“दख्खनचा राजा”ची आज दिमाखदार आगमन मिरवणूक
– दिलबहार तालीम मंडळ गणेशोत्सव (2023) समिती अध्यक्ष जनार्दन पाटील यांची माहिती
– श्री मंगलमूर्ती मिरवणुकीत पारंपारिक वाद्य “धर्मरक्षक 60 वादकांचे ढोल पथक”, दिलबहार तालीम मंडळाच्या युवक – युवतींचे लेझीम पथक अशा लवाजम्यासह भगवे फेटे परिधान करून महिला वर्ग सहभागी होणार
– बिंदू चौक ते गणेश मंडप पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
दिलबहार तालीम मंडळाच्या “दख्खनचा राजा” श्री मंगलमूर्ती पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिमाखदार आगमन मिरवणूक उद्या रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बिंदू चौक येथून निघणार आहे. , अशी माहिती गणेशोत्सव 2023 समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
– लक्षवेधी “धर्मरक्षक 60 वादकांचे ढोल पथक”
“दख्खनचा राजा”ची आगमन मिरवणूक बिंदू चौक ते दिलबहार तालीम मंडळ गणेश मंडप अशी निघणार आहे. श्री मंगलमूर्ती मिरवणुकीत पारंपारिक वाद्य “धर्मरक्षक 60 वादकांचे ढोल पथक”, दिलबहार तालीम मंडळाच्या युवक – युवतींचे लेझीम पथक अशा लवाजम्यासह भगवे फेटे परिधान करून महिला वर्ग सहभागी होणार आहेत.
– आगमन मिरवणूक मार्ग असा…
बिंदू चौक, आझाद चौक मार्गे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल कडून कपडे गल्लीमधून गणेश मंडपामध्ये मूर्तीचे आगमन होणार आहे.
– वॉटरप्रूफ आकर्षक भव्य मंडप
कुलदैवत श्री जोतिबाचे बिरुद घेतलेला “दख्खनचा राजा” श्री गणेश मूर्ती आहे. गणेशोत्सवासाठी मंडळाने यंदाच्या वर्षी 18 फूट लांबी, 40 फूट रुंदी तसेच 24 फूट उंचीचा वॉटरप्रूफ असा आकर्षक भव्य मंडप उभारला आहे.
– सिंहासनारूढ “दख्खनचा राजा” श्री गणेशमूर्ती
मुंबई येथील कलात्मक शिल्पकार सतीश वळीवडेकर व त्यांच्या टीमने कोल्हापूर मध्येच सुंदर नक्षीदार प्रभावळीसह अठरा फूट उंचीची सिंहासनारूढ “दख्खनचा राजा” श्री गणेशमूर्ती साकारली आहे. यंदाची गणेश मूर्ती दिलबहार परिवारातील सदस्य उद्योजक जनार्दन रघुनाथ पाटील यांच्या देणगी रूपातून मंडळाला लाभली आहे.
– यंदाचा गणेशोत्सव : आध्यात्मिक धर्मोत्सव
यंदाचे धार्मिक आकर्षण परमेश्वराच्या अस्तित्वाचे अनुभूती देणाऱ्या शिवशक्ती (चार धाम) स्थानांचे अध्यात्मिक दर्शन होणार आहे. यामध्ये केदारनाथ : उत्तराखंड राज्यांमध्ये असणारे तीर्थक्षेत्र, श्री अमरनाथ : काश्मीर प्रदेशांमध्ये असणारे तीर्थक्षेत्र, वैष्णव देवी : उत्तर भारतातील पवित्र स्थान व सप्तशृंगी : महाराष्ट्रातील देवीचे तीर्थक्षेत्र आदींचा समावेश आहे.
– अध्यात्मिक स्थानांचे दर्शन सर्वांना घेता येणार
अध्यात्मिक स्थानांचे दर्शन सर्वांना घेता यावे, यासाठी शिवशक्ती स्थानांच्या प्रतिकृती 8 फूट उंच तर 14 फूट लांब आहेत. या प्रतिकृतीचे थ्री डीमध्ये दर्शन भाविकांना लाभणार आहे. या आकर्षक प्रतिकृतींचे डिझाईन पवन कुंभार आणि बरखत सय्यद या युवकांनी अतिशय कलात्मकरित्या साकारलेले आहे.
– गणेशोत्सव काळातील धार्मिक कार्यक्रम
श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पंचायतन याग देवतांची उपासना, अथर्वशीर्ष पठण , श्री गणेश मंगल आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सामाजिक जाणीवेतून विविध सामाजिक उपक्रम व शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता गणेश मंडपातून श्री मंगलमूर्तीची सवाद्य मिरवणूक निघून प्रमुख विसर्जन मार्गामध्ये सहभागी होणार आहे.
या पत्रकार परिषदेला दिलबहार तालीम मंडळ अध्यक्ष विनायक फाळके, माध्यम संपर्क प्रतिनिधी पद्माकर कापसे, गणेशोत्सव समिती उपाध्यक्ष ओंकार खराडे, मेघराज पवार, खजानिस आदित्य साळुंखे सह खजानिस समर्थ माळी, सेक्रेटरी पवन काळगे आदींसह गणेशोत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.