कोल्हापुरात आज मराठा योद्धा मनोज जरांगेंची “मराठा आरक्षण” जाहीर सभा

- सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

कोल्हापुरात आज मराठा योद्धा मनोज जरांगेंची “मराठा आरक्षण” जाहीर सभा

– सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

– सभेला लाखोंची उपस्थिती : ऐतिहासिक दसरा चौकात एकवटणार “सकल मराठा समाज”

– छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज 4 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

ऐतिहासिक दसरा चौक येथे आज शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे यांची “मराठा आरक्षण” जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेला लाखोंच्या उपस्थितीत कोल्हापुरातील सकल मराठा समाज एकवटणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.

महाराष्ट्रातील आंदोलनाला मिळणार आणखी बळ व व्यापक साथ

यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा, सभेची तयारी व मनोज जरांगे यांचा कोल्हापूर दौरा याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी ठरणार आहे. तसेच यामुळे महाराष्ट्रातील आंदोलनाला आणखी व्यापक साथ मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली आहे.

फक्त मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे होणार भाषण

मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे दुपारी तीन वाजता छत्रपती ताराराणी चौक येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर चौक मार्गे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापर्यंत येणार आहे. त्याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून ऐतिहासिक दसरा चौकातील सभास्थळी येणार आहेत. व्यासपीठावर येतात मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या भाषणाला सुरुवात होईल. अन्य कोणाचेही भाषणे होणार नाहीत.

सुसज्ज स्टेज व बैठक व्यवस्था

सभेच्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याखाली सुसज्ज स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच दसरा चौकाला येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर व मैदानावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभा स्थानापासून एक किलोमीटर ऐकू येईल अशी साऊंड सिस्टीम व्यवस्था बसवण्यात आली आहे. तसेच मोठ्या चौकात आठ ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली आहेत. यावरून सभेचे थेट प्रक्षेपण होणार असून यामुळे सभा ठिकाणापासून लांब असणाऱ्या सभेच्या ठिकाणी उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे भाषण पाहता येणार आहे.

मराठा समाज बांधवांना आवाहन

सभेच्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी भगवी टोपी, भगवे झेंडे, उन्हाळा लक्षात घेता नॅपकिन, पाण्याची बाटली सोबत आणावी. सभा संपल्यानंतर सभा स्थळे झालेला कचरा गोळा करून शांतपणे घेऊन जाण्याचा आहे., असे आवाहनही यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या पत्रकार परिषदेवेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!