कोल्हापूरच्या “वंदना” यांची “सुवर्ण” कामगिरी
– राष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटिक्समध्ये दोन गोल्ड मेडलची कमाई
– राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये पटकाविले ब्रॉंझ पदक
– गेल्या 35 वर्षांपासून राखले सरावात सातत्य
– प्रशिक्षक म्हणून शेकडो राष्ट्रीय, राज्य खेळाडू घडविण्यामध्ये योगदान
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूरच्या वंदना संजय पाटील यांनी 5 व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी बजावली. यात त्यांनी 2 सुवर्ण पदके तर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळे कोल्हापूरचा नावलौकिक देश पातळीवर पोहोचला आहे.
यंदाच्या वर्षी 2 गोल्ड व 1 कांस्य पदकाची कमाई
यंदाच्या वर्षी वंदना यांनी वाराणसी येथे झालेल्या 5 व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धेत 100 मी धावणे स्पर्धेत 1 तर 4 बाय 100 मी रिले स्पर्धेत 1 अशी एकूण दोन गोल्ड तर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. तसेच यापूर्वी वंदना यांनी 2019 साली 39 व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत 100 मी धावणेमध्ये कांस्य तर 4 बाय 100 मी रिलेमध्ये रौप्य पदक, 2022 साली राष्ट्रीय बास्केटबॉल
स्पर्धेत कांस्य तर जुलै 2021 साली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे.
असा आहे वंदना यांचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी या वर्गात शिकत असताना ॲथलेटिक्स व बास्केटबॉल खेळाविषयी आवड निर्माण झाली. प्रशिक्षक म्हणून राजेंद्र दळवी आणि नितीन दलवाई यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभले. 1986 – 87 साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजला प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये प्रशिक्षक प्रा. शिवाजी घोरपडे व शेंडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही खेळांचा सराव सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथलेटिक्स युनिव्हर्सिटी स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी बजावली. कॉलेज झाल्यानंतर 2005 मध्ये छत्रपती शाहू विद्यालयामध्ये बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यामुळे पुन्हा मुलांना खेळाचे प्रशिक्षण देण्याबरोबर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गेली सतरा वर्षे छत्रपती शाहू विद्यालय या शाळेत बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना बास्केटबॉल व अथलेटिक्स प्रशिक्षणाबरोबरच माझ्यातील खेळाचा विकास करणे शक्य झाले. यानंतर त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षापासून मास्टर्स स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रारंभ केला. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदकांची ही कमाई केली. सध्या वंदना यांचे वय 53 असून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आजही त्यांनी सरावात सातत्य राखत आपली खेळातील क्षमता टिकवून ठेवली आहे. सध्या त्या प्रशिक्षकाची जबाबदारी पार पडत छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल येथील फ्लाय बास्केटबॉल अकॅडमीमध्ये प्रशिक्षक संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळातील क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्या दररोज सायंकाळी दोन तास बास्केटबॉल मैदानावर सराव करतात. पती संजय यांचे मेडिकल दुकान आहे. तर मुलगी ऋच्या ही कॉम्प्युटर इंजिनियर असून पुणे येथील टेक महिंद्रा या कंपनीत नोकरी करत आहे.
या त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी प्रवासात प्रशिक्षकासह कुटुंबातील सदस्यांची खंबीर साथ, वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले आहे.
– गेल्या 35 वर्षांपासून सरावात राखले सातत्य
सध्या छत्रपती शाहू विद्यालय या शाळेत बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या वंदना संजय पाटील यांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड निर्माण झाली. गेल्या 35 वर्षांपासून सातत्य राखत त्या मैदानावर कसून सराव करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे दररोज सायंकाळी दोन तास आजअखेर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाबरोबर त्यांनी स्वतःचा बास्केटबॉलचा सराव सुरू ठेवला आहे. या सरावातील सातत्याच्या जोरावर त्यांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी ॲथलेटिक्ससह बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी बजावत आजपर्यंत आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रशिक्षकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून त्या विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांची ही क्रीडा क्षेत्रातील प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.