हिमालयातील “हनुमान तिब्बा” शिखरावर कोल्हापूरचा झेंडा…!
– एसटी कंडक्टर गिर्यारोहक “अमोल” व टीमने केली मोहीम फत्ते
– उंच व अवघड समजले जाणारे “माउंट हनुमान तिब्बा शिखर”
– लक्षवेधी कामगिरीचे गिर्यारोहकांसह सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव
कोल्हापूर : (मानस न्यूज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
हिमालयातील उंच व अवघड समजले जाणारे “माउंट हनुमान तिब्बा शिखर” एसटी कंडक्टर गिर्यारोहक “अमोल” व टीमने प्रथमच मोहीम फत्ते करण्याची लक्षवेधी कामगिरी पार पाडली.
यामुळे “हनुमान तिब्बा” शिखरावर कोल्हापूरचा झेंडा फडकला. या लक्षवेधी कामगिरीचे गिर्यारोहकांसह सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
– उंच व अवघड समजले जाणारे “माउंट हनुमान तिब्बा शिखर”
हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पंजाल रांगेच्या मध्यवस्तीत असलेले आणि या भागातील सर्वात उंच आणि अवघड समजले जाणारे माउंट हनुमान तिब्बा शिखर. हे शिखर ५ हजार ९८२ मीटर ऊंच (१९ हजार ६२६ फुटांचा) आहे. ५ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूरच्या अमोल आळवेकर व त्यांच्या तीन साथीदारांच्या टीमने यशस्वीरित्या सर केले. जगातील काही मोजकीच लोक या शिखरांवर पोचली असून त्याच यादीत आता या टीमचा समावेश झाला आहे.
– यांनी पार पाडली यशस्वीरित्या मोहीम
पाच सदस्यांपैकी चार सदस्यांनी अनुक्रमे मोहीम नेता मंगेश बाळू कोयंडे (डोबिवली), मोहीम उपनेता अमोल अशोक आळवेकर (कोल्हापूर), इक्विपमेंट इन्चार्ज अरविंद नेवले (रत्नागिरी), डेप्युटी इक्विपमेंट इन्चार्ज मोहन हुले (रायगड) यांनी यशस्वीरित्या मोहीम पार पाडली.
यांचे लाभले मोहिमेसाठी मार्गदर्शन…
या मोहीमेसाठी गिरीमित्र प्रतिष्ठान, राज्यातील विविध ठिकाणच्या अनुभवी गिर्यारोहकांचे तर डाएट प्लॅन व आवश्यक व्यायामाचे नियोजन कॉमर्स कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रकुल महादेव मांगोरे – पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
१५ जुलैला टीम परत पोहोचली मुंबईला
हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वीज बंदमुळे मोबाईल इंटरनेट सेवा बंद, पाणी, इंधन, फळे, भाजीपाला नव्हता. काही दिवस बुरूवा गावातच थांबुन १५ जुलैला टीम मुंबईला तर मी कोल्हापूरला १६ जुलैला पोहचलो.
– मोहिम फत्ते करणारे कोल्हापुरातील पहिले गिर्यारोहक
माउंट हनुमंत हे अत्यंत अवघड शिखर सर करणारे अमोल अशोक आळवेकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गिर्यारोहक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी ठरले आहेत.
– “हनुमान तिंबा” चित्तथरारक मोहीम गिर्यारोहक अमोल यांनी केलेले वर्णन असे …!
(२२ जून ते ११ जुलै २०२३ या कालावधीतील प्रवास वर्णन ).
माऊंट हनुमान टिब्बा शिखराची विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा …!
