“महाराष्ट्र ग्रंथ भांडार”तर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
– संयोजक नीलाम्बरी कुलकर्णी व ऋतुपर्ण कुलकर्णी यांची माहिती
– “महाराष्ट्र ग्रंथ भांडार” च्या ८८ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजन
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
सांस्कृतिक, साहित्यिक व आध्यात्मिक क्षेत्रात कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रभर पोहोचविणाऱ्या *महाराष्ट्र ग्रंथ भांडार* तर्फे ८८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी २०२४ या संपूर्ण महिन्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत नव्या-जुन्या पुस्तकांच्या किंमतीत सवलतींबरोबर, सर्व प्रकारच्या नव्या साहित्याचे प्रकाशन, नवलेखकांना मार्गदर्शन व पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य यांसह अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली आहे. अशी माहिती संयोजक नीलाम्बरी कुलकर्णी व ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उपक्रमांबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, अनेक वाचकांची सध्याची तक्रार आहे की, सध्या पूर्वीसारखी पुस्तके प्रकाशित होत नाहीत किंवा लिहिली जात नाही. आणि ती मिळत सुद्धा नाहीत. असे सुजाण वाचक टिकवण्यासाठी आणि नवीन घडवण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडार दि. १६ फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचे संकलन सुरू करत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे काही पुस्तके असतील आणि ती तुम्हाला योग्य त्या वाचकांपर्यंत पोहोचावावी असे वाटत असेल आणि त्यासाठी तुम्हाला ती देणगी स्वरूपामध्ये द्यायची इच्छा असेल तर महाराष्ट्र ग्रंथ भांडार अशी पुस्तके गोळा करत आहे. आणि काही शाळा अथवा योग्य अशा गरजू संस्थांना ही पुस्तके देण्यात येतील. ही पुस्तके कोणतीही भाषा किंवा विषयावरील असतील तरी चालतील. पुस्तकांचे संकलन २९ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील.
नवीन लेखक घडवण्याची जबाबदारी
८८ व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन लेखक घडवण्याची जबाबदारी सुद्धा महाराष्ट्र ग्रंथ भांडार घेत आहे. त्यासाठी त्यांना लेखन मार्गदर्शन आणि प्रकाशन सहाय्य केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. सध्याच्या गरजेनुसार नवीन प्रकाशने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची मागणी वाढवण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापर केला जाईल. म्हणजे आमच्या वेब साईटवर याची माहिती दिली जाईल.
१९३६ सालापासून कुलकर्णी यांची तिसरी पिढी आज या पुस्तक प्रकाशन आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत
१९३६ साली रथसप्तमीच्या दिवशी देशहित व समाज प्रबोधनासाठी योगदान देण्याच्या भूमिकेतून गोविंदराव तथा दादा कुलकर्णी यांनी नवीन लेखक घडवण्याची जबाबदारी केले. कोल्हापुरातील सर्वात पहिली प्रकाशन आणि मुद्रण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या या संस्थेचा विस्तार पुणे आणि मुंबईतही झाला.आणि ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ या नावाला महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झाला. कुलकर्णी यांची तिसरी पिढी आज या पुस्तक प्रकाशन आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
सर्वोदयी तसेच समाजवादी विचारसरणीच्या नामवंतांची जशी महाद्वार रस्त्यावरील ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ मध्ये वर्दळ असते, तसेच धर्मशास्त्र, इतिहास व तर्कशास्त्र अभ्यासकही नियमाने महाराष्ट्र ग्रंथ भांडारमध्ये येत असतात. डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे लेखन दादांनी पाठपुरावा करून मिळवून प्रकाशित केले. आणि त्यांच्यासारखी कादंबरीकार मराठी साहित्याला मिळाली. मालतीबाई दांडेकर, स्नेहलता दसनूरकर, वसंत नारगोलकर, प. स. देसाई, श्रीपाद जोशी अशा अनेकांचे लेखन ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ ने त्यावेळी पहिल्यांदा पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.
आजअखेर सुमारे तीस पुनर्मुद्रणे ..
