“भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शना”त चार दिवसात झाली १८ कोटींची उलाढाल..!
– प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शनस्थळी शेतकऱ्यांनी व नागरिकांची अलोट गर्दी
– तब्बल साडेपाच लाख शेतकऱ्यांसह नागरिकांनी दिली भेट
कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार ).
शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी गेली १५ वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली. २६ जानेवारीस सुरू झालेल्या या भीमा कृषी व पशू पक्षी प्रदर्शनाची सांगता सोमवारी झाली. अखेरच्या दिवशी ( दि.२९ जानेवारी २०२४) रोजी अलोट गर्दीत झाली. भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल १८ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज असल्याचे संयोजकांनी सांगितले.
– सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांनी व नागरिकांनी दिली भेट
भीमा कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित ४०० कंपन्याचा सहभाग होता. २०० महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही लोकांनी गर्दी केली होती.तांदळाची उंच्चांकी विक्री झाली. चार दिवसात महिलां बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून ५५ लाखांची उलाढाल झाली आहे. यात अमृता घोटणे यांनी ४६ हजार उत्पन्न फिश फ्राय मधून घेतले तर सुरया मुकादम यांनी बिर्याणी मधून ६६ हजार उत्पन्न घेतले. त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीसाठी लागणारे साहित्य व धान्य ,बी बियाणे यांची खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. चार दिवसात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक, इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांनी व नागरिकांनी भेट दिली.
“लाडू नावाचा नंदी” ठरला आकर्षण…
प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून राष्ट्रपती पदक मिळविलेला, अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पानिपत येथील हरियाणा चॅम्पियन गोलू टू रेडा, अडीच फूट उंचीची गाय,१०० किलो वजनाचा वैताळ बिटल (मेल), फायटर कोंबडा, वाशी येथील ९५ किलोचा दीड वर्षाचा बिटल बकरा,७० किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसाचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस खास आकर्षण ठरली.मसाई पठार येथील सागर महाडिक यांच्या केदरलिंग गोशाळेतील सहा वर्षाचा कौंनक्रेज जातीचा सुमारे १२०० किलो लाडू नावाचा नंदी हा आकर्षण ठरला. याचबरोबर गाय आणि बैल, पांढरा बैल, रावण नावाचा ६ फूट २ इंच लाल कंधारी वळू,नांदेड येथील बैल,साडेचार फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस खास आकर्षण ठरले.
– गिनिपिक चिनी कोंबड्या,बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण
जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे पांढरे ससे,भीमा फार्म मधील ब्लॅक जॉक,सुलतान नावाचा घोडे,कडकनाथ कोंबड्या, लव बर्ड आफ्रिकन फिशर,बर्ड,सेल,क्रोकोटल, पपेट,गिनिपिक चिनी कोंबड्या,बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहेत. याचबरोबर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,शंकेस्वरी दीड फूट लाल मिरची,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरली. देशी आणि विदेशी भाजीपाला ज्यात ढबू मिरची उदगावची केळी, व्हनूर नांदणी येथील देशी केळी,मुळा,,भेंडी,वांगी, पपई,हिरवा व लाल कोबी,निशिगंध फुल,घट्ट गुलाब फुल लांब देठ असलेले गुलाब फुल आदी आकर्षण ठरले व नवनवीन भाजीपाला लोकांना पाहता आला. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे, विमा योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी शेती करायची यासह कृषी विभागाच्या वतीने शेतीविषयक विविध मॉडेल प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. याचबरोबर विहिरीचे मॉडेल ही मांडण्यात आले होते. शेतकऱ्यांना याची माहिती घेता आली.
मार्गदर्शनपर झालेली व्याख्याने अशी…
जैविक खतांचा पूरक वापर फायदेशीर या विषयावर प्रा. कृषी महाविद्यालय कोल्हापूर डॉ. रवी कानडे यांनी मार्गदर्शन केले.
