पालकांनो.. विद्यार्थ्यांवर ध्येय लादू नका…

- रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. जी डी यादव यांचे आवाहन

पालकांनो.. विद्यार्थ्यांवर ध्येय लादू नका…

– रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. जी डी यादव यांचे आवाहन

प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली ).

मुलांनी काय बनावे हे त्यांना न ठरवू देता सध्या आई-वडीलच मुलांचे ध्येय ठरवत आहेत. यामुळे मुलांची स्वप्ने, ध्येय विरत आहेत. हे जर थांबवायचे असेल तर पालकांनी, मुलांना प्रोत्साहन द्यावे, स्वत:ची ध्येये मुलांवर लादू नयेत, असे आवाहन रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. जी डी यादव यांनी केले.

कोल्हापुरातील दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा व माजी विद्यार्थी संघाच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (दि.९ नोव्हेंबर २०२३) आयोजित कार्यक्रमात डॉ. जी डी यादव बोलत होते.

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूपेंद्र शहा होते. प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. जी डी यादव यांनी शालेय जीवनातील आठवणींचा पट उलगडत हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. जी डी यादव म्हणाले, अर्जूनवाडसारख्या भागातून मी आलो. पण माझ्या आई-वडिलांनी मला पूर्ण मोकळीक दिली. तू जे करशील तेच अंतिम ही भूमिका ठेवल्याने मी मनासारखा घडलो. ‘तू जे करशील त्या आनंदात आम्हालाही सामील करून घे’ इतकी प्रांजळ भावना माझ्या पालकांची होती. सध्या मात्र, नको त्या ध्येयाला महत्व दिले जाते. संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी बक्षीस द्यायला हवीत, अशी सूचना करत डॉ. यादव यांनी स्वत: पाच लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली.

यावेळी नियामक मंडळाचे चेअरमन अरूण डोंगरे, व्हा.चेअरमन उदय सांगवडेकर, उपस्थित होते. एस.आर. डिंगणकर यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जोशी व ऐश्वर्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जी.एस.जांभळीकर यांनी आभार मानले.

 मुलींना मोफत शिक्षण द्या : डॉ. जी डी यादव.

सरकारने मुलींना बालवाडीपासून ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण मोफत द्यायला हवे, असे झाले तर मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतील, सक्षम बनतील. त्यांच्या शिक्षणामुळे हुंड्याचा प्रश्न अपसूकच निकाली निघेल,  या शब्दांत डॉ. यादव यांनी मुलींच्या शिक्षणाबद्दची भूमिका मांडली. भविष्यात वायू, हायड्रोजन व सूर्य या तीन शक्तीच आपल्याला वाचवू शकतील, त्यासाठी आपण सजग राहायला हवे, यावेळी त्यांनी सांगितले.

–  यांचा झाला विविध पुरस्कारांनी गौरव

संस्थेच्यावतीने वंदना डेळेकर, सूर्यकांत बर्गे (संघवी विद्यालय), संजीवनी देशपांडे (नू.म. विद्यालय), नीलम देशपांडे, धनंजय पाटील (पाटणे हायस्कूल), प्रशांत जाधव (प्रायव्हेट हायस्कूल), प्रसाद जोशी, वेदिका पवार, चैत्राली पुरेकर, बाळासाहेब काटकर या उपक्रम शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

You may also like

error: Content is protected !!