“चंद्रकांत चषक”वर “पीटीएम”चा “कब्जा”

- हाय होल्टेज अंतिम सामन्यात "शिवाजी मंडळ"वर 3 - 1 गोलने मात

“चंद्रकांत चषक”वर “पीटीएम”चा “कब्जा”

– हाय होल्टेज अंतिम सामन्यात “शिवाजी मंडळ”वर 3 – 1 गोलने मात

– सामना जिंकल्यानंतर पीटीएम समर्थकांचा एकच जल्लोष स्टेडीयमवर घुमला पुन्हा “नाद खुळा… पिवळा निळा…” चा आवाज

– दोन पेठांतील प्रमुख पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील चुरशीचा सामना पाहण्यासाठी शाहू स्टेडियमवर समर्थक व फुटबॉलप्रेमींची विक्रमी गर्दी

– महिलावर्गाचीही मैदानावर लक्षणीय उपस्थिती

– सामन्यात तीन खेळाडूंना रेड कार्ड

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक” स्पर्धेतील शनिवारी (दि.15 एप्रिल 2023) झालेल्या अंतिम हाय व्होल्टेज सामन्यात “पीटीएम”ने पारंपरिक प्रतिस्पर्धी “शिवाजी मंडळ”वर 3 – 1 गोलने मात करून चषकावर “कब्जा” केला. सामना जिंकताच पीटीएम समर्थकांनी शाहू स्टेडियम प्रेक्षक गॅलरीमध्ये आपल्या संघाचा झेंडा फडकवत “नाद खुळा .. पिवळा निळा …” असा एकच जल्लोष केला. मैदानावर खेळाडूंनी तर प्रेक्षक गॅलरीत समर्थक व फुटबॉलप्रेमींनी साऊंड सिस्टिमवर ठेका धरला. तसेच खेळाडूंनी समर्थक प्रेक्षकांच्या जल्लोषाला दाद दिली.

या स्पर्धेतील विजेत्या “पीटीएम” संघाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते 2 लाख 31 हजार तर उपविजेता “शिवाजी मंडळ”ला 1 लाख 31 हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव , केएसए अध्यक्ष व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, स्पर्धा संयोजक व श्री नेताजी तरुण मंडळचे राजू साळोखे आदी मान्यवरांसह स्पर्धा संयोजन कमिटी, जाधव इंडस्ट्रीजचे सत्यजित जाधव व पदाधिकारी, केएसए पदाधिकारी, रेफ्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन विजय साळोखे यांनी केले. त्यांचा शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

छत्रपती शाहू स्टेडियमच्या फुटबॉल मैदानावर पारंपारिक प्रतिस्पर्धी दोन पेठांमधील प्रमुख संघ पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील हाय व्होल्टेज सामना अपेक्षेप्रमाणे सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघातील खेळाडूंच्या दर्जेदार खेळाने अखेरच्या क्षणापर्यंत समर्थक व फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवले होते.

चालू हंगामात दोन पेठांतील प्रमुख संघ पीटीएम विरुद्ध शिवाजी प्रथमच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामुळे दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेगवान खेळाला प्रारंभ झाला. पी टी एम कडून सामन्याच्या 22 मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडद्वारे उत्कृष्ट गोल करून संघाला 1 – 0 गोलची आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात ही आघाडी कायम राखण्यात पीटीएम संघाला यश मिळाले.

उत्तरार्धात आघाडी कमी करण्याच्या हेतूने उतरलेल्या शिवाजी तरुण मंडळाने वेगवान चाली रचत पीटीएम संघावर चढाई केली. सामन्याच्या 48 व्या मिनिटाला शिवाजीच्या इंद्रजीत चौगुलेने मैदानी गोल करून संघाला 1 – 1 गोलची बरोबरी मिळवून दिली. सामना जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या दोन्ही संघांनी वेगवेगळ्या चाली रचत प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. पीटीएमकडून सोमीदेने सामन्याच्या 60 व्या मिनिटाला शिवाजी मंडळच्या गोल पोस्टच्या दिशेने मारलेला फटका जाळ्यात जाऊन विसावला. यानंतर अवघ्या 3 मिनिटाच्या अंतराने म्हणजेच 63 व्या मिनिटाला दुसरा मैदानी गोल करून संघाला 3 – 1 अशी मजबूत विजयी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यात शिवाजी मंडळाचे खेळाडू अपयशी ठरले. या सामन्याच्या विजयाबरोबर पीटीएम संघाने स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.

– सामन्यात तीन खेळाडूंना रेड कार्ड तर सुमारे 10 ते 11 खेळाडूंना यलो कार्ड

पीटीएम चा खेळाडू प्रथमेश येरेकर याला 2 येलो 1 रेड तर ऋषिकेश मेथे व शिवाजी मंडळच्या सुमित जाधव या दोन खेळाडूंना अखिलाडीवृत्ती दाखवल्यामुळे पंचांनी डायरेक्ट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. तसेच सुमारे 10 ते 12 खेळाडूंना यलो कार्ड दाखवले.