वरिष्ठ कृषी तज्ञ सुरेश मगदूम लागवडी मध्ये केळी महत्वाचे पिक आहे.आरोग्यासाठी सफरचंद पेक्षा ५ पटीने केळीचे महत्व आहे जळगावच्या तुलनेत सांगली आणि कोल्हापूर मधील वातावरण पोषक आहे.उत्पादन चांगले मिळते .सशक्त व रोग मुक्तीची केळीची रोपे जैन इरिगेशन कंपनी पुरविते.त्यामुळे ऊस पीक बरोबर केळीचे उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन केले. तर प्लॅस्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचे आधुनिक साधन या विषयावर व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले यांनी मार्गदर्शन करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग,क्रॉप कव्हर यांचा शेतीत उपयोग करावा असे सांगितले.या सर्वांचे स्वागत प्रा.जे.पी.पाटील यांनी केले. शेतक-यांसाठी कृषि प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीची सोय करण्यात आली होती.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात गेल्या चार दिवसात विक्री झालेला शेतमाल …
१) सेंद्रीय गूळ : २५०० kg
२) इंद्रायणी तांदूळ : ३७०० kg
३) आजरा घनसाळ : ५७०० kg
४)रत्नागिरी २४ तांदूळ :- ३२०० kg
५)दप्तरी तांदूळ :- २२०० kg
६) सेंद्रीय हळद : ६५० kg
७) नाचणी व नाचणी पदार्थ : ९५०० kg
८)जंगल मध :- ८०० kg
९)करवंद सरबत :- ७५० लिटर
१०)काकवी :- ४५० लिटर
११)बेदाणे :- ७२० kg
१२)केळी :- ८५० kg.
प्रयोजक रिलायन्स पोलिमर्स हे होते. तर कोल्हापूर
कृषी विभाग महाराष्ट्र शासन,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले. संयोजन भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक व हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांनी केले होते.
हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भीमा कृषी प्रदर्शनात माहिती
इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे खासदार धनंजय महाडिक यांची अपेक्षा
प्रदर्शनात बेस्ट ऑफ द चॅम्पियन ठरला हरियाणा येथील नरेंद्र सिंह यांचा गोलू २ मुऱ्हा जातीचा रेडा
चॅम्पियन ऑफ द शो नेर्ली येथील सागर विलास पाटील यांचा कोसा खिलार खोंड ठरला.
हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली. भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची ओळख करून दिली जाते.याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहनही ना. अजित पवार यांनी केले. शेती क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत. अवकाळी पाऊस, वातावरणात बदल होत चाललेले आहेत त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी आणि त्यांना शासन स्तरावर मदत होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचेही ना.पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ना.पवार यांनी दूध व्यवसाय द्राक्ष व्यवसाय अडचणीत आलेले आहेत ग्राहकांच्या फायद्यासोबत उत्पादकाचाही फायदा होणे आवश्यक आहे याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचा शासन स्तरावर प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करण्यावर भर दिला पाहिजे. येणारा काळ शेतीमध्ये बदल करण्याचा काळ असून त्या काळानुरूप शेतकऱ्यांनी नवनवीन अवजारांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हार्वेस्टरला सबसिडी देण्याकरता आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांनी दर्जेदार पीक बाजारात आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते “बेस्ट ऑफ द चॅम्पियन हरियाणा येथील नरेंद्र सिंह यांचा गोलू २ मुऱ्हा जातीचा रेडा ठरला”. *चॅम्पियन ऑफ द शो नेर्ली येथील सागर विलास पाटील यांचा कोसा खिलार खोंड ठरला.* *भीमा जीवन गौरव पुरस्कार डॉ.सुनील बाबुराव काटकर यांना देण्यात आला.*
यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सध्या महिला पुरुषांच्या बरोबरीने शेती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गाव पातळीवर सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सुविधांचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असे सांगितले.
प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा
यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा कसा होईल याची माहिती दिली जाते यातून शेतकऱ्यांना वेगवेगळे ज्ञान मिळते असे सांगून आज पाऊस कमी पडत आहे, पाणीटंचाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हान आहेत
ही आव्हाने पेलण्यासाठी अनेक शासकीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. शिवाय सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत इथेनॉलचे प्रकल्प महत्त्वाचे आहेत इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे असे सांगितले.