२४ जूनला पहाटे मनाली येथे बुरवा गावात मोहिमेतील सर्व सदस्य दाखल झाले. हवामानाशी जुळवून घेण्यासाठी ओल्ड मनाली व जोगणी धबधब्याचा ट्रेक पूर्ण केला. मनाली परिसरात विपर जॉय वादळाचा वादळाच्या तडाख्यामुळे पाऊस सुरूच होता. त्यामुळे सर्वानुमते शिखर चढाई मोहीम दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. २६ जूनला सर्व सामानाची पॅकिंग, स्नो शूज आणि क्रॅपोन ची नीट बारकाईने तपासणी केली. २७ जूनला बकरर्थाच पर्यंत रेकी ट्रेक पूर्ण केला. वातावरणासह परिसराचा अंदाज घेऊन टीम परत बुरुवा गावात परत आली. २८ जूनला सकाळी ९ वाजता क्लाइंबिंग टीम, गाईड, पोर्टर, कूकसह टीम दोन गाड्यातून बुरुवा गावातून धुंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. धुंदी गावात पोहचल्यावर मोठे व वजनी सगळे सामान घोड्यावर टाकून स्वतःच्या सॅक पाठीवर घेऊन सकाळी १० च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. पुढे बकरर्थाच मार्गे दुपारी १.१५ वाजता भोजपथर येथे टेन्ट लाऊन कॅम्प तयार केला. दुपारी जेवण उरकून भोजपथर टॉप पर्यंत हाईट गेनिंग ट्रेक पूर्ण करून परत भोजपथर कॅम्प येथे रात्री मुक्काम केला. २९ जूनला गाईड आणि पोर्टर यांनी ३ वेळा लोड फेरी करून सगळे सामान भोजपथर वरून मोरेन मार्गे टेंटू पास बेस कॅम्प येथे पोहचवले. दुपारी पूर्ण टीमने ट्रेक करून सगळा कॅम्प टेंटू पास बेस कॅम्प येथे शिफ्ट केला. सायंकाळी हाईट गेनिंग ट्रेक पूर्ण करून टेंटू पास बेस कॅम्प येथे मुक्काम केला. ३० जूनला सकाळी सगळ्या गिर्यारोहणामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्यांची, सूर्य – चंद्र, बियास कुंड, माऊंट हनुमान टिब्बा शिखराची विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. मोहिमेच्या सुरक्षितरित्या प्राथर्ना केली. स्नो क्रॉफ्ट, आइस क्रॉफ्ट आणि फॉल अरेस्ट पद्धतीचा सराव केला. रात्री सर्वांनी टेंटू पास बेस कॅम्प येथे मुक्काम केला.
रात्रभरचा ट्रेक आणि हेवी स्नो फॉलचा थरार…!
१ जुलैला गाईड व पोर्टर यांनी टेंटु पास रूटवर काही अवधड ठिकाणी रोपची अँकरिंग पूर्ण केली. मार्ग सुरक्षित केला. टेंटु पासची रेकी केली. काही सामान कॅम्प १ वर सोडून आले. रात्री सर्वांनी टेंटू पास बेस कॅम्प येथे मुक्काम केला. २ जुलैला सकाळी ६.३० सुमारास टेंटू पास बेस कॅम्प ते कॅम्प १ अश्या टेंटू पास मार्गे ट्रेकला सुरुवात केली. तब्बल १२ तासांनी सायंकाळी सगळी टीम सुरक्षितरित्या कॅम्प १ ला पोहचली.रात्री सर्वांनी कॅम्प १ येथे मुक्काम केला. मोहिमेतील अवघड समाजाला जाणारा टेंटू पास टीमने लिलया पार केला. ३ जुलैला सकाळी ८.३० सुमारास टीम समिट कॅम्पच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि तब्बल पावणे आठ तासाने सायंकाळी ४.१५ सुमारास टीम समिट कॅम्प येथे पोहचली. रात्री सर्वांनी समिट कॅम्प येथे मुक्काम केला.
