ऐतिहासिक दसरा चौकात आज “मराठा आरक्षण जागर” आंदोलन

- सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांची माहिती

ऐतिहासिक दसरा चौकात आज “मराठा आरक्षण जागर” आंदोलन

– सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांची माहिती

– हिवाळी अधिवेशनात टिकणारे मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर  : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात साधक-बाधक चर्चा होणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षण संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण संदर्भात सकारात्मक ठोस निर्णय व्हावा. या मागणीकडे मराठा आमदारांसह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवार दि. 7 डिसेंबर 2023 रोजी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये “मराठा आरक्षण जागर” आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाचे व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दसरा चौकामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाच्या ठिकाणी बुधवार दि. 6 डिसेंबर 2023  रोजी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना बाबा इंदुलकर म्हणाले, टिकणारे मराठा आरक्षण कसे देणार ? या संदर्भात जनतेबरोबर चर्चा करून वकील व समाज यांच्यातील चर्चेचा उहापोह विधिमंडळात करावा. आरक्षण न मिळाल्यास कोल्हापुरातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून येणाऱ्या मंत्र्यांना घेराव घालण्यात येणार आहे. यानंतर सुभाष जाधव म्हणाले मराठा मतदारांची किंमत दाखवण्याची वेळ आली आहे. आरक्षण कसे देणार हे सांगावे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मराठा मतदानाची किंमत दाखवून देऊ, असा इशारा दिला. यानंतर विजय देवणे व सारथी कृती समिती अध्यक्ष संभाजी खोत यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असून 38 दिवस झाले तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच आंदोलन मोडीत काढण्यासाठी परीक्षा जाहीर केल्या आहेत. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे आवाहन केले. अन्यथा मशाल मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, सभासद व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

You may also like

error: Content is protected !!