– महिला वर्गानेही लावली लक्षणीय उपस्थिती

संघ समर्थक, फुटबॉलप्रेमींकडून सोशल मीडियावर आप-आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीचे व आपलाच संघ कसा अव्वल याबाबतचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. (नाद खुळा … एकच झेंडा फिरवा…आदी.) यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिवसभर दोन्ही संघातील समर्थक व फुटबॉलप्रेमींमध्ये सोशल मीडियावरवरून पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ व दोन पेठांमधील फुटबॉल खेळाची इर्षा पहावयास मिळाली. त्याचप्रमाणे शनिवारी सामन्यावेळीही मैदानावर खेळाडू, प्रेक्षक गॅलरीत समर्थक व फुटबॉलप्रेमींची तीच इर्षा व जल्लोष पाहायला मिळाला. महिला वर्गासाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी महिला वर्गानेही लक्षणीय उपस्थिती लावली होती.

– समाजकंटकांकडून अर्वाच भाषेत जल्लोष

मैदानावर खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्यानंतर मैदानाबाहेर स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये काही अतिउत्साही समाजकंटकांकडून अर्वाच्य भाषेत जल्लोष करण्यात आला. तसेच मैदानावरील खेळाडूंच्या बाजाबाचीमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सामन्यावेळी महिलावर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. यामुळे ज्येष्ठ फुटबॉलप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांतून घडलेला प्रकार कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वाला काळीमा फासणारा आहे. यावर लवकरात – लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. अशा तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

– स्पर्धा व सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू

सामनावीर – सोमीदे. (पीटीएम),
फॉरवर्ड – संदेश कासार.(शिवाजी),
हाफ – रोहित देसाई. (पीटीएम),
डिफेन्स – प्रतिक बदामे (पीटीएम),
गोलरक्षक –मयुरेश चौगुले. (शिवाजी),
मालिकावीर – विक्टर जॅक्सन (पीटीएम).


– विजयी पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघातील सर्व खेळाडू…

अक्षय पायमल, प्रतीक बदामे, ऋषिकेश मेथे – पाटील, अक्षय मेथे – पाटील, प्रथमेश हेरेकर, रोहित देसाई, ओंकार पाटील, ऋषभ ढेरे, ओंकार मोरे, शाहिद महालकारी, विक्टर जॅक्सन, राजीव मरियाला, सोमीदे, यश देवणे, यश यरंडोली, सैफ हकीम, रोहित पोवार, रणजीत विचारे, ओमकार जाधव, कैलास पाटील, आदित्य कालोली, प्रेम देसाई.


उपविजेता शिवाजी तरुण मंडळ संघातील सर्व खेळाडू….

करण चव्हाण-बंदरे, रोहित यादव, शरद मेढे, मयूर चौगुले, संकेत साळुंखे, विक्रम शिंदे, सुयश हांडे, साहिल निंबाळकर, शुभम साळुंखे, विशाल पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, सुमित जाधव, सिद्धेश साळुंखे, जय कामत, संदेश कासार, योगेश कदम, रोहन आडनाइक, इंद्रजीत चौगुले, आदित्य लायकर.

– चालू हंगामातील प्रतीक्षा संपली … “चंद्रकांत चषक”वर “पीटीएम”चा “कब्जा”

हंगामाला सुरुवात केएसए फुटबॉल लीग पासून होते. या लीग स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने अव्वल स्थान पटकावले. यानंतर झालेल्या पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक या दुसऱ्या फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळला नमवत दिलबहारने चषकावर कब्जा केला. सलग दोन चषक पटकावून दिलबहारने हंगामाची दमदार सुरुवात केली. त्यांच्या या विजयी घोडदौड रोखण्यात खंडोबा तालीम मंडळला यश मिळाले. कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबाने बालगोपाल तालमीवर मात करून चषक पटकावला. तर संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित राजेश क्षीरसागर फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने डार्क हॉर्स ठरलेल्या झुंजार क्लबवर मात करून सलग दुसरे चषक पटकावत आपले वर्चस्व कायम ठेवले. बालगोपाल संघाला दोन वेळा व झुंजार क्लबला एक वेळा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.मात्र, केएसए लीगनंतर झालेल्या चौथ्या श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत या दोन्हीही संघांना अंतिम फेरी गाठता आली नाही. हंगामात दिग्गज ठरलेल्या संघा व्यतिरिक्त या स्पर्धेतील अंतिम लढतीसाठी दोन पेठातील प्रमुख संघ व पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ चालू फुटबॉल हंगामात प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा होता. चुरशीच्या झालेल्या या अंतिम हाय व्होल्टेज सामन्यात “पीटीएम” संघाने “शिवाजी मंडळ” वर 3 – 1 एक गोलने मात करून चषकावर “कब्जा” केला.

You may also like

error: Content is protected !!