४ जुलैला समिट प्रयत्न करणार होतो. मात्र, दिवस आणि रात्रभर पडलेल्या पावसामुळे नियोजन बदलले आणि समिट कॅम्प येथे टेन्ट मध्येच मुक्काम केला. ५ जुलैला रात्री १ वाजता तयार होऊन रात्रीच्या अंधारात हेडलॅम्पच्या आधारावर शिखराच्या दिशेने मार्गस्थ झालो. सकाळी ९ च्या सुमारास शिखर माथ्यावर पोहोचलो. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अँकरिंग सुरू असताना लगेच ८०-९० कि.मी. वेगाने सोसाट्याचा वारा व हिमवर्षाव सुरु झाला आणि अंदुक प्रकाश झाला. मग लगेच १-२ फोटो आणि व्हिडिओ काढले. लगेच ९.१५ वाजता खाली उतरण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि सगळी टीम लगबगीने खाली उतरायला सुरुवात झाली. सर्व पॅच सावधरित्या रॅपेलिंग आणि ट्रेक करून टीम साधारण ३-४ तासांत १२.१५ ते १.१५ दरम्यान समिट कॅम्प येथे पोहचली. रात्रभरचा ट्रेक आणि हेवी स्नो फॉल त्यामुळे दमलेल्या टीमने टेन्ट मध्ये आराम केला आणि समिट कॅम्प येथे टेन्ट मध्येच मुक्काम केला. बाहेर रात्रभर स्नो फॉल सुरूच होता. ६ जुलैला वातावरण साफ होते. आदल्या दिवशी शिखर माथ्यावर नीट फोटो आणि व्हिडिओ घेऊ न शकल्यामुळे सगळ्यांनी समिट कॅम्प येथे लवकर सकाळी सगळे नियोजित फोटो आणि व्हिडिओ घेतले. सकाळी ११ वाजता टीम समिट कॅम्प वाईंड – अप वरून कॅम्प १ च्या दिशेने मार्गस्थ झाली. तब्बल सहा तासांनी संध्याकाळी पाच वाजता टीम कॅम्प १ ला पोहचली. तिथे मुक्काम केला. रात्रभर हेवी स्नो फॉल सुरूच होता. ७ जुलैला सकाळ पासूनच हेवी स्नो फॉल आणि पाऊस सुरूच होता आणि पाऊस थोडा थांबल्यावर सकाळी ११ वाजता पूर्ण टीम कॅम्प १ पासून टेंटू पास मार्गे टेंटू पास बेस कॅम्प येथे ट्रेकला सुरुवात केली. सर्व पॅच सावधरित्या रॅपेलिंग करून रात्री ८ च्या सुमारास टीम सुरक्षितरित्या टेंटू पास बेस कॅम्प येथे पोहचली. तिकडे टेन्ट मध्ये मुक्काम केला. रात्रभर पाऊस सुरूच होता. ८ जुलैला सकाळ पासूनच पाऊस सुरूच होता. टीम बियास कुंड – भोजपथर – बकरर्थाच मार्गे संध्याकाळी ४ वाजता धुंदीला हायवे येथे पोहचली. आम्ही ओढे – नाले जाताना क्रॉस केले होते. ते सगळे सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहत होते. वाटेत एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप बियास कुंड ट्रेक करिता आला होता पण जोरदार पाऊस बघून भयभीत झाला होता. त्यांना थोडी मदत करून त्यांना सुरक्षितरित्या सगळे ओढे – नाले पार करून त्यांना खाली आणले. आमची पूर्ण टीम खाली आल्यावर आम्ही आमच्या बुरुवा गावाच्या दिशेने गाडीने मार्गस्थ झालो आणि मागे वळून पाहताना मोहीम यशस्वीरीत्या आणि सुरक्षितरित्या पूर्ण झाल्याचे समाधान मनात होते.
– गिर्यारोहणातील कोर्स पूर्ण
अमोल यांचे शिक्षण बी कॉम असून ऍथलेटिक्समध्ये एफ. एस. टी. ओ. (स्टेट रेफ्री) आहेत. गेली वीस वर्षे एसटी महामंडळाची नोकरी सांभाळून गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू आणि प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. तसेच हिमालयातील बेसिक ॲडव्हान्स एम. ओ. आय. (गिर्यारोहण प्रशिक्षक) हा गिर्यारोहणातील कोर्स पूर्ण केला आहे.
– अमोल यांचा गिर्यारोहणाचा यापूर्वीचा प्रवास असा
अमोल यांनी हिमालयातील या अगोदर फ्रेंडशिप शिखर १७ हजार ३५३ फूट उंचीचे शिखर, क्षितिदार येथे १५ हजार ७०० फुटांवर हाईट गेनिंग व देव ते बा शिखरावर १७ हजार ६०० फुटांपर्यंत, सह्याद्रीमधील आतापर्यंत ३५ सुळक्यांवरील मोहीम यशस्वी केली आहे. तसेच या गिर्यारोहणाच्या अनुभवातून बऱ्याच ठिकाणी मदत कार्य, गड संवर्धन, स्वच्छता मोहिमेमध्ये धडाडीने भाग घेत आहेत.