“ग्राममंत्रालय” पुस्तक गावाच्या विकासासाठी उपयुक्त
– पुस्तकाचे लेखक व निवृत्त ग्राम विकास अधिकारी शंकर केंबळकर यांचा विश्वास
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासूनच्या 28 वर्षांच्या काळात ग्रामसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे वस्तुनिष्ठ शब्दांकन आपण “ग्राममंत्रालय” या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर आणले आहे. ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना हे पुस्तक उपयुक्त असून गावाचा विकास साधण्यासाठी निश्चित उपयोग होईल., असा विश्वास या पुस्तकाचे लेखक व निवृत्त ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी बोलताना केंबळकर म्हणाले, या पुस्तकाचा विषय आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेतील आपल्या दालनात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले., ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. पुढे बोलताना त्यांनी ज्या जिल्हा परिषदेत आपण कार्यरत होतो. तेथील आयएएस दर्जाचे अधिकारी असलेल्या व्यक्तीने वयाच्या 87 व्या वर्षी आपण केलेल्या कामाची नोंद घेतली ही आपल्या कामाची पोच पावती असल्याचेही उद्गार यावेळी त्यांनी काढले.
यानंतर बोलताना स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रूज यांनी ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या आधी खेडी स्वयंपूर्ण करायची असतील तर शंकर केंबळकर यांनी आपल्या पुस्तकात नोंदवलेली निरीक्षणे आणि तपशीलवारपणे सुचविलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरतील.,असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाच्या कुठल्याही निधीवर अवलंबून न राहता ग्रामीण भाग स्वयंपूर्ण आणि सशक्त करण्यासाठी लेखक केंबळकर यांनी सुचवलेल्या योजना अत्यंत प्रभावी असल्याचे मतही यावेळी जॉर्ज क्रूज यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले, 28 वर्षे जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली असल्याने ग्राम विकासाच्या त्यांच्या कल्पना पुस्तक रूपाने नेमक्या रीतीने मांडल्या गेल्याने त्याचा भविष्यात निश्चित रूपाने उपयोग होऊ शकेल., असा दावा यावेळी त्यांनी केला. यावेळी शाहू छत्रपती फाऊंडेशनचे सचिव जावेद मुल्ला उपस्थित होते.