क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांमुळे जीवन घडले
– मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ यांचे प्रतिपादन
– शिक्षक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज ४ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शालेय जीवनापासूनच खडतर प्रवासात खिलाडूवृत्तीने कुठेही न डगमगता मला अधिक सक्षम बनवण्यास मदत झाली. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे माझे करिअर व जीवन घडले . आणि आज मी मुख्याध्यापक या मानाच्या व जबाबदारीच्या पदापर्यंत येऊन पोहोचलो. असे प्रतिपादन कोल्हापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ यांनी केले.
शिवाजी पेठ येथील भारत मंदिर हॉलमध्ये मुख्याध्यापक विवेक हिरेमठ व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने रविवारी ( दि. २९ ऑक्टोबर २०२३) आयोजित शिक्षक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यशस्वी होण्यात सर्व श्रेय क्रीडा शिक्षकांचे : मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ
यावेळी बोलताना मुख्याध्यापक हिरेमठ म्हणाले, प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत गेलो. त्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मी आज यशस्वी ठरलो आहे. जीवन कार्याचा प्रवास खडतर होता. कितीही अडचणी आल्या तरी खिलाडूवृत्तीमुळे व क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यावर सहज मात करत गेलो. खेळामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि करिअर घडण्यास मदत झाली. याचे सर्वस्वी श्रेय प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांचे आहे., असे म्हणून ते काही काळ भावुक झाले. यावेळी त्यांनी जीवनात घडलेल्या अनेक घटना व प्रसंग सांगून जीवनकार्याचा आढावा घेतला.
क्रीडा शिक्षकांचे सदैव ऋणी : कोजिमाशि पतसंस्थेच्या संचालिका व शिक्षिका शितल हिरेमठ
यानंतर त्यांच्या पत्नी कोजिमाशि पतसंस्थेच्या संचालिका व शिक्षिका शितल हिरेमठ म्हणाल्या, विवेकानंद यांनी मला दिलेल्या प्रोत्साहन व खंबीर साथीमुळे मी आज एक सक्षम शिक्षका बनली आहे . त्यांच्या खिलाडूवृत्ती स्वभावामुळे आजपर्यंतची कुटुंबाची यशस्वी वाटचाल केली आहे. याबद्दल त्यांना घडवणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे सदैव ऋणी आहे, असे भावनिक मत व्यक्त केले.
क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : उपस्थित मान्यवर
याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शारीरिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ यांच्या क्रीडा क्षेत्रातील व त्यांच्या पत्नी कोजिमाशि पतसंस्था संचालिका व शिक्षिका शितल हिरेमठ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच खेळाडू क्रीडाशिक्षक हा मुख्याध्यापक झाला तर काय करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ असे गौरव उद्गारही यावेळी मान्यवरांकडून काढण्यात आले. हिरेमठ यांनी खेळाचा दर्जा सुधारत शैक्षणिक दर्जाही सुधारण्यावर भर दिला. यामुळे शालेय विद्यार्थी खेळाडूही घडला आणि शैक्षणिक प्रगतीही होऊन करियर घडण्यास मदत झाली.
अनुभवाची देवाणघेवाण व जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक हा अध्यापनाच्या कामाबरोबर मैदानावर ही सरावात विद्यार्थ्यांबरोबर मेहनत घेत असतो. मैदानावर होणारा वेळ याचे तो कधीही मोजमाप करत नाही. प्रसंगी कुटुंबातील व्यक्तींना वेळ न दिल्यामुळे घरात वादाचे प्रसंग ही उद्भवतात. यावर खिलाडूवृत्तीने मात करत सक्षम व दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी मैदानावर वेळेचाही विचार न करता परिश्रम घेत असतो. सुट्टीच्या दिवशी क्रीडा क्षेत्रातील कार्य करणारे व क्रीडा शिक्षकांना एकत्र करून त्यांचे अनुभव व क्रीडा क्षेत्रातील कार्याची चर्चा करण्यासाठी मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ व त्यांच्या कुटुंबीयांनी उस्फूर्तपणे क्रीडा शिक्षकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. अशा प्रकारचा स्नेहमेळावा आयोजित करून क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. तसेच हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेऊन त्यांनी उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचे एक प्रकारे दर्शनच घडवून आणले असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच यापुढे ही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहनही केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील कार्याचे अनुभवाची देवाणघेवाण व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तसेच यापुढे पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी कोजिमाशि पतसंस्थेचे चेअमन बाळ डेळेकर, व्हा चेअरमन प्रकाश कोकाटे, सर्व संचालक, कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक व शिक्षक नेते माननीय दादा लाड, न्यू ए्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव सूर्यकांत चव्हाण, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष आर डी पाटील, उपाध्यक्ष सयाजी पाटील, सुभाष पवार त्याचबरोबर तवनाप्पा पाटणे हायस्कूलचे मुख्याध्यापक, प्रायव्हेट हायस्कूलचे मुख्याध्यापिका, शारीरिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कोल्हापूर हायस्कूलचा संपूर्ण स्टाफ तसेच सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी मंडळी, मुलगा वेदेश हिरेमठ व हिरेमठ कुटुंबीय यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक सयाजी पाटील, धनंजय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकारी टीमने विशेष परिश्रम घेतले.