तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनातर्फे प्रयत्न सुरू..!
– अर्थसहाय्य, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, मानधन तत्वावर नियुक्ती तसेच अन्य सोयीसुविधा देवून तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणावर दिला जाणार भर
– जिल्ह्यात आजपर्यंत 128 तृतीयपंथीयांनी केली नोंदणी
– 116 व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र
– राज्यात आतापर्यंत सुमारे 3 हजार 495 तृतीयपंथी व्यक्तींनी समाजकल्याण विभागाकडे केली नोंदणी
– तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी सन 2023-24 या वर्षासाठी सुमारे 15 कोटी रुपयांची तरतूद
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 128 तृतीयपंथीयांनी नोंदणी केली असून 116 व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले आहे. तृतीपंथीयांना अर्थसहाय्य, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, मानधन तत्वावर नियुक्ती तसेच अन्य सोयीसुविधा देवून तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे.
तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी सुमारे 15 कोटी रुपयांची तरतूद
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे 3 हजार 495 तृतीयपंथी व्यक्तींनी समाजकल्याण विभागाकडे नोंदणी केली असून यापैकी 2 हजार 482 व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले आहे. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी सन 2023-24 या वर्षासाठी सुमारे 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यांपैकी 23 लाख रुपयांचा निधी या विभागाने खर्च केला आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील (जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर) यांनी दिली आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण
तृतीयपंथी म्हणून जन्मास येणे हे एक हार्मोन असंतुलन असून हा कुठलाही रोग, आजार किंवा दैवी कोप नाही. तरीही समाजात त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तृतीयपंथीयांना प्राथमिक, सामाजिक आणि मानवीय सोयी-सुविधा देवून समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी शासनाच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याणासाठी महामंडळाची निर्मिती करुन याद्वारे त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
समाजकल्याण विभागाचे विशेष प्रयत्न
तृतीयपंथीयांसाठी विभागीय स्तरावर आधार आश्रम सुरु करणे, त्यांचे स्वावलंबन व विकासासाठी बीज भांडवल, लाभार्थ्यांना शरद आरोग्य वाहिनी (Mobile Clinic) आदी योजनांचा लाभ देणे तसेच मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या चार ठिकाणी प्रत्येकी एक आधारआश्रम (Shelter Home) सुरु करण्यासाठीही विभागाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. तथापि, तृतीयपंथीयांची संख्या व माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची अडचण येत होती. यासाठीच राज्यात सातत्याने शिबिरांचे आयोजन करुन नावनोंदणी करणे, ओळखपत्र देणे, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र देवून त्यांना घरकुलासह अन्य विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गाव, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्या गठीत केल्या आहेत. यासंबंधी राज्यभरात व्यापक जनजागृती करण्यात आली असून त्यामुळे सामाजिक बदलांची सुरुवात देखील झाली आहे. यातूनच तृतीयपंथीयांना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून येत्या काळात त्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तृतीयपंथीयांच्या जनजागृतीसाठी सांस्कृतिक संमेलने, कार्यशाळा, शिबीरे घेण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नोंदणीवर भर
कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांची नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटवर अर्ज सादर करुन घेण्यात येत आहेत. या पोर्टलवर तृतीयपंथीयांची नोंद करुन घेण्यासाठी राज्यात सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. यात एकाच दिवशी 67 तृतीयपंथीयांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी केली. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांसह सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नियोजनबध्द प्रयत्न केले आहेत. सध्याही तृतीयपंथीयांना विविध विषयांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्यात प्रशिक्षण देण्यात आलेल्या 6 तृतीयपंथीय प्रशिक्षणार्थ्यांना निवडपत्र देण्यात आली होती. जिल्हा व तालुकास्तरीय शिबिरे आयोजित करुन कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 128 तृतीयपंथी व्यक्तींनी नोंदणी केली असून आतापर्यंत 116 व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नियोजनबध्द प्रयत्न
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व तत्कालीन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले. तसेच बैठका व कार्यशाळांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या मनात स्वाभिमान जागृत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी, पूर्वापार चालत आलेला जीवन जगण्याचा मार्ग बदलण्यासाठी आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तृतीयपंथीय व्यक्ती, गुरु व चेले यांच्या सहकार्यातून मार्गदर्शन करण्यात आले. विविध विभागांसह राज्यस्तरीय तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या सदस्य स्व. ॲड दिलशाद मुजावर, मयुरी आळवेकर, जिल्हास्तरीय समिती सदस्य अमृता सुतार, प्रिया उर्फ स्वप्नील सवाईराम तसेच तृतीयपंथीय व्यक्तींना सहभागी करुन घेतले. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांच्या कलागुणांनुसार प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी व सन्मानाची वागणुक मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक नोंदणी होण्यासाठी प्रशासनाने नियोजनबध्द प्रयत्न केले.
तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार
तृतीयपंथीयांच्या सबलीकरणाची गरज ओळखून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. पालकमंत्री तथा केडीसीसी बँकेचे अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली केडीसीसी बँकेने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व यापाठोपाठ तालुकानिहाय गावागावांत तृतीयपंथीयांच्या बचतगट स्थापनेला चालना देण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्या हस्ते तृतीयपंथीयांच्या महिला बचत गटांना बँकेचे पासबुक वितरीत करण्यात आले होते. बँकेच्या वतीने बचत गटांना उद्योग, व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात तृतीयपंथीयांचे ६५ बचत गट स्थापन झाले असून ३५० हून अधिक तृतीयपंथीय या बचत गटांच्या माध्यमातून बँकेशी जोडले आहेत. या बँकेने आतापर्यंत पाच बचत गटांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे कर्जपुरवठा केला असून विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांनी कर्जफेडही पूर्ण केली आहे, ही विशेष बाब आहे. तृतीपंथीयांच्या सबलीकरणासाठी अशा प्रकारचा कौतुकास्पद उपक्रम राबवून कोल्हापूर जिल्ह्याने आदर्श घालून दिला आहे. तृतीयपंथीयांना माणूस म्हणून सन्मानाने जगता येण्यासाठी त्यांच्या सबलीकरणाची गरज आहे. त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. तृतीयपंथीयांच्या बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
कौशल्य प्रशिक्षणावर भर
तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक माहिती घेवून त्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कौशल्य शिक्षण देवून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्या प्रबोधनासाठी सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाच्या छंद व आवडीनुसार त्यांना शेळीपालन, मेकअप आर्टीस्ट आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. तृतीयपंथीयांना सबल बनवण्याच्या हेतूने सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात दोन तृतीयपंथीयांना मानधन तत्वावर घेण्यात आले होते.
माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुविधा
तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूरच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात माहिती कक्ष स्थापन केला असून माहिती यासाठी 0231-2651318 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना नॅशनल पोर्टलवरील ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ या हेल्पलाइनच्या माध्यमातून मिळवून देण्यात येत आहे.
इचलकरंजीचे पाऊल पुढे
तृतीयपंथीयांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात सर्वात आधी इचलकरंजीत पावले उचलण्यात आली. इचलकरंजीच्या तत्कालीन नगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी 25 लाखाच्या निधीची तरतूद करुन हा निधी राखीव ठेवला आहे. या निधीतून तृतीयपंथीयांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, बीज भांडवल अथवा इतर अनुषंगिक संबंधित तृतीयपंथीयांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकास करण्यासाठी खर्च करण्याची तरतूद केली आहे. तृतीयपंथीयांचा संवेदनशील विचार करुन इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) मध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती केली आहे. तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय व इचलकरंजीत त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देवून आदर्श घालून दिला आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क
तृतीयपंथी व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा देण्याबरोबरच त्यांना कायदा व सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी व याविषयी सहकार्य मिळवून देण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. तृतीयपंथीयांच्या कलागुणांनुसार त्यांना प्रशिक्षण देवून रोजगार निर्मितीसाठी त्या-त्या भागात नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच तृतीयपंथीयांसाठी वसतिगृह उभारण्यासाठीही जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या तृतीयपंथी व्यक्तींनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. तृतीयपंथीयांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित वेबसाईटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तृतीयपंथी व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन महत्वपूर्ण उपाययोजना करत आहे. तृतीयपंथीयांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात दिशादर्शक पावले उचलण्यात येत असून यातून निश्चितच सकारात्मक बदल साधला जाईल.