सामूहिक लाभासाठी वैयक्तिक लाभ बाजूला ठेवा
– प्रा.डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे प्रतिपादन
– “महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा” चा स्नेहमेळावा उत्साहात
– पुणे येथील ना नफा ना तोटा फ्लॅट प्रकल्पाचे कोल्हापुरातील पत्रकारांसाठी बुकिंग सुरू, लवकरच अधिवेशन घेणार
– कोल्हापूर शहराध्यक्षपदी नंदकुमार तेली यांची निवड
कोल्हापूर : – ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
आप-आपसातील मतभेद बाजूला ठेवून संघटना म्हणून आपण पुढे आले पाहिजे. संघटित रहा समान कार्यक्रम घेऊन सामूहिक लाभासाठी वैयक्तिक लाभ बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. संघटना असल्यास प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य होते. असे प्रतिपादन प्रा.डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोल्हापूर च्यावतीने जिल्ह्यातील सर्व सदस्य पत्रकारांची पहिली बैठक/स्नेहमेळावा सामानी हॉल,(इंजिनिअरिंग असोसिएशन हॉल) शिवाजी उद्यमनगर,कोल्हापूर येथे बुधवारी (दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत) आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे “पत्रकारितेची सद्यस्थिती” या विषयावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. जाधव म्हणाले, सद्यस्थिती ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं ठरत आहे. मीडियाबाबतीत चिंता वाटते आहे. पत्रकरिता कोणत्या पायावर उभी आहे. हे समजून घेतले पाहिजे. आपली धारणा बदलणे गरजेचे आहे. आदर्शवादी दृष्टिकोनपेक्षा सध्या व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे बनले आहे. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलेलीच माध्यमे टिकली आहेत. पत्रकार म्हणून सध्या व्यवहारिक दृष्टिकोन गरजेचा आहे. पत्रकारितेत भूमिका घेता येणे आवश्यक आहे. ती भूमिका समाजहित जोपासणारी असावी. तसेच वर्तमानपत्राची एक चौकट ठरलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर घटनेने मर्यादाही घालून दिली आहे. जबाबदारी, बांधिलकी, उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. सध्या ते दिसत नाही. समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता व बंधूता या घटनात्मक मूल्यांपासून आपण दूर चाललो आहे. पत्रकार म्हणून.. माणूस म्हणून.. मी मुल्ये मानतो, की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. मगच लोकांसमोर गेले पाहिजे. व्यवस्थेला दोष न देता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. पत्रकारांची वाढलेली संख्या हे भविष्यात सर्वात मोठे आव्हान आहे. माध्यमांची स्पर्धा, संघर्ष चांगली नाही. काय, कोणाचे चुकते, यावर विचार झाला पाहिजे. सत्य मांडणे पत्रकाराचे काम आहे. आपण स्क्रिप्ट घेऊन पुढे जात आहे. पत्रकार हा बोगस असू शकत नाही. बोगस कंटेंट असू शकतो. खरा – खोटा कंटेंट बोगस आशयाशी संबंधित आहे. योग्य कन्टेन्टसाठी धाडस दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. सत्य समोर आणण्यासाठी कस लागतो. मी पत्रकार म्हणून माझे कर्तव्य व भिडण्यासाठी एक नैतिक कणा असावा लागतो. असेही यावेळी डॉ. जाधव यांनी सांगितले.
– पत्रकाराने व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार (गुन्हेवृत्त तज्ञ) नंदकुमार ओतारी
“पत्रकारिता आणि आजची व्यवस्था” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार (गुन्हेवृत्त तज्ञ) नंदकुमार ओतारी मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी ते म्हणाले, पत्रकाराने व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. बीट पाहणाऱ्या पत्रकाराला संबंधित विभागाची उत्तम माहिती असणे गरजेचे आहे. पत्रकाराची प्रतिष्ठा जपण्याचे कार्य झाले पाहिजे. व्यक्तिगत मते बातमीमध्ये येता कामा नये. तटस्थ राहूनच बातमीदारी केली पाहिजे. आत्ताची पत्रकारिता प्रतिक्रियावादी आहे. सध्याची व्यवस्था ही कागदावर विश्वास ठेवणारी आहे., असे परखड मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच याविषयी आपल्या जीवन कार्यात घडलेल्या घटना व प्रसंगाची अनेक उदाहरणे देऊन वृत्तांकनाविषयी माहिती दिली. तसेच उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
तसेच सदर बैठकीमध्ये संघटनेची पुढील दिशा, ध्येयधोरणे तसेच जिल्हा पदनियुक्ती संदर्भात चर्चा व हितगुज करून एकमेकांची ओळख करुन देत भविष्यात पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच सहभागी पत्रकारांनी आपली ओळख देत मनोगते व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे येथील ना नफा ना तोटा फ्लॅट प्रकल्पाचे कोल्हापुरातील पत्रकारांसाठी बुकिंग सुरू, लवकरच अधिवेशन घेणार : जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे
जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संघाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत सांगताना पत्रकार बांधवांसाठी “ना नफा ना तोटा तत्वावर पुणे येथे सुरू झालेल्या फ्लॅट” प्रकल्पाबाबत माहिती देऊन कोल्हापुरात असा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती दिली. तसेच पत्रकारांनी आपल्या भविष्याबाबत डोळसपणे काम करत आपल्यासाठी कुटुंबकल्याणकारी संस्था उभा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लवकरच अशी संस्था उभी करून पत्रकार कुटुंबियांना आधार देणारी संस्था उदयास आणणार असल्याची माहिती दिली. तसेच या स्नेहमेळाव्याला शहर व जिल्ह्यातून सर्व माध्यमातील पत्रकारबांधव उपस्थित होते. सर्वांचा नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन लवकरच अधिवेशन घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
महिलांचा लक्षणीय प्रतिसाद
या स्नेहमेळाव्याला महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या काळात ही संघटना भरीव काम करणार असल्याचे दिसून येते. सदर कार्यक्रमाला युवा पत्रकार संघाचे शिवाजी शिंगे, अनिल म्हमाने तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मनोगताच्या भाषणातून मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ पत्रकार अनुराधा कदम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भूमिका, कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवून उपसितांची मने जिंकली.
कोल्हापूर शहराध्यक्षपदी नंदकुमार तेली यांची निवड
या स्नेहमेळाव्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये कोल्हापूर शहराध्यक्षपदी नंदकुमार मारुतीराव तेली, जिल्हा संघटकपदी विनोद नाझरे, उपाध्यक्षपदी अनिल पाटील, सचिवपदी नवाब शेख आदींचा समावेश आहे. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नंदकुमार तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून शहराध्यक्षाची जबाबदारी पार पाडत पत्रकारांच्या शेवटच्या घटकाच्या मूलभूत प्रश्नांना सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सदस्यांची “मोफत सभासद नोंदणी” करण्यात आली. त्याला शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्नेहमेळाव्याला उपस्थित पत्रकारांना सकाळचा नाष्टा व दुपारी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.