पत्रकारांना मारहाण करणार्या कणेरी मठाच्या स्वयंसेवकांचा जाहीर निषेध
– कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
कोल्हापुर : (“मानस न्यूज 9” – प्रतिनिधी)
कणेरी मठाच्या गो-शाळेतील गाई दगावल्याच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्रवाहिन्यांच्या पत्रकारांना मठातील स्वयंसेवकांनी मज्जाव करण्यासह टिव्ही ९ या वृत्तवाहिनीचे बातमीदार भूषण पाटील व अन्य बातमीदार, कॅमेरामन यांना दमदाटी करत,मारहाण केल्याच्या निंदनीय घटनेचा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. शनिवारी (दि.25 फेब्रुवारी 2023) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, पंधराशे वर्षांहून अधिक काळ अध्यात्मिक प्रतिष्ठान लाभलेल्या कणेरी येथील सिद्धगिरी मठात सध्या पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू आहे. यासाठी दररोज हजारो भाविक, पर्यटक, ग्रामस्थ येथे दाखल होत आहेत. नेहमीच सकारात्मक वार्तांकन करून, आजपर्यंत पत्रकारांनी आपले योगदान दिले आहे. तसेच येथील विविध सामाजिक उपक्रमांतही पत्रकारांनी सहभाग घेतला आहे.
नुकतेच मठाच्या गो-शाळेतील गाई मोठ्या संख्येने दगावल्याचे समोर आले. शिळे अन्न दिल्याने या गाई दगावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. कोठेही घडलेल्या घटनेचे वार्तांकन करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. त्यानुसार पत्रकार माहिती घेत असताना, माहिती देणे दुरच उलट पत्रकारांवरच दगड, धोंडे घेऊन थेट हल्ला करण्याचा प्रकार स्वयंसेवकांनी केला. याप्रकरणी जखमी पत्रकार भुषण पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र पडसाद उमटत असुन, अशा दडपशाहीला भीक घालणार नसल्याचा इशारा येथील पत्रकारांकडुन देण्यात आला.
दरम्यान, पत्रकारांवर हल्ला करणार्यांविरुद्ध, भारतीय दंड संहिता व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन तत्काळ अटक करावी, तसेच कणेरी मठातील गाईंच्या मृत्युची सखोल चौकशी करुन, याप्रकरणीही गुन्हा दाखल करावा.यातील दोषींवर कडक कारवाई करावी. राज्य सरकार, कोल्हापुर पोलिस दलाने घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, या मागण्या संदर्भात तात्काळ मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचीव तसेच माहिती उपसंचालक यांना कळविण्याचे आश्वासन कणसे यांनी यावेळी दिले.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, सचिव बाबा खाडे यांच्यासह नाना पालकर, उदय कुलकर्णी, नंदकुमार ओतारी, आशिष कदम, हिलाल कुरेशी, समीर मुजावर, पांडुरंग दळवी, पी.ए.पाटील, सुनील पाटील, विजय पाटील, मालोजी केरकर, नंदकुमार तेली, भूषण पाटील, कृष्णात जमदाडे, श्रद्धा जोगळेकर, इंदूमती गणेश, प्रिया सरीकर, समीर देशपांडे, सुनंदा मोरे, शुभांगी तावरे, प्रताप नाईक, विजय पवार, महेश कुर्लेकर, अनिल देशमुख, सतीश सरीकर, निवास चौगुले, विकास कांबळे, ज्ञानेश्वर साळोखे, सतेज औंधकर, सुनील काटकर, संदीप पाटील, रणजित माजगावकर, अक्षय थोरवत नयन यादवाड, निलेश शेवाळे, आदित्य वेल्हाळ, राहुल गायकवाड, नाज ट्रेनर, रियाज ट्रेनर, विश्वास कोरे, दीपक सूर्यवंशी, रवींद्र कुलकर्णी, संपत नरके, सचिन सावंत, निलेश शेवाळे, अर्जुन टाकळकर, पांडुरंग पाटील, जावेद तांबोळी, राहुल गडकर, युवराज पाटील, जितेंद्र शिंदे, दयानंद जिरगे, चंद्रकांत पाटील, गौरव डोंगरे, प्रवीण मस्के, पप्पू आत्तार रियाज ट्रेनर, प्रवीण देसाई, तानाजी पोवार, वैभव गोंधळी, बाबुराव रानगे, बाळासाहेब पाटोळे आदींसह पत्रकार, छायाचित्रकार, टिव्ही व्हिडिओग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.