राष्ट्रीय “आईस स्टॉक” स्पर्धेत “कोल्हापूरचा झेंडा”

- सौरिश ऋषिकेश साळुंखेसह चौघांच्या टीमची लक्षवेधी कामगिरी

राष्ट्रीय “आईस स्टॉक” स्पर्धेत “कोल्हापूरचा झेंडा”

– सौरिश ऋषिकेश साळुंखेसह चौघांच्या टीमची लक्षवेधी कामगिरी

– “डिस्टन्स इव्हेंट” या क्रीडा प्रकारात सर्वाधिक 197 गुण मिळवत पटकवले सुवर्ण पदक

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

इंडियन आईस स्टॉक फेडरेशनतर्फे आयोजित गुलमर्ग (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या आईस स्टॉक स्पर्धेत सौरिश ऋषिकेश साळुंखेसह चौघांच्या टीमने लक्षवेधी कामगिरी केली. त्यांच्या टीमने “डिस्टन्स इव्हेंट” या क्रीडा प्रकारात सर्वाधिक 197 गुण मिळवत सुवर्ण पदक पटकविले. या यशस्वी कामगिरीमुळे “आईस स्टॉक” या क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला.

– सुवर्णपदक विजेत्या टीममधील खेळाडू असे…

सौरिश ऋषिकेश साळुंखे, यश जाधव – सरनाईक, श्रेयस कोळी, प्रथमेश सातपुते.

– उपविजेत्या गुजरातच्या संघाला 150 गुण

राष्ट्रीय खुल्या आईस स्टॉक स्पर्धेत डिस्टन्स इव्हेंट या क्रीडा प्रकारात 150 गुण मिळाल्याने दुसऱ्या स्थानावर गुजरातच्या चार खेळाडूंच्या संघाला समाधान मानावे लागले.

18 राज्यातून खेळाडूंचा सहभाग

या स्पर्धेत देशातील 18 राज्यातून सुमारे अडीचशेपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत सर्वाधिक गुण मिळवून कोल्हापूरच्या संघाने अव्वल स्थान पटकाविले.

असा झाला सौरिश साळुंखेचा शैक्षणिक व क्रीडा प्रवास ….

सौरिश सध्या डी वाय पाटील कॉलेजमध्ये इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. आईस स्टॉक राष्ट्रीय स्पर्धेत तो सलग तिसऱ्या वर्षी खेळला आहे. या खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागतो. यासाठी सरावात सातत्य व कठोर परिश्रम आवश्यक असते. पहिल्या वर्षी कास्यपदक मिळवले. तर दुसऱ्या वर्षी पदकच मिळाले नाही. याने खचून न जाता त्याने पुन्हा सरावात सातत्य राखत जिद्दीच्या जोरावर यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. या यशस्वी कामगिरीचे त्याच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. शालेय जीवनापासूनच अभ्यासासह त्याने खेळालाही तितकेच महत्त्व दिले. शालेय शिक्षण भाईसाहेब बावडेकर तर अकरावी व बारावीचे शिक्षण स्वामी विवेकानंद जुनिअर कॉलेजमध्ये सायन्स विभागातून पूर्ण केले. शालेय जुनिअर कॉलेजच्या काळात कराटे, सिकई मार्शल आर्ट (पंचकुला – हरियाणा), पिंचाक सिलान (पंजाब) आदी खेळांमध्ये विभागीय राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून पदकांची कमाई केली आहे. तर पुणे बालेवाडी, कोल्हापूर फोर्ट इंटरनॅशनल येथे झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.

You may also like

error: Content is protected !!