महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे
: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
– _शाहू मिल येथील कलादालनांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट_
कोल्हापूर, दि. 2 फेब्रुवारी 2024 : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान, कोल्हापुरातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कलादालनांचा समावेश असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब – सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
नूतन जिल्हाधिकारी येडगे यांनी सहभागी उद्योजकांशी संवाद साधला
नूतन जिल्हाधिकारी येडगे यांनी शाहू मिलला भेट देऊन महासंस्कृती महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर येथे उभारण्यात आलेले महाराष्ट्र संस्कृती दर्शन दालन, शिवकालीन आज्ञापत्रे व इतर पत्रव्यवहार दालन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन, गडकोट किल्ले छायाचित्र प्रदर्शन दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दालन, पारंपरिक वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबूकाम) दालन, कृषीविषयक उत्पादन दालन, पर्यटक विषयक दालन, ऐतिहासिक पुस्तके, ग्रंथ दालन, हस्तकला प्रदर्शन (मातीकाम) आदी दालनांना भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली व सहभागी उद्योजकांशी संवाद साधला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व अश्विनी जिरंगे, तहसीलदार स्वप्नील रावडे, चेतन नरके, सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, ऋषिकेश केसकर, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
महोत्सवातील कलादालने 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत राहणार खुली
महासंस्कृती महोत्सवातील कलादालने 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत खुली असणार आहेत. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करुन देणाऱ्या या महोत्सवात सहकुटुंब सहपरिवार, नातलग व मित्र परिवारासह जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केले.