फोटो ओळ : MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा (2022-23). प्रथम तीन क्रमांक चे विजेते डावीकडून तृतीय वंतिका अग्रवाल विजेती दिव्या देशमुख व उपविजेती मेरी गोम्स सोबत मान्यवर.
नागपूरच्या महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने पटकाविले सलग दुसऱ्यांदा “अजिंक्यपद”
– पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची मेरी गोम्स उपविजेती तर दिल्लीची वंतिका अग्रवाल तृतीय
– MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा (2022-23).
– संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे चेअरमन उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते, भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर व अवघ्या सतरा वर्षाच्या प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने ४८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत साडेनऊ गुणासह विजेतेपदाचा मान पटकाविला. जेतेपदासह दिव्याला आकर्षक चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्सने दुसरे क्रमांकासह उपविजेतेपद पटकावून पाच लाख रुपयाची घसघशीत कमाई केली. तर ग्रँडमास्टर वंतिका अग्रवालचा साडे आठ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावत चार लाखाचे रोख पारितोषिक प्राप्त केले.
– स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ…
अतिग्रे-रूकडी येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये गुरुवारी ( दि.5 जानेवारी 2023) रोजी
48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
– यांच्या हस्ते झाले बक्षीस वितरण…
स्पर्धेचा बक्षीस वितरण संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे चेअरमन उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते, भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, चितळे डेअरीचे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, पॉलिटेक्निक चे प्राचार्य विराट गिरी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे, चेस असोसिएशनचे भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य व आरती मोदी आदी उपस्थित होते.
– आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमित घेण्याचा “मानस” : उद्योगपती संजय घोडावत
यावेळी बोलताना संजय घोडावत यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व खेळाडू व पालकांनी संयोजकांना चांगले सहकार्य केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ही पहिल्या राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याचे सांगितले. तसेच यापुढे संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमित घेण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच कर्नाटकचे एम् मंजुनाथ यांनी स्पर्धेचा अहवाल सादर केला.
– चुरशीच्या सामन्यात दिव्याचा
दिमाखात विजय..अन विजेतेपद…
सर्वांचेच लक्ष लागलेल्या पहिल्या पटावर स्पर्धेत निर्विवादरित्या वर्चस्व राखणाऱ्या दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावर अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर भक्तीला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भक्तीला देखील अडीच लाख रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
– महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्सला
दुसरे स्थान (उपविजेतेपद)
चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारी यांच्यातील प्रदीर्घ लढतीत मेरीने अंतिम पर्वात उत्कृष्ट डावपेच आखत ऋचाला पराभूत करत दुसरे स्थान पटकाविले. मेरीने उपविजेतेपदासह रोख रक्कम रु. पाच लाख रुपयाची घसघशीत कमाई केली.
– ग्रँडमास्टर वंतिका अग्रवालचा साडे आठ गुणांसह तिसरा क्रमांक
अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल व आयुर्विमा महामंडळाची महिला ग्रँडमास्टर निशा मोहोता यांच्यातील लक्षवेधक लढतीत वंतिकाने कल्पक चाली रचत ५८ व्या चालीला विजय संपादन केला. वंतिकाने साडे आठ गुणांसह तिसरा क्रमांक व चार लाखाचे रोख पारितोषिक प्राप्त केले.
– आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगेचा चौथा क्रमांक
महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे हिने नेत्रदीपक खेळ करत केरळच्या महिला फिडे मास्टर ए. जी. निम्मीचा पराभव करत चौथा क्रमांक मिळवीत तीन लाखाचे बक्षिस पटकाविले.
– आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्माचा पाचवा क्रमांक
कर्नाटकची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा हिने सुरेख खेळ करत महाराष्ट्राच्या विश्वा शहावर मात करत पाचवा क्रमांक प्राप्त करत अडीच लाख रुपयाचे पारितोषिक मिळविले.
– सहा ते दहा क्रमांकासह इतर विजेते असे…
पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन हिने सातवा क्रमांक व रोख रक्कम रु. दोन लाख, तामिळनाडूच्या महिला ग्रँडमास्टर श्रीजा सेशाद्रीने आठवा क्रमांक व रोख रक्कम रु. दोन लाख, पश्चिम बंगालची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अर्पिता मुखर्जीने नववा व रोख रक्कम रु. दीड लाख तर तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर व्ही. वर्शिनी हिने आकर्षक खेळ करत दहावा क्रमांक व दीड लाखाचे पारितोषिक पटकाविले.
तामिळनाडूच्या सी. संयुक्ता हिने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिला महिला आंतरराष्ट्रीय मास्टरचा नॉर्म मिळाला. तसेच कोल्हापूरच्या दिव्या पाटील हिने आपल्या खेळाची चुणूक दाखवत आयुर्विमा महामंडळाची महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटेला पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेतील युवा खेळाडूंनी केलेले उलटफेर व मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
– स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी यांनी केले सहकार्य व घेतले परिश्रम
जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम पी एल स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे.
चितळे डेअरी,जैन इरिगेशन जळगाव,एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप,अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.
संजय घोडावत युनिव्हर्सिटीमधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी,विद्यापीठ व पॉलिटेक्निकच्या कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चेस असोसिएशन कोल्हापूरला चांगले सहकार्य केले.
फोटो ओळ : प्रथम तीन क्रमांक चे विजेते डावीकडून तृतीय वंतिका अग्रवाल विजेती दिव्या देशमुख व उपविजेती मेरी गोम्स सोबत मान्यवर.