कोल्हापूरात प्रथमच भरणार “६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन”
– संयोजक मिलींद धोंड व प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांची माहिती
– दि. १२ आणि १३ जानेवारी 2023 रोजी होणार प्रदर्शन
कोल्हापूर : (“मानस न्युज – 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
विविध रानकंदमुळांची ओळख व त्यांचा आहारातील वापर याची माहिती शहरवासिय व खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी. तसेच शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करावी या उदात्त हेतूने “निसर्ग अंकुर” संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर व एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक मिलींद धोंड व प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस सुशांत टक्कळकी, अमृता वासुदेवन प्राचार्य डॉ.अशोक वाली, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, स्मिता शिंदे, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.
– दोन दिवसीय “कंदमुळांचे” प्रदर्शन
श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दि. १२ आणि १३ जानेवारी २०२३ रोजी “६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन” शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे १२ जानेवारी २०२३ – सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत तर १३ जानेवारी २०२३- सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
– प्रदर्शनाचे उदघाटन…
या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) ह्यांच्या हस्ते व बाबासाहेब वाघमोडे ( प्रांताधिकारी गडहिंग्लज), उमेश पाटील ( कृषी अधिकारी, कोल्हापूर), प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे ( माजी प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ), डॉ. सौ. गीता पिल्लई (अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन) यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह इतर मान्यवरही या प्रदर्शनाला विशेष भेट देणार आहेत.
– कंदमुळे देणाऱ्या निसर्गात
अनेक वनस्पती
निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक
वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे.
– “औषधी रानभाज्या – प्रथम खंड” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व संस्थेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य प्राचार्य डॉ ..अशोक वाली यांनी लिहिलेल्या “औषधी रानभाज्या – प्रथम खंड ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
– प्रदर्शन सर्वांसाठी खुले
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी असून प्रोजेक्ट डायरेक्टर अमृता वासुदेवन आहेत.
– मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून प्रदर्शन
लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. यामध्ये शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, पेनवा आदी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. तर गाजर, मुळा, बीट, आले, हळद, कांदा, लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो. अळू, कमळं, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात. साबु कंदापासून साबुदाणा तयार करतात. मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.
– सुमारे ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी
हे प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, त्याचबरोबर काळी हळद, आंबेहळद ह्या सारखे हळदीचे
विविध प्रकार व त्यांचे कंद इ. अशाप्रकारच्या सुमारे ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी या प्रदर्शनात केली जाणार आहे. अशा एकूण ६० कंदांच्या प्रकारांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध असून सुमारे ६ ते ७ प्रकारच्या कंदांच्या पाककृती बाबतची माहितीही सर्व उपस्थितांना ह्या प्रदर्शनात दिली जाणार आहे.
– आरोग्यवर्धक कंदमुळांची मिळणार माहिती
यावेळी हौशी खवय्यांना कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन
प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) येथून करण्यात येणार आहे. लेट्स गेट बँक टु अवर रूट्स ” या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती मिळणार आहे. तरी या चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन एनजीओ कम्पेंशन २४, कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले आहे.