रंकाळा टॉवर परिसरात मनपाची अतिक्रमण विरोधी मोहीम
– शुक्रवारी सकाळी अतिक्रमणित शेड्स, टपऱ्या हलवल्या
– रंकाळा चौपाटी परिसरामध्ये युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
कोल्हापूर महानगरपालिकातर्फे रंकाळा चौपाटी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी रंकाळा टॉवर परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून परिसरातील अतिक्रमणित शेड्स व टपऱ्या हलविल्या. यामुळे रंकाळा टॉवर परिसराने काही अंशी मोकळा श्वास घेतला आहे. या मोहिमेचे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
देशभरातून कोल्हापुरला भेट देणारे पर्यटक व श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा पुरविण्यासंदर्भात शहरात विकास साधला जात आहे. पर्यटक व भाविक कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणारा रंकाळा येथे आवर्जून भेट देतात. याचा विचार करून रंकाळा चौपाटी परिसराची स्वच्छता मोहीम महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी जाऊळाचा गणपती मंदिरासमोर रंकाळा टॉवर परिसरात अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमणित शेड्स व टपऱ्या काढल्यामुळे या परिसराने आता मोकळा श्वास घेतला आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम व अतिक्रमण विरोधी मोहीम राबविल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य समाधान व्यक्त केले जात आहे.