अंगणवाडी सेविका व मदतनीस “कडकलक्ष्मी रुपात”..!
– बेमुदत संपाच्या 35 व्या दिवशी जिल्हा परिषद घेराव व अनोखे आंदोलन
– महावीर उद्यान ते जिल्हा परिषद मोर्चा
– आंदोलकांना धमकवल्या विरोधात जिल्हा परिषद सीईओंना कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे निवेदन
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस 4 डिसेंबर 23 रोजीपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेमुदत संपावर आहेत. या बेमुदत संपाच्या 35 व्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयास घेराओ आंदोलन करण्यात आले. महावीर उद्यान ते जिल्हा परिषद मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस “कडकलक्ष्मी रुपात” सहभागी झाल्या होत्या.
जिल्हा परिषद येथे मोर्चा आल्यानंतर शासनाचे प्रलंबित मागण्यांकडे व धमकी विरोधात लक्ष वेधण्यासाठी आमच्या सेविका कडकलक्ष्मी रुपात अनोखे आंदोलन करून जिल्हा परिषदेला घेराव घातला. यानंतर जिल्हा परिषद सीईओ यांना युनियनतर्फे निवेदन देण्यात आले.
सोमवारी ( दि. 8 जानेवारी 2024) रोजी दुपारी बाराच्या सुमारास महावीर गार्डन येथे जमून जिल्हा परिषद येथे मोर्चा नेण्यात आला. जिल्हा परिषद सीईओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस या 4 डिसेंबर 2023 रोजीपासून आजअखेर प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. या काळात सेविकांच्या वतीने राज्यभर विविध आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनाकडून कोणतीही मागणी मान्य झालेली नाही. या उलट सेविका व मदतनीस यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. तसेच सेविकांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. अशाप्रकारे धमकावणे ही बाब निषेधार्य आहे. त्यांच्याविरोधात आम्ही “घेराव आंदोलन” छेडले असल्याची माहिती निवेदनामध्ये दिली आहे.
तसेच या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तीव्र झालेल्या भावना लक्षात घेऊन शासन पातळीवरून या मागण्या मान्य करण्याबाबत प्रयत्न करावेत व आपल्या कार्यालयामार्फत चाललेले धमकावण्याचे प्रकार थांबवावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. महावीर उद्यान ते जिल्हा परिषद या मोर्चा व अनोख्या आंदोलनात कॉम्रेड आप्पा पाटील, जयश्री पाटील, शोभा भंडारे, विद्या कांबळे, सुनंदा कुराडे, मंगल माळी, आदींसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतीस यांनी शेकडोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.