कोल्हापुरात पहिल्यांदाच
रंगणार “राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा”
– एकूण तीस लाख रुपयांची रोख बक्षीसे
– संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये “MPL 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे” आयोजन
– स्पर्धा स्विस लीग पद्धतीने
कोल्हापूर : “मानस न्यूज 9” -विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे येथे सोमवार दि. 25 डिसेंबर ते 6 जानेवारी 2022 या कालावधीत “MPL 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा” चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. अशी माहिती राज्य सचिव निरंजन गोडबोल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीष चितळे, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, विश्वस्त विनायक भोसले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले, मनीष मारुलकर, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी, धीरज वैद्य, संदीप पाटील,आरती मोदी, आदित्य आळतेकर आदी उपस्थित होते.
26 डिसेंबरला पहिल्या फेरीस प्रारंभ
रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण 11 फेऱ्यात घेण्यात येणार आहेत. 26 डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होणार आहे. साधारण पाच तासाची दररोज एक फेरी याप्रमाणे एकूण 11 दिवस म्हणजे 5 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
मुख्य स्पर्धा प्रायोजक दिल्लीचे MPL स्पोर्ट्स फाउंडेशन
दिल्लीचे MPL स्पोर्ट्स फाउंडेशन हे मुख्य स्पर्धा प्रायोजक असून संजय घोडावत युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहे.आमदार राजू आवळे, चितळे डेअरी (भिलवडी), जैन इरिगेशन(जळगाव),सिद्धार्थ मयूर,अनिरुद्ध देशपांडे,नरेंद्र फिरोदिया,सचिन शिरगावकर व पल्लवी कोरगांवकर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
दहा क्रमांकाना तीस लाख रुपयाची रोख बक्षिसे
अंतिम अकराव्या फेरीनंतर पहिल्या येणाऱ्या दहा क्रमांकाना एकूण रोख तीस लाख रुपयाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.स्पर्धा विजेत्यास रोख सहा लाख रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्यास रोख पाच लाख रुपये व चषक देऊन सन्मानले जाणार आहे. तृतीय क्रमांकास रोख चार लाख रुपये व चषक देऊन गौरविले जाईल. चौथ्या क्रमांकास रोख तीन लाख रुपयाचे बक्षीस आहे. पाचव्या व सहाव्या क्रमांकास प्रत्येकी रोख अडीच लाख रुपयाचे बक्षीस आहे. सातव्या व आठव्या क्रमांकास प्रत्येकी रोख दोन लाख रुपयाचे बक्षीस आहे तर नवव्या व दहाव्या क्रमांकास प्रत्येकी दीड लाख रुपयाचे रोख बक्षीस ठेवले आहे.
देशातील 110 नामांकित महिला बुद्धिबळपटूचा स्पर्धेत सहभाग
देशातील विविध राज्यातून 110 नामांकित महिला बुद्धिबळपटूनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय मास्टरसह आठ महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर,अकरा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व बारा महिला आंतरराष्ट्रीय फिडे मास्टर चा सहभाग आहे. महिला आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर दिल्लीच्या वंटीका अगरवाल ला या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले आहे तर गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ला द्वितीय मानांकन मिळाले आहे. माजी विजेती पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथनला तृतीय मानांकन मिळाले आहे. चौथे मानांकन पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व माजी विजेती मेरी आना गोम्स ला मिळाले आहे. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेले महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व माजी विजेती गोव्याच्या भक्ती कुलकर्णी ला पाचवे मानांकन मिळाले आहे. पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर एम् महालक्ष्मी सहावी मानांकित आहे.आंध्र प्रदेशची महिला ग्रँडमास्टर प्रत्थुशा बोडा ला सातवे मानांकन आहे. कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारीला या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्रची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगी नववी मानांकित आहे तर कर्नाटक ची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर इशा शर्मा दहावे मानांकन मिळाले आहे.
घरबसल्या मिळणार बुद्धिबळ प्रेमींना स्पर्धेचा आनंद
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या 20 क्रमांकाच्या पटावर डिजिटल चेस बोर्ड असणार आहे. डिजिटल चेस बोर्डमुळे डायरेक्ट ऑनलाइन थेट प्रक्षेपण होणार, असल्यामुळे घरबसल्या बुद्धिबळ प्रेमींना स्पर्धेचा आनंद मिळणार आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वेबसाईटवर व फॉलो चेस आणी चेस डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.