महापालिकेच्या दारात “आप”चा जागर..!

– आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांची माहिती

– दर्जेदार रस्त्यांसाठी 14 नोव्हेंबरपासून चार दिवसांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांसाठी दरवर्षी लाखो करोडो रुपये खर्च होत असतात. मात्र, दुरावस्था नित्याचीच बाब बनली आहे. यावर ठोस उपाययोजना व दर्जेदार रस्त्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारामध्ये आम आदमी पार्टी (आप) तर्फे 14 नोव्हेंबर 2022 पासून जागर करण्यात येणार आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, खराब रस्ते, दर्जा व रस्त्यांच्या विकासासंदर्भात अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, पॅचवर्क व्यतिरिक्त कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होऊन दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी महापालिकेच्या दारात चार दिवसांचा जागर करण्यात येणार आहे. (जागर आंदोलनाची सुरुवात मंगळवारी शंख नाद करून तर समारोप शुक्रवारी घंटानात करून होणार आहे.) हा जागर मंगळवार दि. 15 ते शुक्रवार दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे. यामध्ये (दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत) पहिल्या दिवशी महापालिकेला रिक्षा उलटी (रिव्हर्स) प्रदक्षिणा, दुसऱ्या दिवशी हास्य क्लबद्वारे जागर, तिसऱ्या दिवशी रस्त्याच्या गैरकारभारावर रोखठोक कवी संमेलन तर चौथ्या दिवशी भूगोल कार्यक्रम आदींचा समावेश आहे.तसेच शुक्रवारी चार वाजता जागर आंदोलनाचा समारोप करून महापालिकेला निवेदन देण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, दिलीप पाटील, उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सुरज सुर्वे, अभिजीत कांबळे, संजय साळुंखे, मोहीन मोकाशी आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!