देशाच्या अर्थकारणात बचत गटांचे योगदान : पालकमंत्री हसन मुश्रीफ
– स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंच्या विभागस्तरीय विक्री प्रदर्शनात प्रतिपादन
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली). (दि. २ फेब्रुवारी 2024)
महिला बचत गटांच्या सदस्यांना अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज, बचत आणि गुंतवणुकीवर परतावा स्वरूपात बँकांकडून मदत मिळते. आर्थिक सहाय्याशिवाय त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे शक्य नाही आणि महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या राहणीमानात सुधारणा करतात. या उद्देशाने बांगलादेशात बचत गटांची चळवळ उभी राहिली. या पद्धतीचा स्वीकार सर्व जगाने केला. बचत गटांचे महत्व का आहे ? बचत गटांच्या प्रदर्शनाची गरज का आहे हे त्यांनी सुरु केलेल्या विविध व्यवसायातून दिसून येते. म्हणून बचत गटांचे देशाच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन ना. हसन मुश्रीफ मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान अंतर्गत कोल्हापूर येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंच्या ताराराणी महोत्सव 2024 या विभागस्तरीय विक्री प्रदर्शनात प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सहसंचालक एमएसआरएलएम तथा प्रकल्प संचालक डीआरडीए सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, कार्यकारी अभियंता प्रसाद बारटक्के, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोरकर यांचेसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महोत्सव दि.2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार
यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, ७ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातून आलेल्या महिलांच्या पदार्थांची व वस्तूंची चांगली विक्री व्हावी. देशातील एकूण लोकसंखेच्या ५० टक्के महिला आहेत. महिलांनी मनावर घेतल्यास व व्यवसाय करायचे ठरविल्यास काय बदल होतो हे या प्रदर्शनावरून दिसून येत आहे. कोल्हापूरची ओळख जागतिक स्तरावर पोहचवणारी कोल्हापुरी चप्पल, सेंद्रिय गूळ, कोल्हापुरी फेटा तसेच दुग्धजन्य पदार्थ आहेत. आता या वस्तूंची विक्री ऑनलाइन होवू लागली आहे. बचत गटांना खऱ्या अर्थाने आपल्या बँकांनी पाठबळ दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महाराणी ताराराणी व जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन झाली. कार्यक्रमात बचत गटांना अर्थ सहाय्य करून आपले उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच महाआवास मधे चांगले काम करणा-या ग्रामपंचायती, तालुके व अधिकारी यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. हा महोत्सव दि.2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे.
प्रदर्शने, महोत्सवातून बचत गटांसाठी मूल्यवर्धन : जिल्हाधिकारी अमोल येडगे
बचत गटांची उत्पादने अंतिम ग्राहकाला विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी प्रदर्शने व महोत्सव बचत गटांसाठी मूल्यवर्धनाचे काम करतात. आणि यात दरवर्षी वाढ व्हावी तसेच बचत गटांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. बचत गट व उमेद साठी येत्या काळात अधिकचे पाठबळ पालकमंत्री यांच्या सहाय्याने देऊ असेही ते पुढे म्हणाले. कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर या पहिल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास मिळाले याचा आनंद झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी बचत गट मोहीमेचा इतिहास सांगून पुर्वी आणि आता बचत गटांना अर्थिक सहाय्य मिळण्यासाठी होणारे त्रास याबद्दलची माहिती दिली. याचबरोबर ते म्हणाले, बचत गटांसाठी आणि प्रसिद्धी देणारी माध्यमे यांच्यासाठी सुरु असणा-या पुरस्कारांचे अनुदान शासन स्तरावरून मिळत नाही. जर अर्थिक स्वरूपात अनुदान दिले तर त्यांना प्रोत्साहन मिळेल व अजून या प्रक्रियेला गती येईल. जिल्हयात होणा-या या विभागीय प्रदर्शनातून निश्चितच कोल्हापूर मधून प्रतिसाद मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा देसाई यांनी केले तर आभार मनीषा देसाई यांनी मानले.
विभागस्तरीय ताराराणी महोत्सवातील या वर्षीची खास वैशिष्ट्ये
या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दहा दालन केली आहेत. यामध्ये गोड दालन – गुळ, मध, गुळ पावडर, मसाले दालन – कांदा, लसून चटणी, तिखट चटणी, मिलेट दालन – तृण धान्य, कडधान्य, नाचणी, रागी, घरगुती उत्पादने दालन – पापड, लोणचे, कुरडई, शेवया, वन अमृत दालन करवण, जांभूळ, आंबा जाम, सिरप, पल्प, डेअरी आणि बेकरी दालन – खवा, बर्फी, बेकरी पदार्थ, ज्वेलरी आणि गारमेंट्स दालन, लेदर उत्पादने दालन – शूज, चप्पल, कोल्हापुरी चप्पल, हस्तकला दालन – बांबू व मातीपासून बनवलेल्या वस्तू व भोजन स्टॉल दालन – तांबडा-पांढरा रस्सा, शाकाहारी, मांसाहारी जेवण, नाष्टा इ. अशाप्रकारे खवय्यांसाठी मेजवानी असणार आहे. या दहा दालनामध्ये एकूण २०० स्टॉलचे नियोजन केले असून त्यापैकी १४५ वस्तू स्वरुपातील व ५५ खाद्याचे आहेत. त्यापैकी विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण वस्तूंचे एकूण ५० स्वयंसहाय्यता समूह सहभागी झाले आहेत. सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
बचत गटांना अर्थसहाय्य केलेल्या बँकांच्या अधिका-यांचा सन्मान
अग्रणी बँकचे गणेश गोडसे, केडीसीसीचे एम डी शिंदे, नाबार्डचे आशितोष जाधव, इतर बँकांमधे राजकुमार सिंग, रविंद्र माने, प्रमोद शिंदे, त्र्यबंक माने, सादिक, चेतन पाटील, नितीन जाधव, सचिन म्हस्के, शिवाजी अडनाईक, राजीव गुप्ता, किशोर पाटील यांचा सन्मान केला.
प्रसिद्धीबाबत वृत्तपत्र प्रतिनिधींचा सन्मान
यात दै.पुढारीचे विकास कांबळे, दै.लोकमतचे समीर देशपांडे, दै.सकाळचे सुनिल पाटील, तरुण भारतचे कृष्णात चौगुले, पुण्यनगरीचे चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.
अमृत महा आवास अभियान 3.0 जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार
प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम – गगनबावडा, व्दितीय- शाहूवाडी व राधानगरी व तृतीय पन्हाळा व आजरा यांना मिळाला. राज्यपुरस्कृत आवास योजनेत प्रथम – भुदरगड, व्दितीय- गडहिंग्लज व आजरा व तृतीय कागल व करवीर. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रथम – राधानगरी तालुक्यातील कारीवडे, व्दितीय भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर व तृतीय कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द, राज्यपुरस्कृत आवास योजनेतून प्रथम – आजरा तालुक्यातील उत्तूर, व्दितीय- हातकणंगले तालुक्यातील रुई व तृतीय -पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी यांना दिला.