*बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचे आयोजन*
– बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समज संस्था आणि राणी चेन्नम्मा महीला मंडळाची माहिती
– दि. 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत शाहू स्मारक भवन (मिनी सभागृह) येथे होणार तीन दिवसीय ‘बसव व्याख्यानमाला’
– गेल्या दहा वर्षांपासून जोपासली आहे परंपरा
कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसव जयंती निमित्त तीन दिवसीय ‘बसव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि.19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत शाहू स्मारक भवन (मिनी सभागृह) येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटले आहे, शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, श्रमप्रतिष्ठा या मानवी मूल्यांवर आधारित कल्याणराज्य निर्मिती केली होती. त्यांनी लोकशाही समाजरचनेचे प्रारूप असणारे अनुभव मंटप उभारून सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशी समग्र क्रांती घडवून आणली होती. त्यांचे विचार व कार्य आजही सर्व मानव समाजासाठी मार्गदर्शक व अनुकरणीय आहेत. म्हणूनच बसवण्णांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या गौरव-पूजनासोबतच त्यांच्या मानवतावादी विचारांचा जागर व्हावा, या उद्देशाने गेली १० वर्षे कोल्हापूर येथे बसव व्याख्यानमालेचे आयोजन करून परंपरा जोपासली आहे. आजअखेर या व्याख्यानमाले मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक मान्यवर विचारवंत, अभ्यासक, संशोधक, लेखक यांची व्याख्याने आयोजित केली आहेत.
यंदाच्या वर्षी देखील महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांच्या विविध विचार पैलूंवर आधारित विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. दि. १९ एप्रिल रोजी डॉ. बी. एम. हिर्डेकर हे ‘बसव विचार आणि शिक्षण’ या विषयावर आपले विचार मांडतील. डॉ. भारती पाटील या अध्यक्ष आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दि. २० एप्रिल रोजी विश्वास सुतार हे या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतील. ते ‘अक्कमहादेवी ते बहिणाबाई : स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार’ या विषयावर व्याख्यान देतील. दुसऱ्या दिवशी डॉ. अर्चना जगतकर-कांबळे या अध्यक्षस्थानी असतील तर डॉ. सतीश घाळी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बसव व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी दि. २१ एप्रिल रोजी डॉ. राजेंद्र कुंभार यांचे ‘बसववादाचे वर्तमानकालोचित विविध आयाम’ या विषयावर व्याख्यान होणार असून त्याला भारतीताई पवार अध्यक्ष तसेच डॉ. विश्वनाथ मगदूम प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ही तीन दिवसीय “बसव व्याख्यानमला” रोज सायंकाळी ६.०० वाजता शाहू स्मारक भवन (मिनी सभागृह) येथे पार पडणार आहे.
तरी या व्याख्यानमालेसाठी सर्व समाजबांधव, बसवप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समज संस्था आणि राणी चेन्नम्मा महीला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.