमाणेच पत्नी व आई बनून मातृत्वाचे करिअर अत्यंत महत्वाचे आहे. हे करियर जबाबदारीचे व संघर्षमय आहे. या करियरमुळे पुढील पिढी संस्कारित घडविण्याबरोबर परिवार सक्षम होतो. पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रपुरुष, क्रांतिकारकांच्या मातृत्वाच्या सक्षम कार्याची उदाहरणे देऊन आई – मातृत्व एक करिअर याचे महत्त्व पटवून दिले. यासाठी महिलांनी नोकरी प्रमाणेच आई – मातृत्व याकडे महत्त्वाचे व सक्षम करिअर म्हणून पाहिले पाहिजे., असेही सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वमांगल्य सभा, कोल्हापूर कार्यकारिणी अध्यक्षा उत्कर्षा पाटील होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केतकी बँकापुरे, कार्यक्रमाची प्रस्तावना विनिता नगराळे यांनी तर आभार पितांबर क्लासेसच्या संचालिका स्मिता शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास कोल्हापूर, कागल, कसबा सांगाव येथील कार्यकारणीच्या सर्व महिला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.