बक्षीस वितरण समारंभ व सांगता
सांगता बक्षीस वितरण समारंभ व सांगता प्रसंगी व्यासपीठावर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक,आमदार राजेश पाटील,राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित नाना कदम, आदिल फरास,राहुल चिकोडे,सौ. रूपा राणी निकम,सौ.अरुंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक.विश्वराज महाडिक, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्याजित भोसले आदी उपस्थित होते.यावेळी आभार कृष्णराज महाडिक यांनी मानले.
*प्रदर्शनात देण्यात आलेले पुरस्कार*
*कृषी सेवारत्न अधिकारी व कर्मचारी*
सुनीता पांडुरंग लोकरे,विठू भरमा खोत,चंद्रशेखर सीताराम सुळगांवकर,रामचंद्र भगवान पाटील,उमेश श्रीपती सकटे, डॉ.नीलकुमार ऐतवडे,मंगल परीट,मोहिनी प्रकाश वाळेकर, बंडा कुंभार,हरिदास डाफळे
*कृषी तंत्रज्ञान आदर्श मॉडेल उभारणी पुरस्कार*
सुपरकेन व ऊस पाचट मॉडेल तालुका कृषी अधिकारी करवीर (प्रथम क्रमांक), अपघात विमा तालुका कृषी अधिकारी भुदरगड आणि आयएमपी मॉडेल तालुका कृषी अधिकारी कागल यांना (विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला)., व्हर्टीकल्चर मॉडेल तालुका कृषी अधिकारी हात गले हातकणगले (तृतीय क्रमांक).
*जिजामाता शेतीभूषण पुरस्कार*
सेंद्रिय शेतीवर नावीन्यपूर्ण अवलंब केलेल्या आजरा येथील सौ.सुप्रिया युवराज पाटील(प्रथम क्रमांक), पश्चिम महाराष्ट्रातील पहिला स्पिरूनीलिना शेवाळ प्रकल्प राबविलेल्या सौ.दिपाली कुलदीप खोत (द्वितीय क्रमांक), दोन एकर शेतीत ऊस आंतरपीक भाजीपाला लागवड केलेल्या नागाव येथील सौ. सुजाता रंगराव तोरस्कर (तृतीय क्रमांक).
*पीक स्पर्धा भाजीपाला निकाल*
मध्याळ येथील आप्पांना निजलिंग गुरव यांची संकेश्र्वरी लाल मिरची आणि नांदणी येथील संदेश भरत पाटील यांची हिरवी मिरची यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. तर तळसंदे येथील दिपक राजाराम वांगीकर यांचा ( कोबी द्वितीय क्रमांक), दानोळी येथील राहुल तात्यासो पाराज (घेवडा तृतीय क्रमांक) अनिरुद्ध हरी नाईक यांच्या विदेशी भाजीपाला(प्रथम क्रमांक), सिधनेली येथील अमित बाबुराव मगदूम आणि बिरदेववाडी येथील संभाजी राजाराम खरात यांचा विदेशी भाजीपाला यांना विभागून (तृतीय क्रमांक)देण्यात आला.तर सावर्डे तर्फ येथील राहुल बळवंत बच्चे यांच्या विदेशी भाजीपाला यास (तृतीय क्रमांक)देण्यात आला.
मोजे वडगाव येथील भाऊसो आण्णा सो वाकरेकर यांचा (माईनमुळा प्रथम क्रमांक), मुंगळी येथील रमेश पराप्पा यांची (खाऊची पाने द्वितीय क्रमांक), कुंभारवाडी येथील युवराज विठ्ठल कुंभार यांचा शाबूकंद यांच्या भाजीला यास तृतीय क्रमांक मिळाला आहे.आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर बिनदाती अदात खिलार खोंड गट,दोन दाती खिलार खोंड गट, सहा दाती खिलार खोंड गट, जूळूक खिलार खोंड, अदात खिलार कालवड, दोन दाती खिलार कालवड, चार दाती खिलार कालवड, खिलार गाय गट, गीर गाय गट,काँकरेज गट, लाल कंधारी कालवड गट,लाल कंधारी गाय गट, मुरहा रेडा गट,मुरा रेडी गट, पंढरपुरी म्हैस गट आदी पुरस्कार देण्यात आले.