खलील जिब्रान यांच्या ‘प्रॉफेट’ सारख्या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीपाद जोशी यांच्याकडून करून घेऊन तो ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ ने प्रकाशित केला. कदाचित जिब्रानच्या ‘प्रॉफेट’ चा तो मराठीतील पहिलाच अनुवाद असावा. संस्कृत भाषा व साहित्य याविषयी गो.के.भट यांची ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ ने प्रकाशित केलेली पुस्तके त्या काळात गाजली. आणि काही ठिकाणी अभ्यासक्रमाचा भाग बनली. संस्कृत पंडित ग. बा. दंडगेशास्त्री यांची अनेक सूक्ते आणि डाॅ. काकाजी देशमुख यांची उपनिषदे ही दुर्मिळ पुस्तके महाराष्ट्र ग्रंथ भांडारने प्रकाशित करून अभ्यासूंनी सातत्याने उपलब्ध करून दिली. प्राचार्य द.गो.दसनूरकर यांनी लिहिलेल्या ‘आपले महाभारत’ च्या खंडांना आजही मागणी असल्याने अलिकडेच ‘आपले महाभारत’ ची नवी आवृत्ती दोन खंडात, अतिशय देखण्या स्वरूपात तरीही माफक किंमतीत प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे प.पू. डोंगरेमहाराज यांची भागवतावरील प्रवचने *श्रीमद् भागवत रहस्य* या ग्रंथाद्वारे प्रकाशित केली असून भाविकांकडून सतत मागणी असणाऱ्या या ग्रंथाची आजअखेर सुमारे तीस पुनर्मुद्रणे झाली आहेत.
नव्या-जुन्या पुस्तकांच्या किंमतीमध्ये लक्षणीय सवलत
प्रा. शशिकांत कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशन व विक्रीबाबत आपल्या वडिलांचाच वारसा पुढे चालवला होता. तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित यांची तत्त्वज्ञानविषयक, तसेच प्रा. शशिकान्त यांची स्वतःची तर्कशास्त्रावरील पुस्तके, जी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अभ्यास क्रमात अंतर्भूत झाली, अशा आणि अनेक उच्च दर्जाच्या ललित पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी केले. गीता प्रेसच्या पुस्तकांच्या विक्रीत व्यवसाय म्हणून काही नफा नसल्याने सहसा अन्य पुस्तक दुकानांत ती ठेवली जात नाहीत, पण ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ ने एखादा वसा घेतल्याप्रमाणे गीता प्रेसची व इतर धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक पुस्तके तशी आवड असणाऱ्या ग्रंथप्रेमींना पुरवित राहणे सुरू ठेवले. परिणामी ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ कडे धार्मिक व तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांचे विक्री केंद्र म्हणून पाहण्यात येऊ लागले. ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ चे हे वैशिष्ट्य कायम ठेवून आता दुकानात ललित साहित्यासह सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच प्रकाशन विभागाला नवी झळाळी येईल अशा योजना राबविण्यात येणार आहेत. असा वैभवशाली इतिहास असलेल्या ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ चा अठ्याऐंशीवा वर्धापन दिन रथसप्तमी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरा होत आहे. याचे औचित्य साधून संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर अनेक नव्या-जुन्या पुस्तकांच्या किंमतीमध्ये लक्षणीय सवलत दिली जाणार आहे.
साहित्यिक तसेच ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा
‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ आता नव्याने सर्व प्रकारचे दर्जेदार साहित्य पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ सारख्या प्रकाशन संस्थेकडून आपले पुस्तक आकर्षक स्वरुपात प्रकाशित व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या साहित्यिकांनी त्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ शी संपर्क साधून त्याबाबतच्या योजना जाणून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. अनेक लोकांच्या गाठीशी विलक्षण जीवनानुभव असतात. ते पुस्तक रूपात सर्वांसमोर यावेत अशी इच्छाही असते, पण लेखनाची कला अवगत नसते. अशा नवलेखकांनी व लेखक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ‘महाराष्ट्र ग्रंथ भांडार’ शी संपर्क साधल्यास त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे. वेळोवेळी अशा नव्या योजना जाहीर केल्याञ जातील. त्यांचा साहित्यिक तसेच ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस प्रसाद जमदग्नी उपस्थित होते.