– समाजसेवक तुकाराम नावलगी संस्था नेसरी व अर्धसैनिक ट्रस्ट यांच्यातर्फे जनजागृती मोहिम
– स्वारगेट डेक्कन पुणे स्टेशन येथे झळकले प्रबोधनपर संदेशाचे फलक
कोल्हापूर/पुणे : (मानस न्युज 9 : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
स्वारगेट डेक्कन पुणे स्टेशन येथे प्रबोधनपर संदेशाच्या फलकाद्वारे “गुन्हेगारी मुक्ती”चा जागर..! निमित्त होते समाजसेवक तुकाराम नावलगी संस्था नेसरी व अर्धसैनिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०४ नोव्हेंबर २०२२ रोजी “गुन्हेगारी मुक्ती” साठी राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहीमेचे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सोशल मीडियाला अधिक महत्त्व आले आहे. सर्व व्यवहार ऑनलाइन व डिजिटल पद्धतीने होत आहेत. यामुळे माणसांमध्ये संवाद-सुसंवाद संपत चालला आहे. मैदानावरील खेळाऐवजी मोबाईलवर गेममध्ये युवा वर्ग अडकून पडला आहे. यामुळे ती एकलकोंडी बनली आहेत. संस्कृतीचा ऱ्हास होत असून वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब बनत चालली आहे. बाल वयातच गुन्हेगारीकडे कल वाढला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . यामुळे भविष्यात सामाजिक संतुलन बिघडून अराजकता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आपल्या संस्कृतीवर याचा वाईट परिणाम होत असून समाज व्यवस्था बिघडत आहे. समाज व्यवस्था सक्षम करण्यासाठी व आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी तसेच युवा पिढी सक्षम करण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने पुण्यात “गुन्हेगारी मुक्ती” मोहीम राबविण्यात आली असल्याचे यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जनजागृती पर संदेश देणारे फलक झळकवण्यात आले. आणि गुन्हेगारी रोखण्या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
या समाज प्रबोधनपर मोहीमेकडे स्वारगेट डेक्कन पुणे स्टेशन परिसरातील नागरिकांचे लक्ष्य वेधले. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी नरसु शिंदे, सदस्य जयवंत कांबळे, मारुती पाटील, सर्जेराव भरणकर, यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.