अटीतटीच्या लढतीत “प्रॅक्टिस- अ” ची बाजी
– बलाढ्य “पीटीएम- अ” वर 2 – 1 गोल फरकाने विजय
– पहिल्या सामन्यात उत्तरेश्वरची ऋणमुक्तेश्वरवर 1 – 0 गोलने मात
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
अपेक्षेप्रमाणे रंगतदार व अटीतटीचा झालेल्या सामन्यात प्रॅक्टिसने बलाढ्य पीटीएमचा 2 – 1 अशा गोल फरकाने धक्कादायक पराभव करून बाजी मारली. तर तत्पुर्वी, झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाने ऋणमुक्तेश्वर तालीम संघावर 1 – 0 गोलने मात केली. दोन्हीही विजयी संघांनी आपल्या गुणतक्त्यात तीन गुणांची भर टाकली.
केएसए “ए” डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धा अंतर्गत हा सामना पाहण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियम मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये त्यांच्या-त्यांच्या संघाच्या समर्थकांनी स्टेडियमवर विक्रमी गर्दी केली होती.
तुल्यबळ संघ “प्रॅक्टिस फुटबॉल क्लब – अ” विरुद्ध “पाटाकडील तालीम मंडळ – अ” यांच्यातील
सामना गुरुवारी (दि.29डिसेंबर 2022) दुपारी चार वाजता खेळविण्यात आला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी वेगवान खेळाला सुरुवात केली. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित पवारने रोहित देसाईच्या पासवर उत्कृष्ट गोल करून संघाला 1 – 0 गोलची आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्याच्या २७ व्या मिनिटाला प्रॅक्टिसकडून सागर पवारने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका सरळ गोल जाळ्यात गेला. या गोलमुळे प्रॅक्टिसने 1 – 1 गोलची बरोबरी साधली.
उत्तरार्धात गोल आघाडी घेण्याच्या उद्देशाने पाटाकडीलने वेगवान खेळायला सुरुवात केली. त्यांच्याकडून व्हिक्टर जॅक्सन, ओंकार जाधव, प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे, रोहित देसाई, रोहित पोवार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. मात्र, त्यांना प्रॅक्टिसची बचावफळी भेदण्यात अपयश आले. प्रॅक्टिसकडून सागर चिले, चिमा इफान्यूचिकू, आदित्य पाटील, जुलियस ट्रो, सचिन गायकवाड, सागर पवार, राहुल पाटील यांनी उत्कृष्ट चाली रचत वेगवान खेळ केला. पाटाकडीलच्या व्हेक्टर जॅक्सनला प्रॅक्टिसच्या संकेत जाधवने गोलक्षेत्रात धोकादायक रित्या अडवले. त्यामुळे पंचांनी पाटाकडील ला पेनल्टी किक बहाल केली. मात्र,ओंकार मोरेने मारलेला फटका गोल पोस्टवरून गेल्याने पाटाकडीलची गोल करण्याची सोपी संधी हुकली. यानंतर ज्यादा वेळेत प्रॅक्टिसच्या ओंकार जाधवने मारलेला फटका ओंकार मोरे च्या पायाला लागून गोल जाण्यात गेला. त्यामुळे प्रॅक्टिसला 2 – 1 अशी आघाडी मिळाली. याच गोल संख्येवर प्रॅक्टिसने सामना जिंकला.
तत्पुर्वी, दुपारी 2 वाजता झालेल्या पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम संघाने ऋणमुक्तेश्वरवर 1 – 0 गोलने मात केली. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला उत्तरेश्वरकडून कोनॉन कोफीने एकमेव विजयी गोल करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. उत्तरेश्वरकडून सोहेल शेख, अक्षय शिंदे, स्वराज पाटील तर ऋणमुक्तेश्वरकडून आयुष्य चौगुले, प्रतीक साबळे, विकी जाधव, फ्रँकी डेविड यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.
आजचे सामने : –
दु. 2 वाजता – झुंजार क्लब विरुद्ध सम्राट नगर फुटबॉल क्लब.
दु. 4 वाजता – बाल गोपाल तालीम मंडळ विरुद्ध बीजीएम.