सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विभागस्तरीय प्रशिक्षणाला सुरूवात
(पुणे, दि.५ / कोल्हापूर : लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी )
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे आयोजित करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव राकेश सैनी, उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल, छत्तीसगडचे उप मुख्य मतदार नोंदणी अधिकारी यु.एस.अग्रवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
बुटोलिया म्हणाले, निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे. निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी निवडणूक पूर्वतयारीचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण सर्वांसाठी एक संधी असून सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शंकेचे निरसन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात निवडणूक प्रक्रीयेत काही बदल झाले आहेत. निवडणूक प्रक्रीया योग्यरितीने पार पाडण्यासाठी या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही याकडे लक्ष द्यावे आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार काम करावे. प्रशिक्षणाच्या निमित्ताने यापूर्वीच्या निवडणूकीतील अनुभवाची देवाणघेवाण करावी, अशा सूचना बुटोलिया यांनी दिल्या.
उपायुक्त लड्डा म्हणाल्या, समन्वयक अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी टाळता येतील. प्रशिक्षणादरम्यान टपाली मतपत्रिका, आदर्श आचारसंहिता, निरीक्षक पोर्टल, पेड न्यूज, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, खर्चाचे नियंत्रण, मूल्यमापन, नामांकनाची छाननी आदी विषयांवर माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांचे लाभणार मार्गदर्शन
प्रशिक्षणामध्ये सय्यद नासिर जमील (झारखंड), रियाज बट्ट (जम्मू-कश्मिर), अपर जिल्हाधिकारी मृणालिनी सावंत, उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाते, देबी प्रसाद मोहंती (ओडिसा), आर.सी.दास (आसाम) आदी मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणाला विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.